निवडणुकीनंतरचा पंजाबातील धोका...!
By Admin | Updated: February 8, 2017 23:32 IST2017-02-08T23:32:13+5:302017-02-08T23:32:13+5:30
सध्या मतदान चालू असलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत साऱ्या पक्षांच्या प्रचाराचा रोख ‘विकास’ हाच आहे. मात्र प्रत्यक्षात मतांची बेगमी करण्यासाठी जे हिशेब मांडले जात आहेत

निवडणुकीनंतरचा पंजाबातील धोका...!
प्रकाश बाळ, (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक)
सध्या मतदान चालू असलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत साऱ्या पक्षांच्या प्रचाराचा रोख ‘विकास’ हाच आहे. मात्र प्रत्यक्षात मतांची बेगमी करण्यासाठी जे हिशेब मांडले जात आहेत, त्यात ‘धर्म’ हाच महत्त्वाचा घटक ठरत आहे. पंजाब हे याचे ठळक उदाहरण आहे.
गेल्या शनिवारी विधानसभेच्या निवडणुकीसाठी पंजाबात मतदान झालं. मतदानाची टक्केवारी बरीच मोठी होती. तेथे अकाली पक्षाची शीख पंथाशी घट्ट निरगाठ बसली आहे. हा पक्ष लोकशाही राज्यपद्धतीतील निवडणुकांत भाग घेत असला आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे व निवडणूक आयोगाची आचारसंहिता यानुसार ‘धर्म’ हा प्रचाराचा भाग असू शकत नसला, तरी अकाली पक्ष हा ‘धर्मा’च्या आधारेच चालत आला आहे. जगभरातील शिखांची जी गुरुद्वारे आहेत, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा करून स्थापण्यात आलेल्या ‘शीख गुरुद्वार प्रबंधक समिती’वर अकाली दलातील नेत्यांचाच प्रभाव राहत आला आहे. थोडक्यात, शीख पंथ व अकाली पक्ष हे वेगळे काढताच येत नाहीत. अकाली दलाचं सारं राजकारण सुवर्ण मंदिरातील अकाल तख्त, शीख गुरुद्वार प्रबंधक समिती यांच्यावर नियंत्रण कोणाचं याभोवतीच फिरत असतं.
पंजाबातील निवडणुकीत नेहमी सामना असतो तो काँगे्रस आणि अकाली दल व त्याच्या अंगरख्याला धरून चालणाऱ्या भाजपा यांच्यात. अकालींना शिखांच्या मतांच्या जोडीनं हिंदूंची मतं मिळविण्यासाठी भाजपाचा उपयोग होत असतो. उलट काँग्रेस परंपरागतरीत्या शीख व हिंदूं यांची मतं मिळवत असतो. त्यामुळंच इतकं खलिस्तानचं रणकंदन होऊन त्यात इंदिरा गांधी यांचा बळी पडला, तरी काँगे्रसच्या हाती सत्ता आल्यावर मुख्यमंत्री शीख समाजाचाच झाला.
‘आम्ही वेगळे’ ही भावना शिखांत आहे. फाळणीच्या वेळीही ब्रिटिशांनी आमच्याशी वेगळी चर्चा करावी अशी शीख नेत्यांची मागणी होती. स्वातंत्र्यानंतर ‘शीख सुभ्या’साठी संत फत्तेसिंह व संत तारासिंह यांनी किती वेळा जथे काढले आणि किती आंदोलनं केली, हे साठच्या दशकातील वृत्तपत्रांची कात्रणं चाळल्यास दिसून येईल.
शिखांतील याच वेगळेपणाच्या भावनेला खतपाणी घालण्यासाठी या समाजाच्या परिघावर असलेल्या अतिरेकी प्रवृत्तींना हाताशी धरून अकाली दलाला अडचणीत आणण्याचे डावपेच काँगे्रस खेळत आली आहे. त्यातूनच १९७० च्या दशकाच्या अखेरीस अकाली दल व जनता पार्टीचं सरकार पाडण्यासाठी संजय गांधी आणि त्यावेळी पंजाबातील काँगे्रसचे मोठे नेते असलेले व नंतर राष्ट्रपती झालेले झैलसिंग यांनी भिन्द्रनवाले नावाचा भस्मासुर उभा केला. त्यानं एक- दीड दशक पंजाब होरपळून निघाला आणि १९७१ च्या बांगलादेश युद्धातील पराभवानंतर वचपा काढण्यासाठी छुपं युद्ध लढण्याची जी रणनीती जनरल झिया-ऊल-हक यांनी आखली होती, तिचा पहिला प्रयोग करण्याची संधी पाकला मिळाली.
आज खलिस्तानच्या भस्मासुराचा खातमा केला गेला आहे. मात्र पंजाबातील यंदाच्या निवडणुकांमुळं ही खलिस्तानी प्रवृत्ती पुन्हा डोकं वर तर काढणार नाही ना, अशी शका निर्माण झाली आहे.
