भेदाभेद अमंगळ
By Admin | Updated: May 25, 2016 03:24 IST2016-05-25T03:24:49+5:302016-05-25T03:24:49+5:30
अंत:करण विशाल असणाऱ्यांना वसुधा म्हणजे पृथ्वी एक कुटुंबासारखी आहे़ मी सुद्धा विशाल अंत:करणाचा आहे़ स्त्री-पुरुष, लहान-मोठा, जात-पात, गरीब-श्रीमंत, अडाणी-सुशिक्षित असले कुठलेच

भेदाभेद अमंगळ
- डॉ.गोविंद काळे
‘उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम्।’
अंत:करण विशाल असणाऱ्यांना वसुधा म्हणजे पृथ्वी एक कुटुंबासारखी आहे़ मी सुद्धा विशाल अंत:करणाचा आहे़ स्त्री-पुरुष, लहान-मोठा, जात-पात, गरीब-श्रीमंत, अडाणी-सुशिक्षित असले कुठलेच भेद पाळले नाहीत़ सर्वांना समान वागणूक़ सर्वांचे स्वागत एकाच पद्धतीने़ सकलासी येथे आहे अधिकाऱ ‘दे धरू-सर्वांस पोटी’ अशी सर्वांना कवेत घेणारी माझी विशाल भावना़ भूत, भविष्य आणि वर्तमानातही मी बदललो नाही. मी खरेच बोलत आहे़
ज्या धर्मराजाची महती तुम्ही जगाला सांगता त्याने सुद्धा ‘नरो वा कुंजरो वा’ म्हणून असत्याचा आधार घेतला. माझे मात्र एकच ब्रीद ‘सत्यमेव जयते’़ खोटे कशासाठी? काय साधणार त्यातून? मी म्हणजे थकलेल्या जीवाचे विश्रांतीस्थाऩ चिरकाल विश्रांतीसाठी लोक माझाच आश्रय घेतात. जीवनात सुखावलेले माझ्याकडे येण्यासाठी किंचित टाळाटाळ करतात; परंतु माझे स्थान त्यांनाही अपरिहार्य आहे़ कंटाळलेले मात्र माझ्याकडे येण्यासाठी आतुर असतात़ साऱ्या रंजल्या-गांजल्यांचा मी परमसखा आहे़ मैत्री मी जपली आहे आजपर्यंत़
‘अहो जग पुढे गेले/आता सारे बदलले’ अशी कवनं माणूस करतो आणि बदलत्या जगाची दखल घेतो़ जो कधीच बदलत नाही, अशा माझ्यासारख्याची दखल घेणारा महामानव अजून तरी दृष्टिपथात नाही़ दु:ख काय माणसालाच होते? वेदना काय फक्त तुम्हालाच होतात? अंतिम यात्रेत सहभागी होणाऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून माझे सुद्धा डोळे क्षणिक गहिवरतात़ उन्हाळ्यात उकाडा असतो म्हणून तुम्ही वैतागता़ पावसाळ्यात पावसाने कहर केला म्हणून ओरड तर थंडीत कुडकुडायला होते म्हणून तुमची तक्राऱ अरे! ज्याने ही सुंदर सृष्टी निर्माण केली त्याची सुद्धा तक्रार सांगता़ तुमचे रडगाणे संपणार कधी? कर्तव्याला जागणार कधी? मला कर्तव्य कर्मातून मुक्ती नाही़ भगवंताला रडकी लेकरं आवडत नाहीत़ त्याला मनापासून आवडतो तो स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञाची सारी लक्षणे केवळ माझ्या आणि माझ्याचकडे विद्यमान आहेत कायमस्वरूपी़
भगवंताला सुद्धा मीच प्रिय आहे़ स्वत:बद्दल इतके अभिमानपूर्वक बोलणे म्हणजे आत्मगौरव ठरतो; परंतु माझाही नाईलाज आहे़ माझ्याबद्दल गौरवोद्गार काढणारा अजूनपर्यंत जन्मास आला नाही म्हणून चार वाक्ये बोललो. क्षमस्व! अरे! नाव सांगायचे राहूनच गेले़ माझे नाव स्मशाऩ
यो न दृश्यति न द्वेष्टि
न शोचति न कांक्षति।
शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य:
स मे प्रिय:॥