काळोख व्यापलेले...
By Admin | Updated: November 10, 2014 01:55 IST2014-11-10T01:55:56+5:302014-11-10T01:55:56+5:30
विश्वात स्थिर असे काहीच आही. येथे नित्य परिवर्तन घडत राहते. नित्यनूतनता हा विश्वाचा एक गुणधर्म आहे. माणूस हा अशा विश्वाचा एक घटक आहे

काळोख व्यापलेले...
अमर हबीब
विश्वात स्थिर असे काहीच आही. येथे नित्य परिवर्तन घडत राहते. नित्यनूतनता हा विश्वाचा एक गुणधर्म आहे. माणूस हा अशा विश्वाचा एक घटक आहे, जेथे कणाकणात क्षणाक्षणाला बदल घडतात. कालपेक्षा आजचे जीवन वेगळे असावे, ही माणसाची स्वाभाविक वृत्ती. त्यामुळे त्याची सतत धडपड सुरू असते. या धडपडीलाच आपण जीवनाचा संघर्ष म्हणतो. प्रत्येक माणसाचे जीवन वेगळे असल्यामुळे या संघर्षाला अनेक दिशा असतात. वाटेत अडथळे आले, की बहुतेक लोक पाण्याच्या नियमाप्रमाणे दिशा बदलतात. दिशा बदलल्यानंतरही तोच वा त्याच प्रकारचा अडथळा समोर आला तर? जेव्हा अनेक लोकांच्या जीवनसंघर्षात सारख्या प्रकारचे अडथळे येतात, तेव्हा पाणी तुंबू लागते. काठांवर आदळत अनेक पिढ्या बरबाद होऊन जातात. जीवन थांबू शकत नाही, अशा वेळेस नवी वाट पाडावी वा काढावी लागते. हे काम साधी-सर्वसामान्य माणसेच करतात. नेते, महात्मे, मार्गदर्शक वगैरे या धडपडीला शब्दरूप देतात. चळवळी या लोकआकांक्षा व्यक्त करतात. आंदोलने त्यांना मागणीत रूपांतरित करतात. सत्ता तिचे रूपांतर कायद्यात करते. सुदृढ समाजात हा प्रवास सुरळीत चालतो. रोगी समाजात अडथळे येतात व पाणी तसेच तुंबून राहते. चळवळी व आंदोलने होतात, पण सत्ता बधत नाही. समाजाला गतिमान ठेवण्यात मुख्य अडथळा सत्तेचा असतो.
हजारो वर्षे आम्ही स्वकियांचे गुलाम होतो. शेकडो वर्षे परकीय राजेशाहीने आमच्यावर राज्य केले. शंभरएक वर्षे ब्रिटिशांचे साम्राज्य होते. गेली ६०-६५ वर्षे लोकशाही अनुभवतो आहोत. शेतीवर पोट असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनात काही फरक पडला का? स्वकीय पाहिले, परकीय पाहिले, राजेशाही पाहिली, साम्राज्यशाही पाहिली, हुकूमशाही पाहिली, लोकशाही पाहिली, आजही दुष्काळ पडला की शेतकरीच देशोधडीला लागतात. त्यांच्यावरच आत्महत्या करण्याची पाळी येते. साथ यावी तशा आत्महत्या होतात. अशी आत्महत्यांची साथ कधी नोकरदार, व्यापारी, कारखानदारांमध्ये आल्याचे मी ऐकले नाही. सत्ता स्वकियांची असो की परकियांची, साम्राज्यशाही असो की लोकशाही, या पक्षाची असो की त्या पक्षाची, मरतो शेतकरीच. भारतातील शेतकरी समाज हजारो वर्षांपासून कोंडलेल्या अवस्थेत होता आणि आजही आहे. त्याच्या विकासाची वाट अडवून दुसऱ्याच्या पाण्याला वाट करून देण्यात आली आहे. अर्ध्याहून अधिक शरीर विकलांग ठेवून जसा माणूस धडधाकट राहात नाही तसेच अर्ध्याहून अधिक समाजाला दरिद्री ठेवून देश प्रगती करू शकत नाही.
इबोला आफ्रिकेत झाला तरी बाकीच्या जगाचाही थरकाप उठतो. आफ्रिकेतील आजाराने जगभर चिंता पसरते, कारण आफ्रिकेत गेलेला कामगार भारतात परततो तेव्हा इबोला घेऊन येण्याची शक्यता असते. तो परतताना विमानात बसलेल्या अन्य देशातील प्रवाशांनादेखील संसर्ग होऊ शकतो. आपल्याला इबोला होऊ नये, याची काळजी घेणे हा पहिला टप्पा. उपाय शोधणे दुसरा. इबोलावरील उपाय शोधून काढण्यासाठी आज सगळे जग एकवटले दिसते. शेतकरी कुंठीत राहिला, तर त्याचा परिणाम तुमच्यावर होणार नाही, असे कसे होईल? शेतकरी ग्राहक होणार नसेल, तर तुमचे औद्योगीकीकरण विकलांग राहते. गरजू समाजातील प्रशासन भ्रष्ट होते. दुबळ्यावर डल्ला मारणारे व्यापारी निपजतात. शेतकरी विकलांग ठेवून देश समर्थ करता येत नाही. शेतकऱ्याला मोकळी वाट व्हावी, यासाठी शेकडो नव्हे, हजारो वर्षांपासून तो वाट पाहत आहे. इबोलाच्या उपायासाठी जसे सगळे जग एकवटले तसे शेतकऱ्यांच्या मुक्तीसाठी एकत्र येण्याची गरज आहे. होय, शेतकऱ्यांच्या परिस्थितीत काही बदल जरूर झालेले आहेत. त्यांचा जरा खोलात जाऊन विचार केला, तर असे लक्षात येईल, की नकारात्मक बदलांना सरकार कारणीभूत ठरलेले आहे आणि सकारात्मक बदलांना तंत्रज्ञान! शेतीच्या क्षेत्रात झालेल्या बहुतेक बदलांना प्रामुख्याने तंत्रज्ञान कारणीभूत ठरले व काही बदलांना आंतरराष्ट्रीय परिस्थिती कारणीभूत ठरली. शासन जवळपास नेहमीच मारक ठरले आहे.
यंदा दुष्काळ आ वासून उभा आहे. आग लागली तर जशी अम्ॅब्युलन्स धावून येते. तसे सरकार आले पाहिजे.
दुष्काळनिधीचा योग्य वापर व्हावा, यासाठी नोकरशाहीवर विसंबून न राहता तंत्रज्ञानाची मदत घेतली पाहिजे. पण एवढ्यावर थांबून चालणार नाही. दुसरा टप्पा महत्त्वाचा आहे. दुष्काळाशी मुकाबला करण्याचे जे बळ शेतकऱ्याकडून हिरावून घेण्यात आले आहे, ते त्यांना परत मिळाले पाहिजे. म्हणजे अडवलेले पाणी मोकळे केले पाहिजे. जे जीवघेणे कायदे करून ठेवले आहेत (उदा. जीवनावश्यक वस्तूंचा कायदा, जमीन धारणेचा कायदा, जमीन अधिग्रहणाचा कायदा आदी) रद्द करावे लागतील. शेतकऱ्यांच्या कैवाराची नुसती भाषा करून चालणार नाही. आता पुरत्या कडेलोटाची वेळ आहे. निर्णायक कृतीची वेळ आहे. कैवारीदेखील मारेकऱ्यात सामील झालेले आहेत. आशेचा किरण कोठून दिसेल कुणास ठाऊक?