शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

क्रौर्यापुढे ओशाळले नाते !

By किरण अग्रवाल | Published: March 01, 2018 8:39 AM

क्रौर्य हे क्रौर्यच असते, त्याला कमी-अधिकच्या सीमा नसतात; किंवा तसल्या मोजपट्टीत ते मोजताही येत नाही. माणुसकीचा गहिवर जिथे संपतो तेथून निर्दयतेची व त्याहीपुढील क्रौर्याची वाटचाल सुरू होते.

क्रौर्य हे क्रौर्यच असते, त्याला कमी-अधिकच्या सीमा नसतात; किंवा तसल्या मोजपट्टीत ते मोजताही येत नाही. माणुसकीचा गहिवर जिथे संपतो तेथून निर्दयतेची व त्याहीपुढील क्रौर्याची वाटचाल सुरू होते. पण असले क्रौर्य जेव्हा नात्यांनाही धडका देत, त्या नात्याच्या म्हणून असणा-या मर्यादांचे पाश तोडते किंवा नात्यातील नाजूक भावबंधावरच आघात करीत हिंस्रतेची परिसीमा गाठते, तेव्हा ती बाब संबंधितांची, अगर त्या कुटुंबांची व्यक्तिगत न राहता समाजाच्याही काळजीचा विषय ठरून गेल्याशिवाय राहात नाही. प्रियकराच्या मदतीने आपल्या पोटच्या लहानग्याला बदडून काढत थेट मृत्यूच्या कोठडीत ढकलून देणा-या नाशकातील एका मातेचे क्रौर्यही त्यामुळेच समाजशास्त्रींची चिंता वाढविणारे ठरले आहे.काकाकडून पुतणीच्या, मामाकडून भाचीच्या, शालकाकडून मेहुणीच्या अथवा तत्सम नात्यातील व्यक्तींकडून होणा-या लैंगिक छळाच्या घटना हल्ली वाढत चालल्या आहेत. या अशा घटना समाजमनाची अस्वस्थताच वाढवून देत असतात; पण त्याहीपुढे जात जेव्हा स्वत:च जन्मास घातलेल्या लेकीकडेही वासनांधपणे बघितले गेल्यासारखे प्रकार घडून येतात, तेव्हा नात्याला काळिमा फासले जाण्याचे पातक त्यातून ओढवते. अशा घटना अगदी अपवादात्मक असतात हे खरे; पण अवघ्या समाजाला त्या हादरा देणा-या ठरतात. नात्याची वीण उसवून टाकत माणूस असा पशू का बनतो, किंवा तसा का वागतो याची मानसशास्त्रीय अंगाने चिकित्सा करता वैफल्य, हीनता, व्यसनाधिनता, असुरक्षितता, असमाधान व बदला घेण्याची मानसिकता यासारखी काही कारणे त्यामागे आढळून येतात. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सारासार विचाराची क्षमता संपते, बुद्धी गहाण पडते व विवेक मागे पडततो तेव्हा वासना ही विकाराचे रूप धारण करते किंवा मनुष्यातले पशुत्व जागे होते. अशावेळी मग माणुसकीची भावना तर गळून पडतेच, शिवाय नात्याचे दोरही तुटतात. अघोरी अथवा क्रौर्याच्या संकल्पनेत मोडणाºया घटना याच अवस्थेत घडतात. अवघ्या सहा वर्षे वयाच्या आपल्या लेकराला कपडे धुण्याच्या धुपाटण्याने ते धुपाटणे मोडेस्तोवर झोडपून काढत, त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाºया मातेच्या निर्दयतेचा प्रकारही याच मालिकेत मोडणारा आहे.