विध्वंस जन्माला घालणारं गाव!

By Admin | Updated: August 2, 2015 04:56 IST2015-08-02T04:56:14+5:302015-08-02T04:56:14+5:30

शेकडो संशोधक गायब झाले. रोज चालत-बोलत वेगवेगळ्या संशोधन कार्यशाळांमध्ये शोध लावण्याची धडपड करणाऱ्या तरुणांची ही फळी दिसेनाशी झाली. ही फळी येत्या काही महिन्यांत

Destruction is a village born! | विध्वंस जन्माला घालणारं गाव!

विध्वंस जन्माला घालणारं गाव!

- पवन देशपांडे

शेकडो संशोधक गायब झाले. रोज चालत-बोलत वेगवेगळ्या संशोधन कार्यशाळांमध्ये शोध लावण्याची धडपड करणाऱ्या तरुणांची ही फळी दिसेनाशी झाली. ही फळी येत्या काही महिन्यांत काय जन्माला घालणार आहे, याची कोणालाही पुसटशी कल्पना नव्हती... त्यांनी भलामोठा विध्वंस प्रसवला आणि जगाला त्यांची, त्यांच्या देशाची ताकद कळली... नेमके कुठे होते हे संशोधक ?

सिक्रेट मिशनसाठी लॉस अलामोस या गावाचं नावही बदलण्यात आलं. सुरुवातीला या गावाचं नाव ठेवलं गेलं ‘द हिल’. त्यानंतर लष्करासाठी हे गाव होतं ‘साईट वाय’ आणि अखेर कोणालाही कळू नये म्हणून याला थेट ‘पोस्ट बॉक्स नंबर १६६३’ असं नाव दिलं गेलं आणि पत्ता होता... ‘पोस्ट बॉक्स नंबर १६६३, सँटा फे, एनएम.’

