देश सध्या राजकीय धक्क्यातून जात आहे ?

By Admin | Updated: May 2, 2017 06:08 IST2017-05-02T06:08:44+5:302017-05-02T06:08:44+5:30

निवडणुका म्हणजे काय असतात? प्रतिनिधित्वाचे राजकारण म्हणजे नेमके काय असते? निवडणुकीच्या निकालांचा राजकीय

The country is going through a political shock now? | देश सध्या राजकीय धक्क्यातून जात आहे ?

देश सध्या राजकीय धक्क्यातून जात आहे ?

निवडणुका म्हणजे काय असतात? प्रतिनिधित्वाचे राजकारण म्हणजे नेमके काय असते? निवडणुकीच्या निकालांचा राजकीय पक्षाच्या भवितव्यावर कोणत्या प्रकारे परिणाम घडत असतो? आपल्यापैकी ज्यांनी मंडल युगाचा अनुभव घेतला आहे, त्यांना निवडणुकीवर होणाऱ्या जाती-जमातींच्या परिणामांची कल्पना असेल. अखेरच्या क्षणी आपले विचार बदलून जातीचे गट कुणाच्याही पारड्यात आपली मते टाकत होते, त्यामुळे निवडणुका म्हणजे जुगार ठरत होता. ‘झी’ प्रकारच्या समभागावर पैसे लावण्यासारखाच तो प्रकार होता. अर्थात सेबीच्या सुधारणांमुळे या तऱ्हेच्या समभागाची अस्थिरता संपुष्टात आली आहे हा भाग वेगळा.
भारतीय निवडणुकीच्या निष्कर्षांना आपल्या बाजूने मजबुती आणण्याचे प्रयत्न भारतीय जनता पक्ष यशस्वीपणे करीत आहे. ज्या राज्यात ३९ टक्के लोक हिंदी भाषिक आहेत, त्या राज्यात हुकूमाचे पत्ते कुणाच्या हातात आहेत हे सहज कळण्याजोगे असते. पण त्या पलीकडे जी बिगर भाजपा राज्ये आहेत, त्या राज्याचे परंपरागत जे राखणदार आहेत त्यांच्याशी तो पक्ष संघर्ष करताना दिसून येतो. जसे प.बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, ओरिसात बिजू जनता दल आणि तामिळनाडूत आळीपाळीने दोघा द्राविडी पक्षांच्या हातात सत्ता असते. आंध्रात प्रादेशिक सेनापती चंद्राबाबू नायडू आहेत. अन्य छोट्या राज्यात याहून वेगळी स्थिती नाही. आपला कर्नाटक हा अखेरचा बालेकिल्ला राखण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत आहे. अन्यत्र स्थिती पक्षाच्या हाताबाहेर गेली आहे.
उत्तराखंडमध्ये काँग्रेसच्या हातात दोनदा सत्ता होती, त्यात विजय बहुगुणा यांचा वाटा फार मोठा होता. पण त्यांनाही रा.स्व. संघाचे जुने कार्यकर्ते त्रिवेन्द्रसिंग रावत यांच्याकडे सत्ता सोपवावी लागली. अमित शहा, नरेंद्र मोदी आणि रा.स्व. संघ हे त्रिकूट आपल्या तत्त्वज्ञानापासून शक्यतोवर दूर जात नाहीत. पण विजय बहुगुणा यांना सत्ता तर गमवावी लागलीच पण त्यांची बहीण रिता बहुगुणा- ज्या एकेकाळी काँग्रेसच्या प्रवक्त्या होत्या - त्या आता योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाल्याचे विजय बहुगुणा यांना बघावे लागले!
आपल्या पक्षात सामील होणाऱ्याच्या जातीचा आणि वर्गाचा विचार जरी भाजपा करीत असला तरी त्या पक्षाचे नितीन गडकरी अध्यक्ष असल्यापासून भाजपने आपली कवाडे सर्वांसाठी खुली ठेवली होती. नितीन गडकरी आणि त्यानंतर राजनाथसिंह यांच्या काळात रा.