‘पवार स्कूल’चा ‘ढ’ विद्यार्थी...
By राजा माने | Updated: February 19, 2018 02:29 IST2018-02-19T02:29:10+5:302018-02-19T02:29:54+5:30
इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमके म्हणजे आमच्या यमगरवाडीचा मनकवडे अर्थात एम.के.! मुळात त्याला महागुरू नारदांनी मराठीभूमीतील स्टार रिपोर्टरपदावर बसविले होते ते त्याच्याकडे असलेल्या दिव्यशक्तीमुळेच

‘पवार स्कूल’चा ‘ढ’ विद्यार्थी...
इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमके म्हणजे आमच्या यमगरवाडीचा मनकवडे अर्थात एम.के.! मुळात त्याला महागुरू नारदांनी मराठीभूमीतील स्टार रिपोर्टरपदावर बसविले होते ते त्याच्याकडे असलेल्या दिव्यशक्तीमुळेच. चोप्रा-हिराणी-आमीर खानच्या ‘पी.के.’कडे जी हाताच्या स्पर्शाने सबकुछ जाणून घेण्याची शक्ती होती तीच दिव्यशक्ती! ती असूनही त्याच्या रिपोर्टिंगमध्ये जान नसल्याचा राग नारदांना असायचा. त्यात भर पडली ती बडोद्यात लक्ष्मीकांत देशमुखांनी निष्ठा-श्रद्धेने बांधलेल्या सारस्वत पूजेची. अगदी मेसेंजरपासून मारुती कांबळेपर्यंत आणि गो- विज्ञानापासून ते थेट मोदी राजाच्या कर्तव्य संहितेपर्यंत कुणाची म्हणून आरती उतारायची सोडली नाही लक्ष्मीकांतांनी! अहो, केवळ साहित्यिकच नव्हे तर भल्या भल्या समाजशास्त्र पंडितांची देखील बोटे कौतुकाने आपोआप तोंडात गेली! आजवर सारस्वतात जे घडत असायचे त्यापेक्षा वेगळे घडत असताना यमकेचे रिपोर्ट मात्र शिळे आणि सपक असल्याची भावना इंद्र्रदरबारी व्यक्त झाली.
त्याचाच परिणाम म्हणून नारदांनी यमकेची कानउघाडणी केली. दिव्यशक्तीचा जास्तीत जास्त वापर करण्याची तंबी दिली. परीक्षा म्हणून मराठी भूमीतील राजकीय स्कूलची माहिती घेण्याची नवी असाईनमेंट त्याला दिली. स्कूलचा विषय निघताच यमके म्हणाला, ‘‘गुरुवर्य, मी कोणत्या स्कूलपासून सुरुवात करू?’’
नारद : अरे मोठी परंपरा आहे. एसएम-डांगेंपासून ठाकरेंपर्यंत आणि पवारांपासून, चव्हाण-राणेंपर्यंत...
यमके : गुरुदेव, पवारांपासून सुरू करू का?
नारद : कर, पण दादा-ताई नाही तर थोरले पवार स्कूलपासून कर...
ही चर्चा सुरू असतानाच पवारांनी महाराष्टÑात विश्वासाने एकमेकांना साथ देण्याचा मंत्र देण्याची मोहीम सुरू केल्याची माहिती नारदांच्या व्हॉट्सअॅपवर येऊन पडली. ती वाचत असतानाच ‘ढोबळेंनी नितीनभाऊंचे पाय धरले’ ही बातमीही पोहोचली.
नारद : पवार स्कूलपासून सुरू कर. त्यात मधनंच शाळा सोडून गेलेल्या ढोबळेंपासून सुरुवात कर.
यमके : हे ढोबळे मला कुठे भेटतील?
नारद : अरे, मराठी भूमीत कोणत्याही मोठ्या नगरीत जा. मोक्याचाच भूखंड आणि महान विभूतींच्या नावाचा जिथे फलक दिसेल तिथे चौकशी कर.
यमके : चालेल. पण तिथेही नाही भेटले तर?
नारद : नागपुरात गडकरी वाड्यावर बघ. तिथे नाही भेटले तर सोलापुरात देशमुखांच्या नव्या वाड्यावर नक्की भेटतील.
यमके : पण ढोबळेच का, दुसरे कोणी चालणार नाही का?
नारद : ७० सालापासून या स्कूलने अनेक साम्राज्यसंपन्न विद्यार्थी दिले. त्यापैकी काही स्कूल आणि पवारांनाही सोडून गेले. पण जातीयवाद विरोधाचा जप आणि पुरोगामित्वाची माळ प्रत्येकाच्याच गळ्यात राहिली. मग लहानांचे पाय धरण्याचा धडा ढोबळेंनी कुठे बरे गिरवला?
यमके : ते ‘ढ’ विद्यार्थी कसे ?, वारकरी म्हणून लहानांचेही पाय धरण्याची परंपरा आहे ती माऊली !
- राजा माने