नाशकातील एका साडीच्या दुकानात कामास असलेल्या सोनाली सुधाकर थोरात या मध्यमवर्गीय महिलेकडून घडलेल्या या प्रकारामागील कारण तसे किरकोळ होते. अवघ्या सहा वर्षे वयाच्या नकुल या तिच्या मुलाने पॅन्टमध्ये शी केल्याच्या रागात ही माता अनावर झाली. प्रियकराच्या मदतीने या महिलेने नकुलला तर बेदम मारहाण केलीच; पण आपल्या भावाचे रात्रभरचे विव्हळणे पाहून त्याला दवाखान्यात न्या, असे सांगणाºया दहा वर्षाच्या नंदिनीलाही त्यांनी झोडपून गप्प बसविले. अखेर दुसºया दिवशी नकुलला लोकलज्जेस्तव रुग्णालयात नेले असता तो मृत झाल्याचे घोषित केले गेले. विशेष म्हणजे, शिक्षणासाठी निवासी आश्रमशाळेत राहणारी ही मुले सुट्यांमध्ये घरी आईकडे आली असता हा प्रकार घडला. मातेच्या निर्दयतेचा हा ओरखडा भाऊ गमावलेल्या नंदिनीच्या मनावर किती गहिरा आघात करून गेला असेल याची कल्पनाच मनाचा थरकाप उडवून देणारी आहे. दोनदा लग्न केलेली सोनाली दोघा पतींना सोडून प्रियकरासोबत राहते व तिच्या प्रियकरालाही त्याच्या पत्नीने सोडून दिलेले, अशी यातील कौटुंबिक पार्श्वभूमी. त्यामुळे साध्या वा अगदी क्षुल्लक कारणातून हे क्रौर्य घडून आलेले दिसत असले तरी, त्याची पार्श्वभूमी समाजव्यवस्थेचा धाक न उरल्यामागे व स्वैराचारात दडलेली असल्याचे सहजपणे लक्षात येणारे आहे. कुठे चालला आहे समाज, का घडून येते आहे ही अधोगती, काय केल्याने थांबवता यावे हे अध:पतन यासारखे प्रश्न त्यातून उपस्थित होणारे असून, त्याची उत्तरे शोधण्याचे आव्हान समाजाचे नेतृत्व करणाºया धुरिणांसमोर उभे ठाकल्याचे म्हणावे लागेल.अर्थात, असे असले तरी सारेच काही संपलेले नाही. माणुसकीच्या पणत्या अजूनही मिणमिणत का होईना, प्रकाश पेरण्याचे काम करताना दिसतात तेव्हा रणरणत्या उन्हात थंडगार हवेची झुळूक स्पर्शून गेल्याचा अनुभव त्यातून घडून येतो, जो मनाला सुखावून जातो. प्रस्तुत प्रकरणात बंधू नकुलने जीव गमावल्यामुळे भेदरलेल्या मनाने व मारहााणीच्या जखमा अंगावर बाळगत जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नंदिनीचे भविष्य सावरण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तुषार जगताप व अन्य कार्यकर्ते पुढे आले आहेत. नंदिनीवरील उपचार, तिचे पुढील शिक्षण, होस्टेलमधील निवासव्यवस्था आदी सर्व काळजीचे दायित्व त्यांनी स्वीकारले आहे. क्रौर्यापुढे मातेचे नाते जरी ओशाळले असले तरी, माणुसकीचा झरा आटलेला नाही, हेच यातून स्पष्ट व्हावे. समाज, समाज म्हणून आपण जे म्हणतो किंवा त्याला पुढे नेण्याची अगर त्याच्या उन्नयनाची जी भाषा करतो त्यात अखेर या असल्या कळवळा व सुहृदयतेखेरीज दुसरे काय अपेक्षित असते? नात्याच्या वा रक्ताच्या भावबंधापलीकडे जात संवेदनांचे असे झरे मोकळे होणे हीच तर खरी माणुसकी व तोच तर खरा माणुसकी धर्म! आणखी कोणता वेगळा ‘रंग’ हवा कशाला?

टॅग्स :Molestationविनयभंग