‘देवेंद्रजी, प्लीज... ’
By Admin | Updated: October 20, 2016 06:08 IST2016-10-20T06:08:06+5:302016-10-20T06:08:06+5:30
देशाची राज्यघटना हा देश व सरकार या दोहोंएवढाच नागरिकांनाही प्रमाण असणारा महान ग्रंथ आहे.

‘देवेंद्रजी, प्लीज... ’
देशाची राज्यघटना हा देश व सरकार या दोहोंएवढाच नागरिकांनाही प्रमाण असणारा महान ग्रंथ आहे. त्यातील कलमांशी (नियमांशी) विसंगत असलेले धर्मनियमदेखील दुरुस्त करण्याची प्रक्रिया गेली अनेक वर्षे देशात व विशेषत: न्यायव्यवस्थेत सुरू आहे. वारसाहक्क, जमीनमालकी, विवाहसंबंध, उत्पन्न व खर्च या एकेकाळी खासगी व धर्मसंबद्ध मानल्या गेलेल्या गोष्टींतही घटनेच्या कायद्यानुसार बदल झाले आहेत. त्यामुळे स्वाभाविकच घटना हा देशातील सर्वश्रेष्ठ व सर्वमान्य असणारा मान्यताप्राप्त ग्रंथ आहे. तो सरकारवर बंधने लादतो आणि नागरिकांनाही शिस्त लावतो. हे सारे ठाऊक असणारी समजूतदार सत्ताधारी माणसे जेव्हा राजसत्तेवर धर्मसत्तेचा वचक असावा असे म्हणतात तेव्हा ती घटनेला व घटनेने निर्माण केलेल्या व्यवस्थेला धर्माच्या व्यवस्थेहून कमी लेखत असतात. धर्म हीदेखील इतर व्यवस्थांप्रमाणेच एक व्यवस्था आहे. तिचे जसे रखवालदार आहेत तसे व्यवस्थापकही आहेत. धर्मसत्तेचा वचक वा तिचे वर्चस्व हे त्याचमुळे या रखवालदारांचे आणि व्यवस्थापकांचे वर्चस्व असते. त्याचमुळे कोणा ‘धर्माचे गादीधारी’ म्हणवून घेणाऱ्या इसमाच्या वाढदिवसाच्या सोहळ््यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सत्तेवर धर्माचे वर्चस्व असावे असे म्हटले असेल तर तो त्यांना टोकायला लावणारा विषय होतो. देवेंद्र फडणवीस म्हणजे मनोहर खट्टर नव्हे की प्रकाशसिंग बादल नव्हेत. त्या बिचाऱ्यांना त्यांची ‘समज’ लक्षात घेऊन एखादे वेळी माफ करता येते. फडणवीसांचे तसे नाही. ते चांगले सावध, जाणते व घटना आणि धर्म यांच्या संबंधांची माहिती असणारे अभ्यासू नेते आहेत. त्यांच्या सरकारने एखाद्या बुवाला वा बाबाला वाऱ्यामोलाने जमिनी द्याव्या, त्याच्या पायावर डोके ठेवून त्याचा स्वत:साठी आशीर्वाद घ्यावा (तशा एका ‘देवमाणसाने’ दिलेल्या हिरव्या खड्याच्या अंगठ्या आपल्या अनेक पक्षांचे पुढारी अजून प्रसाद भावनेने बोटात घातलेले दिसतात), त्यांच्या ‘सेवाभावी’ म्हणविणाऱ्या संस्थांना सरकारने देणग्या द्यायलाही हरकत नाही. मात्र त्यांना सरकार व घटनेने निर्माण केलेल्या व्यवस्था यावर वचक ठेवण्याचा निर्देश वा तशा सूचना देण्याचे कारण नाही. त्यातून ज्या बुवाबाबांचा आपण असा गौरव आज करतो त्यांचा पूर्वेतिहास व त्यांची वर्तमान आर्थिक स्थिती हीदेखील कधी काळी सरकार नावाच्या यंत्रणेने तपासून पाहाणे गरजेचे आहे. एके काळी ज्या बापूच्या पाया पडण्यात देशातली मोठी माणसे धन्यता मानत तो बापू नावाचा दुरात्मा सध्या तिहारच्या तुरुंगात नको तशा आरोपाखाली डांबला गेला आहे याचीही जाण सत्ताधाऱ्यांनी राखली पाहिजे. सारे जग सध्या धर्मसत्तांच्या स्वयंघोषित राखणदारांनी सामान्यजनांवर चालविलेल्या अत्याचारांच्या कहाण्यांनी हादरले आहे. अफगाणिस्तानपासून थेट ट्युनिशिया आणि नायजेरियापर्यंत धर्माच्या नावाने ज्या संघटना उभ्या झालेल्या दिसतात त्यांच्या अत्याचारांच्या कहाण्या आपण रोज दूरचित्रवाहिन्यांवर पाहतो. धर्म जेव्हा संघटित होतो आणि हाती शस्त्र घेतो तेव्हा त्याचे कशात रुपांतर होते याचा इतिहास मोठा आहे. जगाच्या इतिहासात नोंदविल्या गेलेल्या १४ हजार युद्धांपैकी १२ हजार युद्धे धर्माचे झेंडे खांद्यावर घेऊन लढविली गेली. ख्रिश्चन आणि इस्लाम यांच्यातले असे युद्ध तब्बल ७०० वर्षे चालू राहिले. एकट्या १४ व्या शतकात भारतात ४० लाख माणसे अशा तथाकथित धर्मयुद्धात मारली गेली. ही युद्धे केवळ हिंदू वा मुसलमानांतली नव्हती. शैव आणि वैष्णवांतलीही होती. अन्य धर्मांच्या वर्चस्वासाठीही त्यांच्या राजांनी ती लढविली होती. एवढे सारे रक्तपात ओलांडल्यानंतर देशाच्या वाट्याला आताचे घटनात्मक लोकशाहीचे दिवस आले आहेत. ते तसे राखावे हे देशाच्या राज्यकर्त्यांचे आद्यकर्तव्य आहे. पुन्हा एकवार ते कोणा थोतांडांच्या हाती देणे हा घड्याळाचे काटे उलटे फिरविण्याचा प्रकार आहे. देवेंद्र फडणवीस तरुण आहेत, त्यांच्या हाती आज महाराष्ट्राचे सरकार असले तरी उद्या आणखी मोठे दायित्व येण्याच्या शक्यता आहेत. त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षा मोठ्या आहेत. त्यांचे स्वरुप पुरोगामीपणाचे व विकासाचे आहे. त्यामुळेच त्यांना आवर्जून सांगायचे ते हे की, ‘देवेंद्रजी, प्लीज असे काही बोलू नका’ .... जाता जाता एक आठवण येथे सांगाविशी. १९६० मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत डेमॉक्रेटिक पक्षाचे उमेदवार जॉन एफ केनेडी यांना एका वाहिनीने प्रश्न विचारला. ‘तुम्ही रोमन कॅथलिक असल्याने तुम्हाला पोप सर्वतोपरी पूज्य आहेत. उद्या पोपची आज्ञा आणि अमेरिकेची घटना यात विसंगती आली तर तुम्ही काय कराल’ केनेडींनी त्या प्रश्नाला दिलेले उत्तर होते ‘मी आरंभी, अखेरीस आणि सदैवच देशाच्या घटनेला बांधलेला असेन. या घटनेहून श्रेष्ठ असा कोणताही कायदा जगात नाही आणि कोणी आपल्या कायद्याला ईश्वराचे नाव दिले तरीही मी तसे मानणार नाही.’