चर्चेची गुऱ्हाळं...
By Admin | Updated: June 11, 2015 00:33 IST2015-06-11T00:33:34+5:302015-06-11T00:33:34+5:30
दोन वर्षांत ज्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा ‘मुहूर्त’च जुळून आला नाही, जो येईल की नाही याची स्वत: साहित्य महामंडळालादेखील खात्री नाही

चर्चेची गुऱ्हाळं...
दोन वर्षांत ज्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा ‘मुहूर्त’च जुळून आला नाही, जो येईल की नाही याची स्वत: साहित्य महामंडळालादेखील खात्री नाही, त्या संमेलनाच्या चर्चेची गुऱ्हाळं साहित्य विश्वात रंगू लागली आहेत. जगभरात मराठी भाषक विखुरला गेला आहे. त्याची भाषिक अस्मिता जोपासण्याच्या नावाखाली विश्व साहित्य संंमेलनाचा हा भव्य ‘इमला’ रचण्यात आला. मात्र, आयोजक आणि महामंडळ यांच्यातील समन्वयाअभावी या संमेलनाचा पायाच खचत चालल्याचे दिसत आहे. टोरॅन्टो (कॅनडा) आणि जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) येथे होणाऱ्या नियोजित साहित्य संमेलनांनंतर ही बाब प्रकर्षाने समोर आली. ‘बाकी कशाचेही सोंग करता येते पण पैशाचे येत नाही’असे म्हणतात, त्यामुळे शासनाने २५ लाख रुपयांचे अनुदान देण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे विश्व साहित्य संमेलन भारताबाहेर घेण्याची कवाडं जवळपास बंदच झाली आहेत. म्हणूनच की काय ‘पदरी पडलं नि पवित्र झालं’ या उक्तीप्रमाणे यंदाच्या वर्षी साहित्य महामंडळाने विश्व साहित्य संमेलनासाठी अंदमानच्या आलेल्या प्रस्तावावरच समाधान मानायचे ठरवले आहे. पण विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी न मिळालेल्या ज्येष्ठ कवींना मात्र ही गोष्ट काहीशी ‘जिव्हारी’च लागल्याचे दिसते. दुष्काळामुळे ना. धों. महानोर यांनी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारणे सयुक्तिक वाटत नसल्याचे कारण पुढे करीत हे अध्यक्षपद नाकारले असल्याचे जाहीर केले आहे. परंतु, दुष्काळाचा संदर्भ विश्व साहित्य संमेलनाशी जोडण्यामागचा महानोरांचा हेतू सुस्पष्ट होत नाही. ज्या वेळी साहित्य महामंडळाने टोरॅन्टोसाठी महानोरांची अध्यक्षपदी निवड केली होती, तेव्हाही दुष्काळसदृशच परिस्थिती होती. मग तेव्हा त्यांना दुष्काळाची दाहकता जाणवली नाही का? ते स्वत: शेतकरी असल्याने त्याबाबतची संवेदनशीलता जशी त्यांच्या लेखनातून अनुभवायला मिळते तशी मग आचरणात का दिसली नाही? तेव्हाच त्यांनी अध्यक्षपद नाकारणे अपेक्षित होते. महानोर हे प्रतिभावंत कवी आहेत, यात कुणाचेच दुमत नाही! पण एकंदरच त्यांच्या विचार आणि वर्तणुकीमध्ये वक्तव्यांमधूनच विसंगती आढळत आहे. विश्व साहित्य संमेलन निधीअभावी बंद पडण्याची शक्यता अधिक असल्याने अध्यक्षपदी निवड होऊनही ते भूषविण्याची संधी न मिळाल्याचा सल नको किंवा उगाच चर्चेला अधिक खतपाणी नको, म्हणून तर ना.धों.नी हा पवित्रा घेतला नाही ना, अशा शंकाही उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे त्यामागचे ‘गूढ’ कायम आहे! ज्याची सत्यता त्यांनाच अधिक अवगत आहे. तूर्तास विश्व साहित्य संमेलन होवो की न होवो त्याच्या ‘बिनबुडाच्या’ चर्चांनी साहित्य विश्वातील वातावरण मात्र चांगलंच ढवळून निघत आहे...