चोहीबाजूंनी डोंगररांगा. त्यावर उंचउंच झेपावणारे पाइनची झाडं. झाडांच्या खाली काही म्हातारे होऊन आणि काही अवेळी पडलेले पाइन कोन. वळणावळणाचा रस्ता. कुठे आडवळणावरून छोटीशी नदी वाहताना दिसायची. मधेच ती नदी एखाद्या मोठ्ठ्या खडकाने अडवलेली असायची. त्यावर पहुडणारे पर्यटक दिसायचे. भलामोठा हाय-वे आणि त्यावरून १२० किमीच्या वेगाने धावणारी आमची कार. आम्ही एका विध्वंस प्रसूतीच्या ‘शोधशहरा’पासून जाणार होतो, अशी पुसटशी कल्पनाही नव्हती. अमेरिका सरकारने आयोजित केलेल्या अभ्यासदौऱ्यादरम्यान आम्ही ‘सँटा फे’ नावाच्या कलेच्या माहेरघराकडे निघालो होतो. आमच्यासोबत डोना नावाची मध्यम वयाची एक गाइडही होती. बोलकी आणि त्या परिसराचा संपूर्ण इतिहास तोंडपाठ असलेली बाई मधूनमधून त्या परिसरातील विनोदही ऐकवायची. एका वळणावर अचानक एक चेकपोस्ट लागलं. तिथं लिहिलं होतं, ‘‘परवानगीशिवाय आणि ओळखपत्राशिवाय प्रवेश निषिद्ध.’’ हा बोर्ड पाहिला आणि या गावात असं काय, असा आम्हा साऱ्यांनाच प्रश्न पडला. तिथून त्या गावाची ओळख सुरू झाली. ते गाव होतं लॉस अलामोस.
नावात तसं काहीच नाही. इतर कोणत्याही गावासारखं गाव. पण तिथे प्रवेश निषिद्ध करण्याचं वेगळं कारण होतं. डोनानं सांगितलेली माहिती थक्क करणारी होती. कारण हे होतं विध्वंसाला जन्म घालणारं गाव. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेनं हिरोशिमा आणि नागासाकी या जपानमधील शहरांवर जे अणुबॉम्ब टाकले ते बॉम्ब प्रसवणारं गाव. १९४२पर्यंत हे गाव तसं फार नावाजलेलं नव्हतं. कधीकाळी ज्वालामुखीच्या अनेक उद्रेकांतून तयार झालेल्या हेमस पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं हे गाव. या गावात काही आदिवासी जमाती, काही स्थानिक अमेरिकन लोक, काही स्पॅनिश लोक गुण्यागोविंदानं नांदत होते. इथल्या एका जमीनदाराने त्याच्या जमिनीपैकी भलीमोठी जमीन डेट्रॉइटचे श्रीमंत व्यावसायिक अ‍ॅश्ले पाँड (द्वितीय) यांना विकली. त्यांनी नंतर त्या जागेवर अमेरिकेतील श्रीमंतांच्या मुलांसाठी एक शाळा उभारली. तिचं नाव होतं लॉस अलामोस रांच स्कूल. भल्यामोठ्या शाळेत १२ ते १६ वर्षांचे केवळ ४६ विद्यार्थी शिकायचे. पण १३ आॅगस्ट १९४२नंतर इथलं चित्र पालटलं. या गावावर अमेरिकन सरकारची नजर पडली. या गावात शिरायला एकच रस्ता. एका बाजूने शिरणारा आणि दुसऱ्या बाजूने निघणारा. शाळेच्या मोठ्या इमारती उभ्या होत्या. शिवाय पर्वतरांगांच्या कुशीत असल्यानं आणि शेकडो मैलांपर्यंत समुद्रकिनारा नसल्यानं हे गाव एका सिक्रेट मिशनसाठी निवडलं गेलं. ते मिशन होतं अणुबॉम्ब तयार करण्याचं. अमेरिकन लष्कराच्या मॅनहॅटन इंजिनीअरिंग डिस्ट्रिक्टने हे अख्खं गाव विकत घेतलं. ताब्यात घेतलं आणि गावाचं चित्र पालटलं. जागोजागी अमेरिकन सैन्य दिसायला लागलं. वेगवेगळं साहित्य घेऊन येणारे शेकडो ट्रक दिसू लागले. नव्या इमारतींचं बांधकाम सुरू झालं. या ट्रकमध्ये काय आहे, हे कोणालाच कळू नये म्हणून त्यावर साध्यासाध्या साहित्याची लेबलं लावली गेली. काही दिवसांत शेकडो तरुण संशोधक आपल्या नातेवाइकांना, मित्रांना कुठे जातोय हे न कळवता कुटुंबासह राहायला आले.
हे एक सिक्रेट मिशन होतं. अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडनं मिळून हाती घेतलेलं अणुबॉम्ब तयार करण्याचं मिशन. त्याला अमेरिकेनं ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’ असं नाव दिलं. संशोधकांना हाताशी धरून अमेरिकेनं दोन अणुबॉम्ब तयार केले. छोट्या बॉम्बचं नाव होतं ‘लिटिल बॉय’ अन् मोठ्या बॉम्बचं नाव होतं ‘फॅट मॅन’. या दोन्ही विध्वंसक बॉम्बने लाखोंचा जीव घेतला. नंतर मात्र याची सल काही शास्त्रज्ञांनी बोलून दाखवली. काहींनी तशीच मनात दडवून ठेवत अमेरिकेत संशोधन सुरू ठेवलं. काही शांततेच्या मार्गावर आले. भारत स्वतंत्र झाला त्या १५ आॅगस्ट १९४७च्या दिवशीच लॉस अलोमास या गावानं मुक्तीचा श्वास घेतला. कारण अमेरिकन सरकारचं अणुबॉम्ब बनविण्याचं मिशन पूर्ण झालेलं होतं आणि त्यांनी हा प्रोजेक्ट संपल्याचं जाहीर केलं होतं.
हे सारं सांगत असताना गाईड डोना, अमेरिकेनं केलेल्या या विध्वंसाचं ओझं घेऊन बोलत असल्याचं मात्र जाणवत होतं.

(लेखक लोकमत मुंबई आवृत्तीचे मुख्य उपसंपादक आहेत.)

Web Title: Destruction is a village born!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.