Coronavirus: केनियामध्ये शरणार्थींसाठी ‘इन-आऊट’ बंद; 'हे' सारं मानवी जगण्याची परीक्षा पाहणारं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 01:30 AM2020-05-04T01:30:29+5:302020-05-04T01:30:55+5:30

दक्षिण केनियातील दादाब या भल्या मोठ्या निर्वासित छावणीत २ लाख ७० हजार लोक राहतात.

Coronavirus: 'In-Out' closed for refugees in Kenya; This is the test of human survival | Coronavirus: केनियामध्ये शरणार्थींसाठी ‘इन-आऊट’ बंद; 'हे' सारं मानवी जगण्याची परीक्षा पाहणारं

Coronavirus: केनियामध्ये शरणार्थींसाठी ‘इन-आऊट’ बंद; 'हे' सारं मानवी जगण्याची परीक्षा पाहणारं

Next

केनिया - ‘कोरोना’ काळात अनेक चेहरे उघडे पडले आहेत. ते माणसांचे आहेत, सत्ताधीशांचे आहेत आणि अनेक देशांचे सरकार, त्यांच्या व्यवस्थेचेही आहेत. जगभर आता चर्चा आहे की, कोरोना हे एक निमित्त झालं आहे जगभरातल्या देशांना, तिथल्या सत्ताधीशांना. आपल्या देशाच्या सीमा परदेशी लोकांसाठी बंद करायच्याच होत्या; पण जागतिकीकरणाच्या चक्रात ते बरं दिसलं नसतं.

आता कोरोना आला आणि आपल्या माणसांचे जीव वाचवायचे आहेत, असं उदात्त कारण सांगत अनेक देशांनी आपल्या सीमा बंद केल्या. वरकरणी यात चूक काही दिसत नाही, तसं ते चूकही नाही. मात्र, ‘स्थानिकांच्या जिवाची काळजी’ या लेबलखाली काय काय दडवलं, नाकारलं जाईल, कुणाकुणाला तोडलं जाईल, जबाबदारी नाकारली जाईल, हे आताच सांगता येत नाही. मात्र, तसं होईल आणि हे जग सहिष्णू होण्याऐवजी अधिक कट्टर होईल कोरोना आणि कोरोनात्तोर काळात अशी आजच चर्चा आहे.

त्याचं एक छोटं उदाहरण म्हणजे केनियात असलेले निर्वासितांचे कॅम्प. केनियातही कोरोना पोहोचला आहे. आजच्या घडीला कोरोनाचे ४११ रुग्ण केनियात आहेत. २१ मृत्यू झाले आहेत, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आपण निर्वासितांच्या कॅम्पमध्ये राहणाऱ्या लोकांना त्या कॅम्पच्या बाहेर पडायची एंट्री आणि एक्झिट बंद करत आहोत. म्हणजेच त्या माणसांनी तिथून बाहेर पडायचं नाही. कुणी त्या शिबिरात जायचं नाही, असा आदेशच केनियन सरकारने काढला आहे.

दादाब आणि काकुबा असं या शिबिरांचं नाव आहे. तिथं जे रेफ्युजी अर्थात निर्वासित राहतात. त्यांची संख्या ४ लाखांच्या घरात आहे. हे निर्वासित सोमालिया, दक्षिण सुदान आणि इथोपिया या देशांतून केनियात स्थलांतरित झाले आहेत. तिथली गरिबी, राजकीय उद्रेक आणि गृहयुद्ध यांना कंटाळून या माणसांनी केनियात आश्रय घेतला.

दक्षिण केनियात दादाब या भल्या मोठ्या निर्वासित छावणीत २ लाख ७० हजार लोक राहतात, तर उत्तर केनियात काकुबामध्ये १ लाख ४० हजारांच्या घरात लोक आहेत. त्यांची अवस्था आधीच बिकट आहे. जेमतेम जगण्याची साधनं त्यांच्या हाताशी आहेत. दुसरीकडे केनिया सरकारने असं सांगितलं की, आमच्याकडे आधीच साधनं नाहीत. या शिबिरात माणसं दाटीवाटीने राहतात. दोन हजारपेक्षा जास्त माणसं आम्ही क्वारंटाइन करूशकणार नाही, कारण तशी सोय नाही. २ लाख ७० हजार लोकांमागे ११० बेडस अशी आताच अवस्था आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही या शिबिरांत येण्याजाण्याची बंदी घातली आहे.

मात्र, हे असं असताना या शिबिरात राहणाºया लोकांपुढे जगायचं कसं हा प्रश्न आहे? खायचं काय? या प्रश्नाचं उत्तर मात्र सरकार देत नाही, त्यामुळे माणसांची अस्वस्थता वाढली आहे. सरकारने मात्र असं सांगितलं आहे की, आम्ही दोन महिन्यांसाठीचं रेशन लोकांना आधीच देऊन टाकलं आहे. दुसरीकडे केनियाने पूर्ण लॉकडाऊन जाहीर केलेलं नाही. फक्त पहाटे कर्फ्यू असतो. नैरोबीसह तीन किनारपट्टीच्या शहरांसाठी शहरबंदी जाहीर करण्यात आली आहे.

एकीकडे केनियातही दारिद्र्य मोठं आहे. अलीकडेच एक बातमी व्हायरल झाली की, केनियात एका आईनं आपल्या लहान आठ लेकरांची समजूत काढायची, त्यांना वाटावं की, आई काहीतरी शिजवतेय म्हणून दगड शिजवल्याची बातमीही साºया जगानं पाहिली.
ही बाई लोकांचे कपडे धुण्याचं काम करायची. मात्र, आता लोकांनी मदतनीस महिलांना घरी येऊ देणं बंद केलं आहे. त्यामुळे या आईकडे लेकरांना खाऊ घालायला काही नव्हतं. तिची अवस्था शेजारणीनं माध्यमांना कळवली आणि जगभर माहिती पसरली. एकीकडे गरिबी, दुसरीकडे कोरोना, तिसरीकडे या दोन्हींसह निर्वासित म्हणून जगणं हे सारं मानवी जगण्याची परीक्षा पाहणारं आहे.

Web Title: Coronavirus: 'In-Out' closed for refugees in Kenya; This is the test of human survival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.