वैचारिक हत्त्येचा असा तपास ?
By Admin | Updated: March 10, 2015 22:53 IST2015-03-10T22:53:00+5:302015-03-10T22:53:00+5:30
कॉ.गोविंदराव पानसरे यांच्यावर खुनी हल्ला चढविणाऱ्यांचा तपास ‘योग्य दिशेने’ सुरू असल्याचे संजीव कुमार दयाल या पोलीस महासंचालकांनी

वैचारिक हत्त्येचा असा तपास ?
कॉ.गोविंदराव पानसरे यांच्यावर खुनी हल्ला चढविणा-याचा तपास ‘योग्य दिशेने’ सुरू असल्याचे संजीव कुमार दयाल या पोलीस महासंचालकांनी कोल्हापुरात सांगितले असले आणि त्यांच्या सगळ्या सहकारी अधिकाऱ्यांनी त्यावर माना डोलविल्या असल्या तरी त्याने कोणाचे समाधान होणार नाही. अशी आश्वासने मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारच्या प्रवक्त्यांनी आजवर अनेकदा दिली. कोल्हापूरचे तरुण पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा हेही तसेच आजवर सांगत आले. पण कार्यकर्त्यांना व विशेषत: वैचारिक भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्यांना ठार करणारी माणसे साधी चोर वा गुंड असत नाहीत. चुकीच्या का होईना पण तीही काही वैचारिक निष्ठा बाळगणारी असतात. त्यांच्या तशा निष्ठांचा पाठपुरावा करणाऱ्यांचा एक वर्गही नेहमीच त्यांच्यासोबत असतो. कधीकधी त्यांच्या मागे काही संघटना उभ्या असतात. प्रत्यक्ष खुनाच्या वेळी त्या काहीशा गप्प राहिलेल्या दिसल्या तरी त्यांचे आपल्या उद्दिष्टपूर्तीचे काम सुरूच असते. ही माणसे अशा खुनांचे महत्त्व कमी करून सांगण्याची व त्याच्या तपासाला वा चर्चेला विपरीत फाटे फोडण्याची आपली कारवाई कधी थांबवीत नाहीत. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला एक वर्षाहून अधिक काळ लोटला. सरकार त्यांचे खुनीही अजून शोधतच राहिले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना वाकुल्या दाखवीत दाभोलकरांच्या भूमिकांची कुचेष्टा करणाऱ्यांनी त्यांचे काम या काळात थांबविल्याचे दिसले नाही. दाभोलकरांचा खून ही त्यांच्यासाठी एक आनंदाची बाब असावी असेच त्यांचे वर्तन राहिले आहे. पोलिसांच्या यंत्रणा त्यांना हात लावण्याचे धाडस करीत नाहीत आणि दाभोलकरांच्या समर्थकांना आश्वासने देऊन त्यांचे समाधान करण्याचे कामही थांबवीत नाहीत. तोच प्रकार आता पानसऱ्यांबाबत सुरू झाला आहे. पानसरे गुन्हेगार नव्हते. त्यांच्यामुळे कोणाच्या मालमत्तेचे वा जीविताचे नुकसान झाले नव्हते. ते एक ठाम मताचे पुरोगामी विचारवंत होते. त्यांच्या विचारप्रसाराने हैराण होणाऱ्यांचा एक वर्ग होता. त्या वर्गाने जोपासलेल्या आंधळ्या श्रद्धांवर प्रकाशाचा झोत टाकण्याचे काम पानसरे करीत होते. तसे करताना ते इतिहासाचा, वर्तमानाचा आणि अगदी पुराणग्रंथांमधील सत्यांचाही आधार घेत होते. परिणामी आपल्या खोट्या श्रद्धांना चिकटून राहणाऱ्यांची फार गोची होत होती. त्यांना