शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

‘धोकादायक’ वृक्षांची कत्तल झाली; पण अपघात थांबले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 08:10 IST

अपघातांना सर्वस्वी जबाबदार ठरवून वृक्षांची कत्तल केली जात आहे. चुकीचे गृहीतक आणि आधीच काढलेला निष्कर्षही चुकीचाच. परिणाम तर भोगावेच लागतील..

शेखर गायकवाड, संस्थापक अध्यक्ष, आपलं पर्यावरण, नाशिक

अलीकडे रस्ते अपघातांची संख्या प्रचंड वाढली आहे आणि त्यात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होते आहे हे खरेच; पण त्याला सर्वस्वी रस्त्यातली झाडेच जबाबदार आहेत का? मुळात ही ‘धोकेदायक’ झाडेच अपघातांना जबाबदार आहेत असे मानून वर्षानुवर्षांच्या, अगदी ज्या झाडांची शंभरी उलटली आहे, अशा झाडांची कत्तल करणे सुरू आहे. मुळात गृहीतकच चुकले आणि त्याचा निष्कर्षही आधीच काढून त्याप्रमाणे आपण कृती केली तर त्याचे आणखी भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागतील. अपघातांना जबाबदार धरून मोठमोठ्या वृक्षांची जी कत्तल सध्या सुरू आहे, त्याबाबत हेच दिसते आहे. 

बरे, मग ज्याठिकाणी ही झाडे मुळापासून उखडून, त्यांची कत्तल करून नवे रस्ते बांधले गेले, ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांचे रुंदीकरण केले, तिथले अपघात थांबलेत का? - तर तसे नाही. हे अपघात थांबलेले नाहीत. याचा अर्थ जिथे अपघात होत होते, त्याला सर्वस्वी रस्त्यातली झाडेच जबाबदार नव्हती. त्यामुळे या प्रश्नाकडे नव्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे आणि शक्य तितकी झाडे वाचवून रस्त्यांबाबत पुनर्विचार करणे गरजेचे आहे. लोकसंख्यावाढीमुळे आणि वाहनांची संख्या वाढल्यामुळे प्रत्येक शहराची रस्त्यांची गरज वाढली आहे. त्यामुळे रस्त्यांचे रुंदीकरणही अपेक्षित आणि गरजेचे झाले आहे. काही अपवादात्मक ठिकाणी शंभर-दीडशे वर्षांपूर्वीची काही झाडे रस्त्याच्या मध्यभागी, साईड मार्जिनमध्ये आहेत. त्यातील काही  वृक्ष नक्कीच काढण्याची गरज आहे व ते काढले पाहिजेत, पण काही वृक्ष आपण कल्पकतेने नक्कीच वाचवू शकतो. 

अपघात होतात त्यावेळी ज्या घरातला माणूस जातो, त्यांना खूप काही सहन करावे लागते, हे निर्विवाद सत्य, पण या अपघातांना जबाबदार धरून वृक्षांची सरसकट कत्तल करणेही तितकेच चुकीचे. वृक्षतोड करून भविष्यातल्या पिढीला काय वारसा देणार, असे आपण म्हणतो, पण वर्तमानातच त्याचे भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागल्याचे आपण सातत्याने पाहतो आहोत.  त्यासाठी काही गोष्टींचा साकल्याने विचार, आत्मपरीक्षण आणि  तशी कृती आपल्याला करावीच लागणार आहे. 

शहरातले रस्ते म्हणजे काही महामार्ग नाहीत; जिथे गाड्यांचा वेग ८० किलोमीटर प्रतितास असणे गरजेचे आहे. पण शहरातही वेगाने वाहने चालवली जातात. वेगमर्यादेचे हे बंधन स्वयंस्फूर्तीने पाळले जाणे गरजेचे आहे. रस्ता रुंदीकरण करताना ट्रॅफिक जाम न होता नागरिकांना त्या रस्त्यावरून मर्यादित वेगात सुरळीतपणे जाता येणे अपेक्षित आहे. शहरातल्या रस्त्यांवर बऱ्याच ठिकाणी रोज अपघात होतात व त्यात काही जणांना जीवही गमवावा लागतो. बऱ्याचदा सिग्नलवरही अपघात होतात, अतिघाई आणि सिग्नल तोडण्याचा अट्टाहास नडतो. अति वेगामुळे दुभाजक तोडून उलटलेली वाहने आपण पाहतो. मग अशा वेळेस सिग्नल बंद करायचे की दुभाजकच काढून टाकायचे? अपघातास ‘कारणीभूत’ ठरतात म्हणून इतक्या मेहनतीने उभी राहिलेली शंभर-दीडशे वर्षे वयाचे वृक्षच उखडून टाकणे किती शहाणपणाचे आहे? अशा वृक्षांच्या अलीकडे गतिरोधक टाकले आणि काही वृक्षांच्या रस्त्याकडील फांद्यांची योग्य छाटणी केली, त्यांच्या खोडावर चांगल्या प्रतीचे रिफ्लेक्टर लावले, तर अपघात होण्याची शक्यता जवळपास मिटेल आणि हे वृक्षही जगताना, आपल्यालाही जगवतील. याचा विचार कोण करणार?

रस्ते रुंदीकरणात वृक्षतोडीचा आजवरचा इतिहास बघितला, तर ज्या रस्त्यांवर वृक्षतोड होऊन रस्ता रुंदीकरण झाले आहे अशा रस्त्यांची आज काय परिस्थिती आहे? रस्ते खरेच एकदम चकाचक आहेत का? त्यावर एकही खड्डा नाही का? वेगांची मर्यादा तिथे पाळली जाते का? तिथली अतिक्रमणे हटली, हटवली का?  अतिक्रमण कोण करते आहे? त्यांना कुणाची साथ आहे? गावागावातल्या आणि शहराशहरांतल्या नव्या-जुन्या रस्त्यांवर, जिथे जिथे रस्त्यांचे रुंदीकरण झाले आहे, त्या रस्त्यांवर नजर टाकली तर काय चित्र दिसते? 

या रस्त्यांवर अनेक ठिकाणी अनधिकृत पार्किंग तयार झाले आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दोन ओळींमध्ये भाजी बाजार बसतोय. फेरीवाल्यांची गर्दी झाली आहे. काही ठिकाणी वेगवेगळी स्थायी, अस्थायी दुकाने थाटली गेली आहेत, रस्ते बळकावले गेले आहेत, त्यांचा श्वास घुसमटतोय.  या अतिक्रमणांमुळे बऱ्याच ठिकाणी तीन पदरी रस्त्यांवरही केवळ एकच लेन वापरली जातेय. त्यावर कोणाचा वरदहस्त आहे? वृक्षांमुळे जर खरोखरच अपघात होत असतील, तर ते जरूर काढावेत, त्यांचे पुनर्रोपण करता येणे शक्य असेल तर तेही अवश्य करावे, पण त्याआधी सगळ्याच गोष्टींचा साधकबाधक विचार होणे गरजेचे आहे. शहराचा विकास एकतर्फी न होता, समतोल विकास ही काळाची गरज आहे.