दिवाळी पहाटने सोशल इंजिनिअरिंग

By Admin | Updated: November 3, 2016 05:00 IST2016-11-03T05:00:23+5:302016-11-03T05:00:23+5:30

कोणत्याही कलेचा जिवंत अनुभव घेताना संवादाविनाही संवाद घडत असतो.

Diwali dawn social engineering | दिवाळी पहाटने सोशल इंजिनिअरिंग

दिवाळी पहाटने सोशल इंजिनिअरिंग


कोणत्याही कलेचा जिवंत अनुभव घेताना संवादाविनाही संवाद घडत असतो. मनांची एकरूपता साधत असते. दिवाळी पहाटच्या निमित्ताने हेच सोशल इंजिनिअरिंग झाले. आजच्या वातावरणात खऱ्या अर्थाने याची गरज होती. वाडासंस्कृती, चाळींतील दिवस आणि कोनाडा-अंगण-तुळशीवृंदावन शहरांतून झपाट्यानं लोप पावत चालले आहे. नागरीकरणाच्या वाढत्या रेट्यात हा बदल अपरिहार्यच. दिवाळीच्या फराळाला बोलावून गप्पांची मैफल रंगविणेही कमी झाले आहे. व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक अशा सोशल मीडियाच्या कट्ट्यांवरूनच संवाद साधण्याचे दिवस आले आहेत. जिवंत संवाद हरवत असताना, एकमेकांच्या गाठीभेटीही दुर्मिळ होत आहेत. माणूस हा सोशल प्राणी आहे, हेच चौकोनी कुटुंबांच्या काळात हरवून जात असताना दिवाळी पहाटच्या निमित्ताने लोक पुन्हा एकत्र येत असल्याचे आशादायक वातावरण यंदा या दिवाळीमध्ये पाहावयास मिळाले.
पुण्यातील यंदाची दिवाळी ही स्वरोत्सवाची दिवाळी होती, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. शहराच्या प्रत्येक भागात दिवाळीच्या निमित्ताने सुरांच्या मैफली सजल्या. पहाटेपासून मोठ्या संख्येने नागरिकांनी त्याला दाद दिली. कोणत्याही कलेचा जिवंत अनुभव घेताना संवादाविनाही संवाद घडत असतो. मनांची एकरूपता साधत असते. दिवाळी पहाटच्या निमित्ताने हेच सोशल इंजिनिअरिंग झाले. आजच्या वातावरणात खऱ्या अर्थाने याची गरज होती. शहरे बकाल होत चालली आहेत, असे म्हणतात. हे बकालपण केवळ दृश्य स्वरूपात नसते; तर मनांमध्येही ही बकालता कोठेतरी घर करून बसलेली असते. त्यातूनच मग एकटेपणा आणि तटस्थता वाढीला लागते. रस्त्यावर एखाद्या तरुणीला मारहाण होत असली तरी आपल्याला काय त्याचे, म्हणून दुर्लक्ष केले जाते. शेजारच्या फ्लॅटमध्ये दरोडा पडत असला तरी शेजारधर्माचे पालन होत नाही. हा सगळा अंधार दाटलेला असताना संवादाचे पर्व दिवाळी पहाटच्या निमित्ताने चालू व्हावे. कारण, शेवटी दिवाळी म्हणजे तरी काय? ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ चा संदेश घेऊनच दिवाळी येत असते. अज्ञानरूपी अंध:कारावर ज्ञानरूपी ज्योतीने मात मिळविण्यासाठी केलेला प्रतीकात्मक उत्सव म्हणजे दिवाळी असते. आपल्या संतपरंपरेतही या ज्ञानरूपी दीपोत्सवाचा गजर केला गेला आहे.
कविश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोरांनी सांगितलेली कथा या संदर्भात मोठी बोलकी आहे. रोजच प्रकाशाचं दान करणारा सूर्य एके दिवशी कंटाळला. त्यानं सांगितलं, की आता मी काही हे काम करणार नाही. माझं काम कोण करेल? मात्र, सूर्याचं काम करायला कुणीही पुढे येईना. तेव्हा एक पणती पुढे आली. ती म्हणाली, की मी माझ्या कुवतीप्रमाणं हे काम करेन. माझा संपूर्ण प्रकाश या जगाला अर्पण करेन. दिवाळी पहाटच्या निमित्ताने संवादाची एक पणती पेटली आहे.
दिवाळी पहाटच्या उपक्रमांना यंदाच्या महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. त्यामुळेच पुण्यासारख्या शहरात यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन झाले, असेही म्हटले जाते. पण यातून जे चांगलं घडलं त्याच्याकडे सकारात्मकतेने पाहावयास हवे. प्रसिद्ध कलाकारांपासून ते होतकरूंना या निमित्ताने आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. समाजाच्या मोठ्या वर्गासमोर जिवंत अनुभूती सादर करता आली. विशेष म्हणजे पुण्यातील सगळ्या दिवाळी पहाट उपक्रमांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांच्या अभिरुचीवरच शंका घेऊन धांगडधिंग्याचे कार्यक्रम त्यांच्या माथी मारणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे. शास्त्रीय संगीताची मेजवानी, सुगम संगीतातील गोडवाही प्रेक्षकांना तितकाच भावतो, हेदेखील दिसून आले आहे. प्रेक्षकांमध्येही या निमित्ताने अभिरुचीची पेरणी होऊ लागली आहे.
तमावर- अंध:कारावर उजेडानं मात करण्याचा संदेश देणारा हा सण. निराशेवर आशेने विजय मिळविण्यासाठीचा हा उत्सव असतो. म्हणूनच कवी शंकर रामाणींच्या कवितेतील ओळी यंदाच्या दिवाळीला चपखल बसतात.
‘दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले...’
- अविनाश थोरात

Web Title: Diwali dawn social engineering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.