मेक इन इंडिया विरुध्द दिल्लीचे जेएनयु
By Admin | Updated: February 20, 2016 02:31 IST2016-02-20T02:31:36+5:302016-02-20T02:31:36+5:30
देशाच्या दोन भागात, तरुणांशी संबंधित दोन घटना एकाच आठवड्यात घडल्या. पहिली, दिल्लीत जेएनयुच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची होती. दुसरी घटना मुंबईतली.

मेक इन इंडिया विरुध्द दिल्लीचे जेएनयु
अतुल कुलकर्णी, (वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत)
देशाच्या दोन भागात, तरुणांशी संबंधित दोन घटना एकाच आठवड्यात घडल्या. पहिली, दिल्लीत जेएनयुच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची होती. दुसरी घटना मुंबईतली. उद्योग विश्वाशी संबंधित जवळपास ५० हजार प्रतिनिधी मेक इन इंडियाच्या निमित्ताने एकत्र आले. आठवडाभर चाललेल्या उद्योग प्रदर्शनाला भेट देण्यासाठी तरुणांनी लक्षणीय गर्दी केली. या दोन घटनांचे पडसाद दोन वेगवेगळ्या पध्दतीने उमटताना दिसत आहेत. दिल्लीतल्या घटनेवरुन तमाम बुध्दिजिवींमध्ये अस्वस्थता पसरल्याची चर्चा सोशल मीडियातून सुरु असताना दुसरीकडे हा तरुण स्वत:चा उद्योग कसा सुरु करायचा हे समजून घेण्यासाठी मेक इन इंडियात उभारण्यात आलेल्या कॉर्पोरेट मंत्रालय विभागाच्या दालनापुढे रांगा लावून उभा होता.
मेक इन इंडियात किती कोटींचे करार झाले, त्यांचे पुढे काय होणार, प्रत्यक्षात किती उतरणार, यावर पुढचे काही महिने चर्चेच्या फैरी झडतील. याआधीच्या सरकारने असे एमओयू केले होते. त्यांचे पुढे काय झाले हा सवाल आता सत्तेत असणाऱ्या, तेव्हाच्या विरोधकांनी केला होता. तोच प्रश्न आताचे विरोधक विचारु लागले आहेत. (पुण्याजवळच्या उद्योग विश्वात कोणत्या पक्षाच्या आमदारामुळे अस्वस्थता पसरली होती आणि त्याच्यावर तुम्ही तुमच्या पध्दतीने जी कारवाई करायची ती करा, असे कोणत्या नेत्याने विद्यमान मुख्यमंत्र्याना सांगितले होते याचीही चर्चा या निमित्ताने व्हायला हरकत नाही) मात्र या सो कॉल्ड इव्हेंटने काय साध्य केले, याचा सारासार विचार, पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून केला पाहिजे. चांगल्याला चांगले आणि चुकीला चूक ठामपणे म्हणावे लागेल. ज्या पध्दतीने तरुणांची गर्दी या संपूर्ण परिसरात होती, ज्या रितीने ते विविध दालनांमधून माहिती घेत फिरत होते ते पाहिले तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांना त्यांच्या भविष्याचा विचार करणारी यंत्रणा हवी आहे.
‘शार्क टँक’ नावाचा कार्यक्रम एका चॅनलवर येतो. अमेरिकेतले काही प्रख्यात उद्योजक एकत्र येतात आणि तरुण पिढींच्या उद्योगविषयक कल्पना तपासतात.
