Join us  

अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 11:47 PM

इंजेक्शन देऊन झाडांची कत्तल केल्याचा संशय; सुदैवाने रहदारी कमी असल्याने जीवितहानी टळली

श्रीकांत जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नारळाचे एक हिरवेगार झाड अचानकपणे कोसळण्याची दुर्घटना वांद्रे येथे रविवारी दुपारी घडली. हे झाड रस्त्यावरून जात असलेल्या रिक्षा आणि येथील दुकानांवर कोसळले आहे. या दुर्घटनेत रिक्षा चालक गंभीर जखमी असून दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने रहदारी कमी असल्याने जीवितहानी टळली. मात्र, झाडे इंजेक्शन देऊन मारली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. 

वांद्रे ( पूर्व ) विजयनगर म्हाडा वसाहत क्रमांक - २ च्या परिसरात काही नारळाची झाडे आहेत. त्यापैकी एक झाड रविवारी दुपारी अचानकपणे कोसळले. त्यावेळी येथील रस्त्यावरून एक प्रवासी रिक्षा जात होती. झाड रिक्षावरच कोसळल्याने रिक्षा चालक या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. त्याला नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने भाभा रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच झाडाखाली असलेले दुकान या दुर्घटनेत जमीनदोस्त झाले आहे. शिवाय इतरही दुकानांना या दुर्घटनेने नुकसान पोहोचले आहे.

दुर्घटनेची खबर मिळताच खेरवाडी पोलीस आणि अग्निशमन दलाने कोसळलेले झाड रस्त्यातून दूर केले आहे. तो पर्यत येथील रस्ता बंद झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.  

विशेष म्हणजे दुर्घटना स्थळाजवळ शिवसेना शाखा क्र ९३, डॉक्टरांचा दवाखाना, लॅब  आणि किरकोळ बाजाराची दुकाने आहेत. त्यामुळे येथे नेहमीच रहदारी असते. रविवारी उन्हाची तीव्रता अधिक होती. त्या कारणाने येथे गर्दी कमी होती. अन्यथा या घटनेत मोठी जीवितहानी झाली असती. 

दरम्यान, या परिसरात अनधिकृत दुकाने बांधण्यासाठी काही लोक झाडांना विषारी इंजेक्शन देऊन मारत असल्याचे प्रकार सुरु असल्याचे येथील रहिवाशी विश्वास जाधव यांनी सांगितले. ( बातमील दुर्घटनेचा फोटो आहे )

टॅग्स :मुंबई