‘कोरोना’ने स्थलांतरणाचा प्रवाह बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 05:41 AM2020-04-07T05:41:02+5:302020-04-07T05:41:47+5:30

दिल्ली, मुंबई, बंगलोर, पाटणा, कोलकाता अशा महानगरांमधून लाखो चाकरमानी, रोजंदारीवर काम करणारे मजूर आपल्या गावांकडे वळते झालेत.

'Corona' changed the flow of migration | ‘कोरोना’ने स्थलांतरणाचा प्रवाह बदलला

‘कोरोना’ने स्थलांतरणाचा प्रवाह बदलला

Next

कोव्हिड-१९ ची दहशत आणि देशभरातील टाळेबंदीनं भारतासह साऱ्या जगातील जनजीवन सैरभैर झालं आहे. अशाप्रकारची आरोग्य आणीबाणी यापूर्वी अनेक वर्षांत अनुभवण्यात आली नसावी. उद्योग, व्यापार, पर्यटन सर्वच क्षेत्रांचे व्यवहार या महामारीनं मोडकळीस आणले. त्यासोबतच स्थलांतरही मोठ्या प्रमाणात होऊ लागलंय; पण यंदाच्या स्थलांतरणात एक मोठा बदल बघायला मिळतोय. स्थलांतरितांच्या लोंढ्यांची दिशा बदललीय. गेल्या महिनाभरात जगभरात लाखो लोकांनी स्थलांतरण केलंय. अवघ्या काही दिवसांत युरोप, अमेरिका आणि आखातातून जवळपास ६४,००० भारतीय मायदेशी परतले. अगदी आंतरराष्टÑीय विमानसेवा बंद होईपर्यंत त्यांचं येणं सुरूच होतं. त्यापाठोपाठ देशांतर्गत स्थलांतरणाचा फेरा सुरू झालाय.

दिल्ली, मुंबई, बंगलोर, पाटणा, कोलकाता अशा महानगरांमधून लाखो चाकरमानी, रोजंदारीवर काम करणारे मजूर आपल्या गावांकडे वळते झालेत. लॉकडाऊनपूर्वी मिळेल त्या बस आणि वाहनातून लोकांनी परतीचा प्रवास केला आणि आता वाहतूक बंद झाल्यानं हे लोंढे पायीच निघाले आहेत. एकेकाळी शिक्षण, नोकरी, कामधंद्यानिमित्त विदेशात आणि देशांतर्गत स्थलांतर करणाºया या लोकांना एकप्रकारे कोरोना विषाणूनं स्वगृही परत पाठवलंय, असं म्हणता येईल. स्थलांतरणाच्या प्रक्रियेतील ही अभूतपूर्व परिस्थिती मानली जात आहे. आरोग्याच्या कारणानं प्रचंड प्रमाणात होणारं आजवरचं हे बहुदा पहिलंच स्थलांतरण असावं, असा अंदाज आहे. या स्थलांतरणात सर्वाधिक फरपट होतेय ती मोलमजुरी करणाºया कामगारांची. रोजगार मिळण्याच्या आशेनं शहरात आलेले हे मजूर मनानं पार कोलमडलेत. रोजगारच नाही तर खाणार काय? जगणार कसं? असा प्रश्न त्यांना भेडसावतोय. नेमकं किती दिवस काम बंद राहील, याचाही अंदाज नाही. दोनवेळ खाण्यासाठीही पैसे नाहीत. मग राहण्याची सोय तरी कुठून करणार? कसंही करून स्वगृही परतायचं यासाठी त्यांची धडपड सुरू होती. ठिकठिकाणी मजूर अजूनही अडकले आहेत. आम्हाला आमच्या गावी पोहोचविण्याची व्यवस्था करा, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे. हैदराबादेत अडकलेले राजस्थानातील शेकडो कारागीर लपूनछपून कंटेनरमध्ये बसून राजस्थानला निघाले होते; परंतु यवतमाळ जिल्ह्यातील एका चेकपोस्टवर हे वाहन अडविण्यात आलं. तपासणीदरम्यान सहा ते सात कंटेनरमध्ये शेकडो कारागीर बसून असल्याचं निदर्शनास आलं. हे जवळपास ३५० मजूर आता पायीच राजस्थानकडे निघाले असल्याचं कळतं. दिल्लीसारख्या राजधानीच्या शहरात आजूबाजूच्या प्रदेशातील असंख्य मजूर रोजगारासाठी येतात. फूटपाथ, निवारागृह तर कधी पुलाखाली आसरा घेऊन जीवन जगतात.


स्थलांतरणाचा प्रश्न हा काही आजचा नाही. जगभरात सातत्याने वाढत्या आर्थिक विषमतेमुळे कधी नव्हे एवढी स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रीमंत आणखी श्रीमंत होत आहेत, तर गरीब आणखी गरीब. विशेषत: भारतातील चित्र इतर देशांच्या तुलनेत अधिक चिंताजनक आहे. येथे श्रीमंत आणि गरिबांतील दरी जास्तच रुंद आहे. हा असमतोल माणसाची आर्थिक आणि सामाजिक विकास साधण्यासाठीची धडपड अधिक तीव्र करीत असतो. परिणामस्वरूप त्याची पावले झपाट्याने शहरांच्या दिशेने वळत असतात. लोकांचे लोंढेच्या लोंढे शहराकडे वेगाने वाहत येतात. देशांतर्गत वाढत्या स्थलांतरामागील हे प्रमुख कारण असल्याचं मानलं जातं; परंतु गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती तसेच जातीय अथवा धार्मिक संघर्षामुळेसुुद्धा मोठ्या प्रमाणात लोक स्थलांतरास बाध्य होत असल्याचं एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. साºया जगात स्थलांतराची ही समस्या भीषण रूप धारण करीत असून तिचा सामना करणाºया देशांच्या यादीत भारत तिसºया स्थानावर आहे.


विशेषत: अलीकडील काळात झालेले स्थलांतर हे पूर, वादळ यांसारख्या घटनांशी संबंधित आहे. नैसर्गिक आपत्तीप्रवण क्षेत्रातील निम्न दर्जाची घरे, राहण्यासाठी साधनांचा अभाव, पर्यावरणाची खालावलेली स्थिती, हवामान बदल आणि नियोजनशून्य शहरीकरण यामुळे भारताला दक्षिण आशियात होणाºया नैसर्गिक आपत्तीत स्थलांतराचा सर्वाधिक धोका असल्याचे मानले जाते. जातीय संघर्षातही हिंसाचारापासून बचावाकरिता लोक
सुरक्षित ठिकाणाच्या शोधात बाहेर पडतात. जम्मू-काश्मीर, ईशान्येकडील राज्यात आपण हा अनुभव घेत आहोत. त्यामुळं स्थलांतर आणि त्यामुळे निर्माण होणारं संकट थोपवायचं आव्हान कसं थोपवता येईल, या दिशेनं सर्वस्तरावर प्रयत्न सुरू आहेत; परंतु विद्यमान स्थलांतरण मात्र यापेक्षा वेगळं आहे. विदेशातून, महानगरांमधून लोक स्वगृही परतताहेत. हे स्थलांतरण काही काळापुरताच असलं तरी भविष्यात त्याचे चांगले परिणाम दिसतील, अशी अपेक्षा आहे.


सविता देव हरकरे । उप वृत्तसंपादक, लोकमत, नागपूर

Web Title: 'Corona' changed the flow of migration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.