करातांनीही बळ घटविले, मग राहुलनाच दोष का?
By Admin | Updated: April 20, 2015 23:21 IST2015-04-20T23:21:36+5:302015-04-20T23:21:36+5:30
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी मावळते सरचिटणीस प्रकाश करात यांचे समर्थन लाभलेल्या व आपल्यापेक्षा वयाने पंधरा वर्षे वडील असलेल्या एस.रामचन्द्र पिलाई

करातांनीही बळ घटविले, मग राहुलनाच दोष का?
हरिष गुप्ता
(‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर)
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी मावळते सरचिटणीस प्रकाश करात यांचे समर्थन लाभलेल्या व आपल्यापेक्षा वयाने पंधरा वर्षे वडील असलेल्या एस.रामचन्द्र पिलाई यांना पराभूत करून सीताराम येचुरी विजयी झाले. विशाखापटणम येथे पार पडलेल्या पक्ष काँग्रेसच्या एकविसाव्या अधिवेशनात ही निवड झाल्यानंतर आता येचुरी खरोखरीच पक्षात काही बदल घडवून आणू शकतील तरच या निवडीला काही अर्थ प्राप्त होणार आहे. येचुरी तसे दिल्लीकर. सेन्ट स्टीफन्स कॉलेजमध्ये शिकलेले आणि त्यांच्या तेलुगू या मातृभाषेशिवाय हिन्दी आणि बंगालीत सफाईने बोलू शकणारे. दिल्लीच्या सत्ता वर्तुळातला त्यांचा वावरदेखील दिवंगत माजी सरचिटणीस हरकिसनसिंग सुरजित यांच्यासारखाच. तुलनेत पिलाई त्यांच्या जवळपासही फिरकू न शकणारे.
करात आणि येचुरी यांची तुलना करायची तर येचुरी बदलत्या काळाशी जुळवून घेणारे. करात मात्र पाश्चिमात्य, सौम्य, सांप्रतच्या धकाधकीच्या राजकारणात गुदमरून जाणारे, पण तरीही पोथीनिष्ठ कम्युनिस्ट. शालेय जीवनात करातांनी एका निबंध स्पर्धेसाठी टोकिओ आॅलिम्पिकवरती आपला निबंध पाठविला आणि टोकिओचे विमान तिकीट पदरात पाडून घेतले. चेन्नईच्या मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये अर्थशास्त्र शिकत असताना, त्यांना एडिम्बरो शिष्यवृत्ती मिळाली. तिथेच त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले व तिथेच त्यांची व्हिक्टर किर्नन या मार्क्सवादी तत्त्ववेत्त्याची भेट झाली. मायदेशी परतल्यानंतर ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अध्यापन करू लागले व तेव्हांच त्यांनी स्टुडन्टस फेडरेशन आॅफ इंडिया या डाव्या विद्यार्थी संघटनेची स्थापना केली. करातांना जवळचे असे कोणी मित्र नाहीत. पण जे आहेत त्यांच्यात हिन्दूचे संपादक एन.राम वा देशाचे माजी अर्थमंत्री पी.चिदम्बरम यांच्यासारख्यांचा समावेश आहे. परदेशी शिक्षण, कामगार जगताविषयी अपार श्रद्धा पण भारतातील श्रमिकवर्गाविषयी मात्र पूर्णत: अनभिज्ञ हे जे काही जुन्या कम्युनिस्टांचे वैशिष्ट्य होते, त्यांच्याच पठडीत करात बसतात. दिल्लीतल्या राजकीय कुरघोड्यांच्या राजकारणात पारंगत असलेल्या सुरजित यांच्याकडून पदभार स्वीकारणारे करात या साऱ्यापासून तसे अलिप्तच होते. त्यांनी संपुआला पाठिंबा देण्याचे मान्य केले आणि पक्षाला वैचारिक व आंतरिक पातळीवर उद्ध्वस्त करून टाकले. मनमोहनसिंग सरकारच्या सुधारणांच्या रेट्यात अशा अनेक गोष्टी होत्या की ज्यांना पक्षातल्या त्यांच्यासारख्याच अनेकांचा विरोध होता. शिवाय या सर्व गोष्टी पक्षाचा शत्रूस्थानी असलेल्या अमेरिकेच्या बाजूने झुकणाऱ्या होत्या. मनमोहनसिंग यांनी २००८ साली अमेरिकेसोबत नागरी अणु ऊर्जा करारावर सही केली त्याच वेळी कॉँग्रेस आणि भाजपा या दोहोंशी सहकार्य न करता पक्षाचे वेगळेपण जपण्याची करातांना संधी होती. त्यांनी यूपीएचे समर्थन मागे घेताच पश्चिम बंगालमधील पक्षाच्या मुख्य विरोधक असलेल्या तृणमूल कॉँग्रेसने त्यांची खिल्ली उडवली. पण पक्षातही अनेकांचे डोळे विस्फारले गेले. केवळ अणुऊर्जा करारावर सही केली म्हणून सरकारच्या बाहेर पडणे हा मूर्खपणा असल्याचा पक्षातल्याच काहींचा अभिप्राय होता. त्यांच्या मते चीननेसुद्धा अमेरिकेसोबत काही करार केलेच होते. असा विचार करणाऱ्यांमध्ये येचुरीदेखील होते. त्यामुळे त्यांच्यात आणि करातांमध्ये एक दरी निर्माण झाली. पक्षाच्या दिल्लीतल्या मुख्यालयातही दोघांच्या खोल्या स्वतंत्र आणि सभागृहातील जाण्यायेण्याच्या त्यांच्या वेळादेखील भिन्न.
