CoronaVirus Crisis Get ready for new challenges! | CoronaVirus नव्या आव्हानांसाठी सज्ज व्हा!

CoronaVirus नव्या आव्हानांसाठी सज्ज व्हा!

कोव्हिड-१९ या मृत्युदूताचा सामना कसा करायचा याविषयीचा संभ्रम गडद होत असतानाच यंदाचा जागतिक आरोग्यदिन दारात येऊन ठेपलेला आहे. अमानुष नरसंहार मांडलेल्या या सूक्ष्म जिवाने मानवी प्रगतीचे आतापर्यंतचे दावे हास्यास्पद ठरवले आहेत. जागतिक वैद्यकशास्त्रातली क्रांती कोरोनाच्या फैलावासमोर गुडघे टेकवत असताना जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य काय, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. याचे कारण असे की, सर्वंकष उत्थानातल्या विविध टप्प्यांना स्मरणात ठेवताना आपल्या हतबलतेचीही आठवण राहिली तरच दौर्बल्यावर मात करण्याचीही प्रेरणा विजिगिषू मानवाला मिळत असते, हेच आजवरच्या त्याच्या प्रगतीचे सार आहे. म्हणूनच कोरोनाच्या छायेत साजरा होणाऱ्या आजच्या आरोग्य दिनी थोडेसे सिंहावलोकन करून भविष्यकालीन कार्यवाहीचे आरेखन करणे मानववंशाच्या हिताचे ठरेल.

कोरोना हे परिस्थितीवश संक्रमित होणाºया जुनाट विषाणूचे सद्यकालीन रूप आहे. आपल्याला तूर्तास ते अगम्य वाटत असले तरी त्याचे स्वरूप विज्ञानाने ताडले असून त्याच्या संसर्गावरला उपायही विकसित होतो आहे, पण हा उपाय मानवी प्रयत्नांच्या टप्प्यात येणे म्हणजे पूर्णविराम नव्हे. नव्या परिस्थितीशी जुळवून घेत आपल्या संक्रमणाला अधिक हिंसक करण्याची विषाणूंची उर्मी औषधांनी संपुष्टात येत नसते. सार्स ते कोव्हिड-१९ या प्रवासाने हेच सिद्ध केले आहे. कोरोनाचा प्रस्थापित उपचारप्रणालीला न जुमानणारा अधिक विध्वंसक अवतार जसा भविष्यात मानवजातीला संत्रस्त करू शकतो; तसाच विषाणूंच्या नव्या प्रजातींचा उद्भवही. या संभाव्य संकटांचा संंबंध तज्ज्ञ वातावरण बदलाशी लावतात. त्यामुळे कोव्हिड-१९ ही नुसती सुरुवात आहे, खरे महानाट्य यापुढेच मानवतेच्या वाट्याला येणार आहे, या धारणेतून आपल्याला पुढील रणनीतीचे आरेखन करावे लागणार आहे. बचावात्मक खबरदारी, महामारीसदृश फैलावाचा सामना करण्यासाठी कामी येईल अशी प्रभावी उपचारप्रणाली आणि नव्या उत्पत्तीचा वेध घेण्यासाठीचे संशोधन, अशा तिहेरी आघाड्यांवर आपल्याला काम करावे लागणार आहे. बचावात्मक खबरदारीला मर्यादा असतात. संचारबंदीसारख्या उपाययोजनांनी तात्कालिक समाधान लाभत असले तरी दीर्घकालीन दुष्परिणामही भयावह असतात. अर्थव्यवस्था कोलमडून पडण्याचा संभव असतो आणि ठप्प व्यवहारांमुळे प्रशासकीय कर्तृत्वालाही लगाम बसतो. देश कितीही श्रीमंत असला तरी तो कायम कल्याणकारी अभिनिवेशात राहू शकत नाही. आताही जगभरातल्या राज्यकर्त्यांना या वस्तुस्थितीची दाहक जाणीव होऊ लागली आहे. इस्टरपर्यंत स्थिरस्थावर होईल, अशी आशा काल- परवापर्यंत बाळगणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प किंवा लॉकडाऊन हा उपाय नव्हे या धारणेने दैनंदिन उद्योगांना कार्यस्वातंत्र्य देणारा स्वीडनसारखा देश आजच्या व्यावहारिक नीतिमत्तेचे प्रतिनिधित्व करताहेत.

भविष्यात अशा प्रकारची विध्वंसक संसर्गक्षमता असलेली संकटे आली तर लोकांना घरात बसून न राहण्याचे सल्ले न देता कोणती बचावात्मक उपाययोजना करून मानवी संसाधनांना कार्यरत व उत्पादनक्षम ठेवता येईल, याचा विचार आरोग्यविश्वाला आता करावाच लागेल. उपचारप्रणाली विकसित करण्याचे दुसरे आव्हान पेलताना आरोग्यसेवेचा असा विस्तार नजरेसमोर हवा, ज्यात उदरभरणासाठी स्थलांतराचा पर्याय चोखाळणाºया फिरस्त्या घटकांचा विचार प्रामुख्याने होईल. आपल्या देशात तर आरोग्यव्यवस्थेतली प्रगती सधनवर्गाच्या आशा-अपेक्षांच्या मर्यादांतच राहिलेली आहे. रोजंदारीवरील कामगारांचे लोंढे संचारबंदी झुगारून गावाकडे निघाले तेव्हा त्यांना आश्वस्त करण्याची या व्यवस्थेची क्षमताच नसल्याचे सिद्ध झाले. अशा प्रकारांची पुनरावृत्ती टाळायला हवी. तिसरे आव्हान नव्या संसर्गाच्या उत्पत्तीला ओळखून उपाय विकसित करण्याचे. त्यासाठी जागतिक पातळीवरचे सौहार्दच कामी येईल. धोरणकर्त्यांना या त्रिसूत्रीचे महत्त्व कळून आले तर आजचा जागतिक आरोग्यदिन साजरा झाला, असे म्हणता येईल.

Web Title: CoronaVirus Crisis Get ready for new challenges!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.