...कारण आम आदमी पार्टीची पंजाबातील निवडणुकीच्या राजकारणातील ‘एण्ट्री’ आणि त्यांना मिळत गेलेलं परदेशस्थ शिखांचं भरघोस पाठबळ. शीख समाज मोठ्या प्रमाणावर कॅनडा, अमेरिका व अनेक युरोपीय देशांत स्थलांतरित झाला आहे. उद्यमशील व हरहुन्नरी असलेल्या या समाजानं स्थलांतरित झाल्यावर तेथील समाजात आपला जमही बसवला आहे. आज कॅनडाच्या संसदेत शीख सदस्य तर आहेतच, पण त्या देशाच्या मंत्रिमंडळातही शीख मंत्री आहेत. अमेरिकेतही शिखांचा जम आहे. आपला धर्म पाळतानाच शीख तेथील समाजजीवनात रुळून व मिसळून गेले आहेत. मात्र धर्माचा पगडा आहेच, गुरुद्वारांचं वर्चस्व आहेच आणि त्यामुळंच अतिरेकी प्रवृत्ती या समाजाच्या परिघावर का होईना, या परदेशांतही आहेतच. त्यापायीच सुवर्ण मंदिरातील लष्करी कारवाईत भाग घेतलेले सेनानी लेफ्टनंट जनरल ब्रार यांच्यावर तीन वर्षांपूर्वी लंडन येथे सुरी हल्ला झाला होता.
‘आप’च्या प्रचारात सहभाागी होण्यासाठी परदेशस्थ शीख मोठ्या प्रमाणावर भारतात आले, ही वस्तुस्थिती आहे. हे सगळेच खलिस्तानवादी आहेत, असेही अजिबतच म्हणता येणार नाही. पण या परदेशस्थ शिखांनी इतक्या मोठ्या प्रमाणात, तेही संघटितरीत्या, पंजाबातील निवडणुकीत रस दाखवण्याची ही पहिलीच वेळ आहे. अकाली दल-भाजपा आणि काँग्रेस या दोघांनी अनेक वर्षे पंजाबात राज्य केलं, आता दुसरा पक्ष पुढे आला आहे, त्याला संधी देऊन बघू या, अशी पंजाबातील बहुसंख्याकांची - त्यातही तरुणवर्गाची - भावना असू शकते. त्यामुळं मतदारांचा कल ‘आप’कडे वळू शकतो, याची जाणीव झाल्यामुळेच बहुधा काँग्रेसनं आपलं जुनं ठेवणीतलं अस्त्रं बाहेर काढलं आणि शीख समाज ज्याला ‘धर्मद्रोही’ मानतो, त्या बाबा राम रहीम व त्याच्या ‘डेरा सच्चा सौदा’चं मतदारांना आवाहन करण्याचा डाव खेळलेला दिसतो.
अशा आवाहनांचा किती व कसा परिणाम होतो, ते ११ मार्चला कळेलच. पण एक गोष्ट निश्चित आहे. ती म्हणजे, काँग्रेस सत्तेवर आली तरी ‘आप’ हा विरोधात राहणार आहे आणि त्यांच्या खालोखाल अकाली दल असणार आहे. आतापर्यंतचा इतिहास असं सांगतो की, विरोधात गेल्यावर अकाली दलाच्या पंथीय राजकारणाला ऊत येतो. त्यात जर ‘आप’च्या समर्थकांत खरोखरच परदेशस्थ खलिस्तानवादी प्रवृत्तींचा शिरकाव असेल, तर काँगे्रस सरकारला अडचणीत आणण्यासाठी जे काही केलं जाईल, त्याचा फायदा या प्रवृत्ती उठवू शकतात. थोडक्यात, निवडणुकीनंतर जर असं राजकारण रंगलं, तर तो विस्तवाशी खेळ ठरणार आणि त्याचा फायदा पाकला मिळणार, यात शंका बाळगायचं कारण नाही.
‘आप’च्या हाती यदाकदाचित सत्ता आली, तर केजरीवाल यांचा एकूणच उपटसुंभपणा आणि राज्यकारभाराबद्दलची त्यांची बेपर्वाई याचा फायदा उठविण्यासाठी अकाली दल पंथीय राजकारणाचा अतिरेक करण्याची शक्यता आहे. गुरू गं्रथसाहिबची फाटलेली पाने पंजाबातील काही खेड्यांत सापडल्यानं कसा तणाव निर्माण झाला होता, हे गेल्या वर्षी बघायला मिळालंच होतं. ‘आप’च्या गोतावळ्यात अतिरेकी शीख प्रवृत्ती शिरल्या असल्यास अकाली दलाच्या या डावपेचांचा फायदा त्या उठवू शकतात. दुसऱ्या बाजूला काँगे्रस हाच मुद्दा लावून धरत ‘आप’ला अडचणीत आणण्याचे प्रयत्न करील, हेही सहजशक्य आहे.
...आणि जर त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली, तर या धार्मिक राजकारणाला वेगळाच आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं चिंताजनक ठरू शकणारा असा रंग भरला जाणार आहे.