स्व. संघाच्या कृपेने २०१४ च्या लोकसभेतील २८२ खासदारांपैकी १०० खासदार हे अन्य पक्षातून भाजपामध्ये दाखल झालेले आहेत. त्यांचा पक्षाशी आणि पक्षाच्या संस्कृतीशी कोणताच संबंध नाही. राव बिरेन्द्रसिंग आणि राव इंदरजितसिंग हे दोन्ही पोलादी पुरुष काँग्रेसमधून भाजपात आलेले आहेत. त्यापैकी एक लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षात आले तर दुसरे हरियाणा विधानसभा निवडणुकापूर्वी भाजपात दाखल झाले. भाजपाने यापूर्वी देवीलाल आणि चौटाला यांच्या संदर्भात दुय्यम भूमिका स्वीकारली होती. त्यामुळे तेथे आपले बळ वाढविण्यासाठी अमित शहा, नरेंद्र मोदी, संघ परिवार या त्रिकुटाने अन्य पक्षातून आपल्या पक्षात माणसे आणून त्यांना मंत्रिपदे दिली. भाजपाविषयी मुळीच आदरभाव न बाळगणाऱ्या शिवसेनेतून आलेल्या सुरेश प्रभूंकडे पक्षाने रेल्वे मंत्रिपद सोपवले. एस.एस. अहलुवालिया हे अत्यंत निवडक वर्गातील व्यक्ती भाजपात दाखल झाले आहेत. त्यांना काँग्रेसविषयी समग्र माहिती आहे.
निवडक वर्गातील माणसांचा भाजपा प्रवेश अव्याहतपणे सुरू आहे. आसामात हेमंत विश्व शर्मा यांच्या भाजपा प्रवेशाने आसामात तो पक्ष विजयी होऊ शकला आणि ब्रम्हपुत्रा नदीवर प्रथमच भगवा फडकला. विश्व शर्मा यांच्या पक्षत्यागाने काँग्रेस पक्ष ईशान्य भारतात कमकुवत बनला. मणिपूरमध्ये काँग्रेसला अधिक जागा मिळूनही सत्ता स्थापनेसाठी आवश्यक आणखी तीन आमदारांचा पाठिंबा पक्ष मिळवू शकला नाही. उलट काँग्रेसचे सहा आमदार पक्ष सोडून भाजपाला मिळाले. विश्व शर्मा यांचा ईशान्य भागात एवढा प्रभाव आहे की त्रिपुरा आणि मेघालय ही दोन राज्येही आपण भाजपाच्या छत्राखाली आणू असे ते आत्मविश्वासाने सांगत आहेत. त्यापैकी त्रिपुरा हा माकपचा शिल्लक असलेला एकमेव बालेकिल्ला आहे तर दुसरे मेघालय राज्य पूर्वी संगमाच्या अधिपत्याखाली होते. अमित शाह यांच्यामुळे ईशान्य भारतात कोणते बदल घडून येतील हे आजच सांगणे कठीण आहे. पण ज्यांनी त्रिपुरा या राज्याला भेट दिली त्यांना वारा कोणत्या दिशेने वाहात आहे हे दिसून आले आहे. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण याबाबत नेतृत्व निर्णय करू न शकल्याने काँग्रेसला गोव्यातील सत्ता गमवावी लागली. पण त्याचे खापर मात्र दिग्विजयसिंग यांच्यावर फोडण्यात येत आहे.
सध्या देश राजकीय धक्क्यातून जात आहे. जुन्या संकल्पना आणि जुन्या कृती परिणामशून्य ठरत आहेत. लोकांनाही जुन्याविषयीचे आकर्षण वाटेनासे झाले आहे. ध्रुवीकरण करण्याबाबत भाजपा पटाईत आहे हाही विचार मागे पडतो आहे.
कार्यकर्त्यांच्या बैठकीत गडकरी यांनी स्पष्ट केले की गुन्हेगारात परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता भाजपात आहे. पक्षाकडून काँग्रेस, बसपा, सपा पक्षातील गुन्हेगार जेव्हा भाजपात प्रवेश करतात तेव्हा त्यांच्यातील अवगुण आम्ही कमी करून त्यांच्या गुणांमध्ये वाढ करतो, असे गडकरींनी पुण्यात बोलताना सांगितले. वाल्याचे रूपांतर जसे वाल्मिकीत झाले तसे रूपांतर आमच्या पक्षात प्रवेश केल्याने होते असेही ते म्हणाले. अन्य पक्षातील गुणवंतांना आपल्या पक्षात आणण्याचे काम संपलेले नाही. भाजपाने आता यू टर्न घेतला आहे. पण काँग्रेसमध्ये तसा बदल घडण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. कारण तेथे स्वतंत्र विचारांवर संपूर्ण बंदी असल्याचे दिसते!

हरीश गुप्ता
‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर

Web Title: The country is going through a political shock now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.