येचुरी उत्कृष्ट संसदपटू आहेत, त्यांनी करातांची कॉँग्रेस तसेच भाजपाविरोधी मते कट्टरपंथी ठरवीत खोडून काढली आहेत. पश्चिम बंगाल आणि केरळात पक्षाची बांधणी मजबूत असूनही २००४च्या ६० खासदारांवरून आता नऊ अशी पक्षाची जी पीछेहाट झाली, त्यामागे ७०च्या दशकात जालंधर येथील बैठकीत ठरलेल्या राजकीय व्यूहाच्या मर्यादा असल्याचे समजावून सांगण्याची संधी करात शोधत होते. पण येचुरींनी त्यांच्या युक्तिवादात पर्यायी मार्गावर भर दिला आणि जालंधर बैठकीत ठरलेल्या मर्यादांमध्ये चुकीचे काहीच नव्हते हे सांगितले. त्यांच्या मते, पक्षाच्या पीछेहाटीला नेत्यांचा व्यक्तिवादच कारणीभूत होता व करात हे त्याचे उदाहरण होते.
२००८ साली पक्षाने कॉँग्रेसशी नाते तोडले व परिणामी तृणमूल कॉँग्रेसने कॉँग्रेसशी संधान बांधत पश्चिम बंगालमधील ३४ वर्षांची कम्युनिस्ट राजवट ध्वस्त करून टाकली. पक्षाच्या अनेकांनी मग करातांविषयीच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यांच्या मते करात हे पुस्तकी पंडित आणि गर्विष्ठ व स्टॅलिनच्या प्रभावाखाली असल्याने जागतिक बदलांच्या बाबतीत प्रतिकूल होते.
पश्चिम बंगालमध्ये २०११ सालपासून पक्षाची सदस्य संख्या कमी होत चालली असून, त्यामागे पक्षाचे कालबाह्य विचार हे कारण आहे. पक्षाचे नेतृत्व लोकशाही परंपरा पाळीत असले तरी तिथे स्टॅलिनची गुंतागुंतीची यंत्रणासुद्धा आहे. पक्षाकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत नाही, कारण खासगी संस्था विद्यार्थ्यांना त्याची परवानगी देत नाहीत. अशा वेळी पक्ष शिक्षणक्षेत्रातील खासगीकरणाला आव्हान देऊ शकेल काय? दुसऱ्या बाजूला नोकऱ्या आणि विद्यापीठातील आरक्षण हे हिंदू धर्मातल्या मागासलेल्या जातींपर्यंत मर्यादित आहे, पण इतर धर्मीयांना त्यासाठी विनंती करावी लागत आहे, कारण त्यांच्या धर्मात जाती संस्था नाही. कम्युनिस्ट पक्ष येचुरींच्या नेतृत्वाखाली धर्मनिरपेक्षतेच्या अस्तित्वासाठी लढा देऊ शकेल काय?
करातांकडून येचुरींकडे आलेले नेतृत्व एका जुन्या गोष्टीची आठवण करून देते. १९६४ साली संसदीय निवडणुुकांमध्ये सहभागी होणार नाही असे म्हणणाऱ्या कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियापासून वेगळे होत कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाच्या (मार्क्सवादी)ची स्थापना झाली. पण १९६७ साली निवडणुका लागल्या, तेव्हा त्यांनीच उमेदवार उभे केले. त्यावेळी नागी रेड्डीने (जो नंतर नक्षलवादी झाला) पक्षाचे महासचिव पी.सुंदरय्या यांना ऐकवलेकी, ते जे सांगतात ते अशुद्ध इंग्रजी आहे. कुतर्क आणि विचारांमधील चुका शोधणे हे भारतीय कम्युनिस्टांचे वैशिष्ट्यच आहे. करातांची हीच विशेषत: आहे. कथनीपेक्षा करणीवर जास्त भर दिला तर येचुरींना पक्ष डोक्यावर नक्कीच घेईल.