धोक्याची घंटा

By Admin | Updated: February 12, 2017 23:53 IST2017-02-12T23:53:05+5:302017-02-12T23:53:05+5:30

जागतिक तपमानवाढ हा विषय सातत्याने चघळला जात आहे; मात्र यावर उपाययोजनेबाबत फार कोणी गंभीर नाही. विकसित देश आणि विकसनशील देश

Danger hour | धोक्याची घंटा

धोक्याची घंटा

जागतिक तपमानवाढ हा विषय सातत्याने चघळला जात आहे; मात्र यावर उपाययोजनेबाबत फार कोणी गंभीर नाही. विकसित देश आणि विकसनशील देश यांच्यात याविषयावर गांभीर्याने चर्चा होत नाही. तपमानवाढीला विकसित देश कारणीभूत आहेत; हे उघड सत्य असले तरी याबाबत कोणी आवाज उठवत नाही. हिमनग वितळणे ही प्रक्रिया आताच सुरू झालेली नसली तरी आता हे प्रमाण वाढले आहे. ही धोक्याची घंटा वेळीच ओळखली नाही तर सजीवाचा विनाश अटळ आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणे, कमाल तपमानात सातत्याने वाढ होणे, अवेळी पाऊस पडणे, हिमनद्या वितळणे, वादळे येणे; या गोष्टी जागतिक तपमानाशी निगडित आहेत. वादळे आणि महापूर हासुद्धा जागतिक तपमानवाढीचा परिणाम आहे. मुंबईसारख्या महानगराला यापूर्वी याचा फटका बसला आहे. उत्तरोत्तर हे प्रमाण वाढणार आहे. हे नमूद करत असताना हिमालयात असाधारण बर्फवृष्टी सुरू आहे. आत्तापर्यंत ३०हून अधिक जवान बर्फाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. गेल्या महिन्याभरात उत्तर गोलार्धात युरोपातही अभूतपूर्व बर्फवृष्टी झाली. ग्रीस, रूमानिया इत्यादि देशांत तपमान उणे ३० अंशांपेक्षा खाली गेले. यावेळी विषुववृत्तावर श्रीलंकेत ऐतिहासिक दुष्काळ पडला आहे. आॅस्ट्रेलियात काही ठिकाणी ४० अंशांपेक्षा जास्त तपमान होत आहे. पश्चिम अंटार्क्टिकावरील सुमारे १००० फूट उंचीचा प्रचंड हिमखंड मूळ भागापासून सुटला आहे. तो प्रशांत महासागरात शिरत आहे. यामुळे त्याच्या आतील भागातील हिमनद्या वेगाने वितळणार आहेत. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे १८ जानेवारी रोजी जागतिक हवामान संघटनेने दिलेल्या अहवालानुसार सन २०१६ हे तपमानाचा उच्चांक करणारे सलग १६ वे वर्ष ठरले आहे. जानेवारी १९८५ पासून डिसेंबर २०१६ पर्यंतच्या सर्व ३७३ महिन्यांतील उच्चतम तपमान हे विसाव्या शतकातील सरासरी तपमानापेक्षा जास्त होते. नोव्हेंबर २०१६ मधील उच्चतम तपमान २० व्या शतकाच्या सरासरी तपमानापेक्षा ०.९४ अंशांनी जास्त होते. तपमानवाढीचा हा वेग सुन्न करणारा आहे. ‘पॅरिस करार’ फक्त चार वर्षांत अयशस्वी ठरणार आहे. कारण सन २०२० मध्ये मानवजात वाचवण्यासाठी नियंत्रित करावयाच्या २ अंशांच्या वाढीची मर्यादा ओलांडली जाणार आहे. प्रत्येक वर्षी १/५ अंशांची ची वाढ पृथ्वीच्या सरासरी तपमानात होत असल्याने सध्याच्या बालके व तरुणांच्या आयुष्यकाळातच मानवजात, जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका अभ्यासक व्यक्त करत आहेत. भारतीय पर्यावरण चळवळीचे ठाण्याचे विक्रांत कर्णिक आणि इतर कार्यकर्ते पर्यावरणीय जनजागृतीसाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशचा चार महिन्यांचा दौरा सायकलवरून करत आहेत. ते गावागावांत थांबून याबाबतची माहिती देत आहेत. डहाणूच्या ‘नरपड’ गावचे कुंदन राऊत हे उद्योगातील नोकरी सोडून गावी गेल्या पाच वर्षांपासून नैसर्गिक शेती करतात. तेदेखील ग्रामीण भागात फिरून तपमानवाढीच्या धोक्याची माहिती देत आहेत. इच्छुक शेतकऱ्यास नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचे विनामूल्य प्रशिक्षण देत आहेत, या प्रयत्नांचीही दखल घेणे त्यामुळेच महत्त्वाचे ठरते. आपणही ही धोक्याची घंटा वेळीच ऐकायला हवी.

Web Title: Danger hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.