त्या आवडल्या तर त्यांच्या कल्पना खऱ्या करण्यासाठी त्यांना भांडवलही पुरवतात. असाच खेळ ‘मेक इन इंडिया’त रंगला. तरुणाना कोणत्या कल्पना सुचतात, त्यासाठी ते कसा विचार करतात यावर स्पर्धा ठेवण्यात आली. मुंगी शिरायला जागा नव्हती एवढी गर्दी तिथे होती. वेअर हाऊसिंग सॉफ्टवेअरसाठी राजेश मनपट या तरुण उद्योजकाने ‘आर्क रोबोट’ या त्याच्या कल्पनेचे सॉफ्टवेअर अवघ्या सहा मिनिटात सादर केले. त्यावर उपस्थित उद्योजकांच्या पॅनलने त्याला अनेक प्रश्न विचारले. त्यात राजेश केवळ विजयी झाला नाही तर त्याची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याला तब्बल दोन कोटी रुपयांचा धनादेशही बक्षीस म्हणून तत्काळ देण्यात आला. याच कार्यक्रमात उत्कृष्ट स्पर्धक कोण यासाठी उपस्थित प्रेक्षकांकडून एसएमएस मागविण्यात आले व त्यातून आनंद मदनगोपाल हा तरुण विजयी ठरला.
सरकार कोणत्या पक्षाचे आहे याचे या तरुण पिढीला घेणेदेणे नाही. त्यांच्या कल्पनांना बळ देणारी व्यवस्था त्यांना हवी आहे. ती जो कोणी देईल त्याच्यासोबत जाण्यास कोणालाही ना नाही. सगळ्यात जास्त केंद्रीय संरक्षण विभागाच्या स्टॉल्सवर गर्दी होती. त्यांना लागणाऱ्या यंत्रसामुग्रीसाठी आम्ही पूरक उद्योग म्हणून काय करु शकतो याची विचारणा ते तरुण करत होते.
मेक इन इंडियात आठ लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी २५९४ एमओयू महाराष्ट्राने केले. त्यातले खरे किती, खोटे किती, फसवे किती, हे येणारा काळच सांगेल. मात्र या निमित्ताने राज्यातल्या उद्योग विश्वात एक सकारात्मक वातावरण तयार झाले आहे व ते जास्त महत्वाचे. देशातल्या उद्योग जगतातले एकही नाव असे नव्हते जे तिथे आले नाही. १७ राज्ये आपापली दालने घेऊन आली. येणारा काळ उद्योगांच्या मागे लागून आपापल्या राज्यात उद्योग खेचून नेण्याचा आहे. या उद्योगवारीत जे आले त्या प्रत्येकाने काही ना काही कमाई केली. जे आले नाहीत त्यांनी काय गमावले हे त्यांचे त्यांना ठाऊक.
महाराष्ट्राने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र यातून खूप काही कमावले. राज्यभर चांगले वातावरण तयार करण्यात त्यांना यश मिळाले. १०२ देशातून आणि जवळपास २० राज्यातून हजारो लोक आले. त्यांनी मुंबईत जो पैसा खर्च केला, त्यातून काही काळ जो रोजगार तयार झाला त्याचे मूल्य कशातही करता येणार नाही. टॅक्सीवाल्यापासून ते हॉटेल इंडस्ट्री पर्यंत सगळ्यांसाठी ही पर्वणी होती. जेएनयुमध्ये तरुण विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहून डावे, उजवे जे काही राजकारण चालू आहे त्याच्या उलट चित्र मुंबईत होते. येथे येणारा तरुण जेएनयुमुळे ना अस्वस्थ होता ना या देशात आपले कसे होईल याचा विचार त्याला त्रस्त करत होता. त्याच्या डोक्यातल्या कल्पनांना कुठे आणि कसा वाव मिळेल याचाच शोध घेत तो फिरताना दिसत होता. त्यांच्यासाठी आपण काहीतरी करतो आहोत हे त्यांच्याच भाषेत सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आज तरी बाजी मारली आहे. आठ लाख कोटींच्या एमओयूपैकी २० टक्के जरी वास्तवात उतरले तरी ती रक्कम १ लाख ६० हजार कोटींच्या घरात जाते. फडणवीस हे करु शकले तर त्यांच्यासारखे यशस्वी तेच. आज तरी ते या निमित्ताने प्रचंड यशस्वी झाले आहेत.