देशी भाषांच्या उद्धारासाठी अवतरला ‘देव’!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 09:01 PM2018-12-08T21:01:29+5:302018-12-08T21:02:09+5:30

गणेश देवी यांनी भारतीय भाषांना हुडकून काढण्याचा हा संकल्प सोडला आहे, त्यात त्यांना जवळजवळ ७८० भाषांचा ‘शोध’ लागला; त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले.

development of native languages! | देशी भाषांच्या उद्धारासाठी अवतरला ‘देव’!

देशी भाषांच्या उद्धारासाठी अवतरला ‘देव’!

Next

- राजू नायक

गणेश देवी यांच्या उपस्थितीत शनिवारी गोवा कला व साहित्य संमेलनात ‘गोव्यातील भाषा’ या खंडाचे प्रकाशन झाले. भाषातज्ज्ञ गणेश देवी यांनी देशातील एकूण एक भाषांचे वैशिष्टय़ आणि त्यांचे गुणविशेष संग्रहित करण्याचा संकल्प सोडला आहे आणि त्याच अंतर्गत ‘गोव्यातील भाषा’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले आहे. डॉ. माधवी सरदेसाई यांनी या ग्रंथासाठी योगदान दिले. गणेश देवी यांनी भारतीय भाषांना हुडकून काढण्याचा हा संकल्प सोडला आहे, त्यात त्यांना जवळजवळ ७८० भाषांचा ‘शोध’ लागला; त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले.

ते म्हणाले : मला भाषांचा शोध घ्यायचा होता; आणि नकळत मी भाषांच्या घनदाट जंगलात पोहोचलो. तेथे वेगवेगळ्या भाषांचे आवाज, चिवचिवाट कानावर पडले. वेगवेगळे चित्कार आणि अद्भूत अशी ती दुनिया होती..

प्रकाशन सोहळ्यात गोवा खंडाच्या मुखपृष्ठावर ‘बोलणा-या वृक्षा’ची प्रतिमा आहे. त्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की भारत सरकारने देशातील केवळ १८ भाषांना मान्यता दिली आहे. याचा अर्थ या वृक्षाच्या वेगवेगळ्या फांद्या असल्या तरी त्यातील अवघ्याच फांद्यांना पाणी घालण्यात आले; व इतरांना मरण्यासाठी सोडून देण्यात आले..

‘‘या मृतवत होत असलेल्या भाषांना संरक्षण द्यावे, त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाचा व त्याद्वारे निरनिराळ्या प्रांतांतील भाषांचे ग्रंथ प्रकाशित करण्याचा आहे. ‘‘देवींच्या प्रकल्पामुळे ७८० भाषांची नोंद झालीय, शिवाय त्यातील ४२ भाषा मृत्युपंथाला लागल्या होत्या. या भारतीय भाषा ६८ लिपींमध्ये लिहिल्या जातात. देशात ३५ भाषांमध्ये वृत्तपत्रे प्रसिद्ध होतात; त्यात हिंदी सर्वाधिक वापरली जाते. त्यानंतर बंगाली, तेलगू, मराठी (६-९ टक्के) व तमिळ भाषांचा क्रमांक लागतो. आकाशवाणीचे १२० भाषांमध्ये कार्यक्रम होतात.

केवळ हिमाचल प्रदेशातच १६ भाषा बोलल्या जातात व ‘हिमाला’च त्यांच्याकडे २०० शब्द आहेत. राजस्थानच्या वाळवंटात ओसाड जमिनीचे वर्णन करण्यासाठी असंख्य शब्द आहेत. या वाळवंटामधील भटक्या जमातींची एकेकाळी ब्रिटिशांनी गुन्हेगारी समाज म्हणून अवहेलना केली होती; त्यातून त्यांची स्वत:ची ‘गुप्त’ भाषा तयार झाली आहे. मुंबईच्या निकट पश्चिम किना-यावर देवींना पोर्तुगीज भाषेची एक कालबाह्य शैली सापडली. अंदमान निकोबारच्या पूर्व भागात ब्रह्म देशातील कारेन ही एक पुरातन भाषा सापडली. गुजरातमधील एका भागात स्थानिक लोक जपानी बोलतात व देशाच्या अनेक भागांत स्थानिक लोक आपली मातृभाषा म्हणून विदेशी भाषा बोलतात.

देवी सच्चे गांधीवादी आहेत आणि उच्चार स्वातंत्र्याचे भोक्ते आहेत. मी त्यांच्या ‘भाषा’ प्रकल्पाला बडोदा येथे भेट दिली व त्यानंतर त्यांनी तेथून २०० कि.मी. अंतरावर सुरू केलेल्या आदिवासी प्रकल्पालाही भेट दिली होती. परंतु गुजरातमधील धार्मिक कलहाने ते उद्विग्न बनून सहिष्णू आणि सर्वधर्म समभावाचा वसा त्यांनी घेतला. ते सध्या कर्नाटकातील धारवाड येथे वास्तव्य करतात; परंतु समविचारी लेखक विचारवंतांचे ऐक्य निर्माण करण्याचा हेतू त्यांनी बाळगला आहे. सध्या देशातील ‘सुजाण, विवेकी व सहिष्णू भारताच्या’ बुद्धिवादी चळवळीचे ते नेतृत्व करतात.

ते म्हणाले : कोकणी भाषेचा खंड लवकरच प्रसिद्ध होणार असून जी भाषा अवघ्या काही वर्षापूर्वी भाषाच नाही तर ती बोली म्हटले जायचे, तिचा विकास विस्मयचकित करणारा आहे.

देशात अशा अनेक भाषा आहेत. त्या भाषा जिवंत ठेवण्यासाठी देवी यांनी एक यज्ञच सुरू केला आहे. त्यांच्या या प्रकल्पात ३५०० संशोधक, शिक्षक व कार्यकर्ते काम करीत असून बरेच जण कोणतेही मानधन न स्वीकारता कार्य करतात. भाषा हे कोणत्याही संस्कृतीचे सौंदर्य असते. भाषा मृत पावलेला माणूस सैरभैर होतो व काही ठिकाणी तर त्याने नक्षलवादालाही जन्म दिला आहे. भाषांची श्रीमंती ओळखणे व त्यांच्या उन्नतीसाठी झटणे हे संस्कृती संवर्धनाचेच महान कार्य आहे असे मानले पाहिजे. डॉ. देवी यांच्या या कार्याला शुभेच्छा!

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत. )

Web Title: development of native languages!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा