‘डिजिटल’ फुगे!
By Admin | Updated: November 5, 2015 03:18 IST2015-11-05T03:18:02+5:302015-11-05T03:18:02+5:30
आभासी दुनियेच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या गुगलच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रोजेक्ट लून’ची प्रायोगिक तत्वावर चाचणी घेण्यास, भारत सरकारने अखेर मंजुरी दिली आहे.

‘डिजिटल’ फुगे!
आभासी दुनियेच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या गुगलच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रोजेक्ट लून’ची प्रायोगिक तत्वावर चाचणी घेण्यास, भारत सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात इंटरनेटचा प्रसार करणे हे गुगलचे स्वप्न आहे आणि त्यासाठी त्या कंपनीने महाकाय फुग्यांचा वापर करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. हेलियम हा हवेपेक्षा हलका असलेला वायू भरलेले महाकाय फुगे वातावरणातील ‘स्ट्रॅटोस्फिअर’ थरामध्ये स्थिर करून, फुग्यांमध्ये बसविलेल्या अँटिनांच्या साहाय्याने इंटरनेट सिग्नलचे ग्रहण व प्रक्षेपण करणे, असे हे तंत्रज्ञान आहे. असा एक फुगा जमिनीवरील सुमारे ४० चौरस किलोमीटर भागात इंटरनेट सेवा पुरवू शकतो. सुदूर भागांमध्ये इंटरनेट पोहचविण्यासाठी, विद्यमान तंत्रज्ञानाच्या तुलनेत हे नवे तंत्रज्ञान अत्यंत स्वस्त पडते. चाचणी यशस्वी होऊन या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाल्यास, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘डिजिटल इंडिया’च्या स्वप्नाला पंख नव्हे, तर फुगे लागू शकतात! नव्या, समर्थ भारताचे स्वप्न साकारण्यात, ‘डिजिटल इंडिया’ प्रकल्प खूप महत्त्वाची भूमिका अदा करू शकतो. त्यामुळे ‘प्रोजेक्ट लून’ची चाचणी खूप महत्त्वाची आहे. दुर्दैवाने प्रत्यक्ष चाचणीस प्रारंभ होण्यापूर्वीच त्यासंदर्भात शंकाकुशंका व्यक्त करणे सुरू झाले आहे. या फुग्यांच्या माध्यमातून हेरगिरी होऊ शकते, भारतातील संवेदनशील स्थळांबाबतची माहिती आयतीच विदेशी शक्तींच्या हाती लागू शकते आणि त्यामुळे देशाची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, अशा प्रकारचे आक्षेप घेतल्या जाऊ लागले आहेत. गुगल केवळ तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार असून, प्रत्यक्ष इंटरनेट सेवा मात्र भारतीय संचार निगम लिमिटेड ही सरकारी कंपनी उपलब्ध करून देणार आहे, या वस्तुस्थितीकडे मात्र पद्धतशीर डोळेझाक केल्या जात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे विदेशी शक्तींना भारताची हेरगिरी करायचीच असल्यास, त्यासाठी अत्यंत शक्तिशाली कॅमेरे बसविलेले हेरगिरी उपग्रह अवकाशात घिरट्या घालतच असतात, हे विसरता कामा नये! भारताने १९९८ मध्ये केलेल्या दुसऱ्या अण्वस्त्र चाचणीच्या वेळी अमेरिकन उपग्रहाने त्या तयारीवर नजर ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि भारताने तो हाणूनही पाडला होता. याचाच अर्थ संवेदनशील गुपिते कशी जपायची, हे आपल्यालाही चांगले ठाऊक आहे. तेव्हा उगीच आपल्या ग्रामीण बांधवांना इंटरनेटशी जोडल्या जाण्याच्या मार्गातील धोंड बनण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही, हे उमजलेले बरे!