आपल्या भूमिकांचे समर्थन करणे अवघड होत होते आणि त्याविषयी गप्प राहणेही जमत नव्हते. अशा माणसांच्या आंधळ्या श्रद्धांवर काही बुवाबाबांची आसने उभी असतात. ती आसनेही पानसऱ्यांसारख्यांच्या भूमिकांमुळे डळमळू लागलेली असतात. अशा सगळ्या अस्वस्थांची अडचण ही की ते दाभोलकर-पानसऱ्यांसारख्यांना गप्प बसवू शकत नाहीत. अंधश्रद्धांच्या निर्मूलनाचे व खऱ्या लोकजागरणाचे त्यांनी घेतलेले व्रत ते त्यांना सोडायला लावू शकत नाहीत. मग अशा लोकांसमोर त्यांची तोंडे बंद करण्याचा एकच मार्ग उरतो. ‘खून.’ खून ही जगातली सर्वात मोठी सेन्सॉरशिप आहे असे म्हणतात. जे बोलणे वा लिहिणे कशानेही थांबविता येत नाही ते खुनाने थेट संपविताच येत असते. मग दाभोलकर मारले जातात आणि पानसऱ्यांचाही खून होतो. ‘पोलीस तपास योग्य दिशेने चालू आहे’ म्हणजे तो या दिशेने चालू आहे काय? पानसऱ्यांचे वैचारिक शत्रू वा त्यांच्या विचारांनी अस्वस्थ झालेले लोक या तपासाच्या प्रकाशझोतात आहेत काय? अशा माणसांना ठाण्यात आणून त्यांची चौकशी कधी कोणी केली काय? जी माणसे पानसऱ्यांच्या भूमिकांची त्यांच्या मृत्यूनंतरही खिल्ली उडवताना दिसली त्यांना हासडून सत्य काय ते विचारण्याचे काम पोलिसांनी केले काय? पानसऱ्यांचा खून निश्चितपणे व ठरवून झाला आहे. खून करायला आलेल्यांनी ‘तुम्हीच पानसरे काय’ असे त्यांना विचारून व तेच पानसरे असल्याची खात्री करून हा खून केला आहे. ठरवून केलेल्या या तथाकथित ‘वैचारिक हत्त्ये’चा तपासही तसाच व्हायला हवा. एखादा चोर वा दरोडेखोर पकडण्यासाठी लावतात तसे सापळे येथे लावणे चुकीचे आहे. तथाकथित वैचारिक भूमिका घेणारी व पानसऱ्यांच्या भूमिकांना विरोध करणारी माणसेच अशावेळी तपासयंत्रणांच्या डोळ्यांसमोर असली पाहिजेत. अशी माणसे राजकीय बळ घेतलेली असतात. त्यांच्या मागे संघटनाच नव्हे तर पक्षही असतात. राजकारणाला त्यांची भीती वाटते. राजकारण व समाजकारणातले वर्गही त्यांना सांभाळून घेणारे असतात. अशावेळी पोलीस यंत्रणांना जास्तीचे सक्षम व डोळस व्हावे लागते. प्रसंगी राजकीय व सामाजिक दबाव झुगारावे लागतात. पुढाऱ्यांना नाराज करावे लागते. महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणेत तसे बळ असावे असे दाभोलकर प्रकरणानंतर कुणाला वाटले नाही. त्यात त्या यंत्रणेची नामुष्कीही मोठी झाली. ती बदनामी धुवून काढण्याची संधी त्या यंत्रणेला पानसरे यांच्या खुन्यांचा तपास करून मिळू शकणारी आहे. मात्र हा तपास त्याच्या खऱ्या व उघड दिसणाऱ्या दिशेनेच व्हावा लागेल. अन्यथा पानसरे यांच्या एका श्रद्धांजली सभेत कोणा मुलीने म्हटलेले ‘खुनी तुमच्या खिशात असताना तुम्ही हे तपासाचे नाटक कुठवर करणार आहात?’ हे वाक्यच खरे ठरेल आणि ते केवळ पोलीस यंत्रणेची नव्हे तर साऱ्या सरकारचीच वस्त्रे उतरवून ठेवणारे असेल.