दंगल-मंगल
By Admin | Updated: March 14, 2015 00:45 IST2015-03-14T00:45:50+5:302015-03-14T00:45:50+5:30
शुभ आणि मंगल. अशुभ आणि दंगल. मंगल नेहमीच सद्गुणी तर दंगल नेहमी तमोगुणी. दंगल-मंगल हे दोन्ही गुण येतात कुठून? जसं बीज तसं झाड.

दंगल-मंगल
विजयराज बोधनकर,
शुभ आणि मंगल. अशुभ आणि दंगल. मंगल नेहमीच सद्गुणी तर दंगल नेहमी तमोगुणी. दंगल-मंगल हे दोन्ही गुण येतात कुठून? जसं बीज तसं झाड. जशी माणसं तसा गाव. जसा विचार तसा प्रचार. जशी माय-बाप तशी मुलं. जेवढं शिक्षण तेवढीच नोकरी. जेवढे कष्ट तेवढेच यश स्पष्ट. अशीच एक सत्यकथा अनुभवलेल्या आईबापाची.
नवराबायको जेमतेम शिकलेले. नवरा दारूडा. बायको जगाच्या दृष्टीने भरकटलेली. तीन मुलं, एक मुलगी इतका त्यांचा परिवार. मोठा मुलगा दहावी नापास. बाकीचे दोघे जेमतेम. मुलगी आठवी नापास. काय करायचं शिकून ! हा आईबापाचा मंत्र. पोरंही तशीच झाली. चलो धंदा करो पैसा लाओ! म्हणून मोठा मुलगा बापाचा धंदा सांभाळू लागला. बापाचा धंदा लायटर दुरुस्त करून देण्याचा. तेवढ्यावर घर चालायचं. हळूहळू पुढची दोन मुले मोठी झाली. दिशा नसल्यामुळे उनाड होत गेली. एकाने लोकांचा पैसा गोळा करून दाम दुप्पटचा धंदा चालू केला. चांगले वीस लाख जमवून पोबारा केला. काही दिवसातच पोलिसांनी पकडला. जेलात घातला. कसाबसा पाच वर्षांनी सुटला. सुटल्यावर घेणेकऱ्यांनी मनसोक्त तुडवला. शेवटी मुलगा वाया गेला. तिसराही मुलगा तसाच निघाला. कुणालातरी मारून यायचा. रोज माणसं घरावर यायची. मग न्यायनिवाडे! मुलगी आईवर गेली. कुणातरी मुलाबरोबर पळून जाणार होती म्हणून बापाने जातीच्या मुलाशी पटकन लग्न करून दिले. पण मुलगी वर्षभरात घरी परतली. दारुडा मुलगा रोज मारतो म्हणून घटस्फोट झाला. सर्वात मोठा मुलगा दारूच्या व्यसनापायी मेला. त्याची बायको विधवा झाली.
या छोट्याशा गोष्टीतून एकच उलगडा होतो तो म्हणजे... मुलांच्या आयुष्याचे मार्ग आईवडीलच बदलवितात. त्यांना अज्ञानी ठेवतात. मग सारेच आयुष्यभर दु:खाचा जेल •भोगतात. म्हणूनच जेव्हा बालगणेशाला पृथ्वी प्रदक्षिणा घालावयास सांगितले तेव्हा त्याने चक्क शिव-पार्वतीला प्रदक्षिणा घातल्या. ही पुराणातली गोष्ट ज्या आई-बापांना उमगली त्यांचं भलं झालं.
देव, नियती कुणाचंही वाईट करीत नसते. माणूस जे ठरवतो ते घडतं. कुणाला जगवायचं असेल तर माणूस त्याला जगवितो. कुणाला मारायचं ठरवलं तर त्याला तो मारतो. देवळात जाऊनही जे पालक देवासारखे वागत नाहीत त्यांच्या घरात नाश करणारे सर्वनाशीच जन्म घेतात. मातृदेवो-पितृदेवो भव: या मंत्राचा जागर जिथे असतो तिथे घराचंच देऊळ बनतं. जशी जिजाबाई तसे शिवराय. जसा चाणक्य तसाच चंद्रगुप्त. आईवडील हेच पहिलं विद्यालय जन्मभराच्या विद्येचं. उच्च शिक्षणानेच माणूस मोठा होतो असं नसून उत्तम संस्काराने माणूस मोठाच बनतो हे मात्र सत्य.