गोमाता से ‘राष्ट्रमाता’

By Admin | Updated: December 23, 2015 23:25 IST2015-12-23T23:25:19+5:302015-12-23T23:25:19+5:30

गाय या दुभत्या चतुष्पाद प्राण्यास सारे भारतीय तसे गोमाता म्हणून संबोधतच असतात. पण केवळ ती दूध देते म्हणून नव्हे तर तिच्या उदरात तेहतीस कोटी देवांची वस्ती असते म्हणूनही ती गोमाता

'Deshmata' from Gomata | गोमाता से ‘राष्ट्रमाता’

गोमाता से ‘राष्ट्रमाता’

गाय या दुभत्या चतुष्पाद प्राण्यास सारे भारतीय तसे गोमाता म्हणून संबोधतच असतात. पण केवळ ती दूध देते म्हणून नव्हे तर तिच्या उदरात तेहतीस कोटी देवांची वस्ती असते म्हणूनही ती गोमाता! अर्थात हे देव हिन्दु धर्मीय ज्यांना देव मानतात तेच असतात उघड आहे. पण गायीचे केवळ दूधच नव्हे तर तिच्यापासून मिळणारे गोमूत्र आणि गोमय हे द्रव आणि घन पदार्थदेखील (?) तितकेच उपयोगी ठरत असल्याने गायीला इत:पर केवळ गोमाता म्हणून संबोधत राहून त्यावरच समाधानी न राहता तिला आता राष्ट्रमाता म्हटले पाहिजे व तसा दर्जाही दिला गेला पाहिजे अशी एक सूचनावजा मागणी म्हणे लोकसभेत एका सदस्याने केली आहे. गायीच्या पोटात देव असतात म्हणून अनेक भाविक तिला स्पर्श करुन तिच्यातील देवांचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हां बहुधा खुद्द गायीला आपल्या उदरातील रहस्याची जाण नसल्याने तिच्या सान्निध्यात जाऊ पाहाणाऱ्या भक्तांना तिच्या लत्ताप्रहाराचा प्रसाद ग्रहण करणे बऱ्याचदा भाग पडत असते. गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळाल्यानंतर हा प्रसाद ग्रहण करण्याची अहमहमिका सुरु होईल आणि मग सोय म्हणून संसदेच्या आणि विविध राज्यांच्या विधिमंडळांच्या आवारात गायी बांधून ठेवण्याची खास व्यवस्था करावी लागेल. तसेही देशातील काही मुख्यमंत्र्यांनी आपल्या सरकारी निवासस्थानांमध्ये गायींचे खास गोठे बांधून घेतलेच आहेत. रामदासांच्या काळात बहुधा गायींना इतके महत्व नसावे. अन्यथा त्यांनी ‘श्रीमंताघरचे श्वान, त्यास सारे देती मान’ असे न लिहिता ‘श्रीमंताघरची गाय तिला सारे मानिती आपुली माय’ असे काहीसे लिहून ठेवले असते. तसेही गायीला अलीकडच्या काळात जरा जास्तीचेच महत्व प्राप्त झाल्याने ‘याहू’ या पोर्टलने कालपरवाच गायीला ‘पर्सनॅलिटी आॅफ दि इयर’ म्हणून जाहीर केले आहे. वर्षभरात माध्यमे कोणत्या विषयाची वा व्यक्तीची अधिक चर्चा करतात आणि सामान्य लोक कोणत्या विषयाची अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतात त्या निकषावर हा बहुमान दिला जात असतो. गोमांस भक्षण, त्यावर लादले गेलेले निर्बन्ध, पाठोपाठचे दादरी प्रकरण आणि दणाणून गेलेली संसद या साऱ्यांच्या निमित्ताने गेल्या वर्षभरात गाय लोकचर्चेचा विषय बनून राहिली व अनेक मातब्बर द्विपादांना मागे सारुन तिने प्रभावी होण्याचा मान पटकावला. राष्ट्रमाते तुला वंदन!

Web Title: 'Deshmata' from Gomata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.