असंतोषाचा प्रतिनिधी

By गजानन जानभोर | Published: August 15, 2017 01:14 AM2017-08-15T01:14:25+5:302017-08-15T01:14:49+5:30

सामान्य माणसाचा हा ‘पुतळा’ मोडून पडलेल्या माणसाच्या मनातील परिवर्तनाचा, असंतोषाचा प्रतिनिधी आहे.

Dispute representative | असंतोषाचा प्रतिनिधी

असंतोषाचा प्रतिनिधी

Next

सामान्य माणसाचा हा ‘पुतळा’ मोडून पडलेल्या माणसाच्या मनातील परिवर्तनाचा, असंतोषाचा प्रतिनिधी आहे. त्याच्या कल्याणातच स्वातंत्र्याचा खरा अर्थ सामावलेला आहे.
‘जनमंच’ च्या कार्यक्रमात व्यासपीठावरील एक अर्धपुतळा सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. उपस्थितांना उत्सुकता असते, हा कोण? एखादा महापुरुष, संत, दिवंगत पुढारी की आणखी कुणी? खांद्यावर उपरणे असल्याने तो काहीसा शेतकºयासारखाही दिसतो. कोण असेल? मनात आडाखे सुरू असतात. कार्यक्रम जसजसा पुढे सरकत जातो तो आणखी ओळखीचा वाटू लागतो. घरी परतताना मात्र तो आपल्यातीलच एक असल्याची जाणीव स्पर्शून जाते. हा सामान्य माणसाचा पुतळा. त्याला नाव नाही आणि जात- धर्मही सांगता येत नाही. ‘जनमंच’चा हा कार्यक्रम त्याच्यासाठीच. एरवी तो कुठल्यातरी गर्दीत बिनचेहºयाने, ओळख लपवत वावरत असतो. आता उजाडेल, मग उजाडेल, या भाबड्या आशेने लोंढ्यामागे फरफटत जात असतो. पाच वर्षांतून एकदाच त्याला मोल येते. एव्हाना तो थकलेला, निराश झालेला पण नव्या आशेने पुन्हा मतदानाला जाणारा. आपले भले कुणीच करू शकत नाही, याचे प्रत्यंतर त्याला पावलोपावली आलेले असते. त्याचे प्रश्न कधीच सुटत नाहीत. उलट दिवसेंदिवस ते भयप्रद होत असतात. तीच आश्वासने, त्याच भूलथापांना तो हरक्षणी बळी पडतो. पोलिसाला चिरीमिरी दिल्याशिवाय त्याला अजूनही न्याय मिळत नाही. बँकेत कर्जासाठी सुरू असलेले हेलपाटे संपलेले नाहीत. डोनेशन दिल्याशिवाय त्याच्या मुलाला शाळेत उभे केले जात नाही. थोडक्यात उपेक्षा, अपमानाशिवाय त्याचे जगणे अपूर्णच.
गावात रस्ता नाही, शाळा आहे पण मुलांसाठी जागा नाही. विहीर आहे पण पाणी नाही. मुलांपेक्षा गुरुजींनाच शाळा सुटायची अधिक घाई. आरोग्य केंद्रातील डॉक्टर-नर्स गावात थांबायला तयार नाही. शेवटी करावे तरी काय? आपल्या मनातील सारा असंतोष तो असाच गिळून टाकतो. एक-दोन एकर शेती आहे पण नांगरण्यासाठी बैल नाही आणि नांगरही नाही. कुणी येते का त्याच्या मदतीला? तो शेवटी थकून जातो आणि आत्महत्या करतो. बापाच्या पाठी आपले कसे होईल, या विवंचनेत मग त्याची मुलगीही गळफास घेते. लाखाच्या मोर्चात तिचा टाहो कुणालाही ऐकू येत नाही. ज्यांना निवडून दिले ते आपले मायबाप तरी व्यथित होतात का ? नाही! कसे होणार? कारण ते फुटबॉल खेळण्यात दंग असतात. सामान्य माणूस मग तो खेड्यातला किंवा शहरातला त्याची होरपळ अशीच जीवघेणी. शहरातला माणूसही असाच नागवलेला. घराचा नकाशा मंजूर करण्यासाठी त्याला महापालिकेत लाच द्यावीच लागते. घरासमोरच्या सिमेंट रस्त्याच्या कामात शेण खाणाºया ठेकेदाराला तो काहीच म्हणू शकत नाही. मोहल्ल्यातील दारू दुकानाच्या त्रासासाठी त्याला लोकप्रतिनिधींचे पाय धरावे लागतात. तो लढत नाही की पेटूनही उठत नाही. अतिरेक झाल्यानंतरच जागे व्हायचे, एरवी निद्रिस्त राहायचे. त्याचेही काय चुकले? एकटा माणूस मोडून पडतो, पराभूत होतो. त्याला कापून काढणे सोपे असते. पण, हीच सामान्य माणसे परिवर्तनासाठी एकत्र आली तर... त्यासाठीच हे ‘जनमंच’ आहे.
विदर्भातील सामान्य माणसांची प्रामाणिक चळवळ म्हणून ‘जनमंच’बद्दल साºयांनाच आदर आहे. जनमंचच्या जनेरिक औषध चळवळीची दखल अमीर खानला घ्यावी लागते. ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याकडे साºया देशाचे लक्ष वेधले जाते ते जनमंचमुळेच. आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ही संघटना धडपडते. या संघटनेतील कार्यकर्तेही कधीकाळी गर्दीतील. आता मात्र ते कुणासमोर वाकत नाहीत. वैयक्तिक जीवनातही ते नीतिमूल्ये जपतात. मेडिकल, तहसील कार्यालयात अडल्यानडल्यांना मदत करताना ते दिसतात. सामान्य माणूस आनंदी राहावा, यासाठीच त्यांची ही धडपड आहे. त्या माणसासाठी प्रार्थना म्हणजे जनमंचच्या व्यासपीठावरील हा पुतळा. विदर्भ साहित्य संघाच्या भिंतींवर ‘म्युरल’ तयार करताना एक हाडकुळा कलावंत दिसतो, त्या किशोर पवारने हा पुतळा तयार केला. ‘सामान्य माणसाच्या मनात परिवर्तनाआधी असंतोष निर्माण झाला पाहिजे’, असे गांधींनी सांगून ठेवले आहे. तो पुतळा त्या महात्म्याच्या अंतर्मनातील असंतोषाचा प्रतिनिधी. त्याच्या कल्याणातच स्वातंत्र्याचा खरा अर्थही सामावलेला आहे.

Web Title: Dispute representative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.