मक्याचा 'मेक्सिकन' अंदाज
By Admin | Updated: February 21, 2016 01:32 IST2016-02-21T01:32:37+5:302016-02-21T01:32:37+5:30
गेल्या आठवड्यात खरेदीसाठी मॉलमध्ये जाण्याचा योग आला. भटकता भटकता खूप भूक लागल्याने साहजिकच फूड कोर्टकडे मोर्चा वळला. मॉलमधल्या फूडकोर्टमध्ये आजकाल जगभरातले

मक्याचा 'मेक्सिकन' अंदाज
(ओट्यावरुन)
- भक्ती सोमण
गेल्या आठवड्यात खरेदीसाठी मॉलमध्ये जाण्याचा योग आला. भटकता भटकता खूप भूक लागल्याने साहजिकच फूड कोर्टकडे मोर्चा वळला. मॉलमधल्या फूडकोर्टमध्ये आजकाल जगभरातले पदार्थ खायला मिळतात. एक वेगळी चव घेऊन बघ हा भावाचा सल्ला लगेच अंमलात आणून मेक्सिकन पदार्थाच्या स्टॉलकडे मोर्चा वळवला. हे पदार्थ बघत असताना एक नाव ओळखीचं वाटलं. ते म्हणजे नाचोज. असे नाचोज चीप्स तर आपण नेहमी खातो. यानिमित्ताने ते मॅक्सिकन असतात आणि त्याच्यावर कांदा, टॉमेटो, चीज टाकून दिलं की त्याला चिझी नाचोज म्हणतात हे कळलं. ही उत्सुकता शमत नाही तर टाकोज आणि फाहिता हे पदार्थ समोर आले.
आयताकृती नाचोजला मध्ये खोलगट दुमडून घ्यायचे. तो जो आकार होतो त्याला म्हणायचे टाकोज शेल. या शेलला थोड्याशा तेलात दोन्ही बाजूने थोडेसे भाजून घेतले होते. त्यानंतर त्याच्या मध्यभागी भरपूर प्रमाणात शिजलेला राजमा घातलेला होता. त्यावर कांदा, टॉमेटो, सिमला मिरची, पनीरचे तुकडे असे भरून वर कोबी भुरभुरली होती. तर फाहितामध्ये चक्क भाजलेल्या पोळीत शिजवलेला राजमा, टॉमेटो, सिमला मिरची, कांदा, आॅलिव्ह्ज, काळी मिरीचा वापर केला होता. या पदार्थांत राजमा असल्यामुळे ते फारसे चमचमीत नसले तरी सौम्य तिखट चवीचे होते. मात्र यात जर जास्त चिली फ्लेक्स घातले तर ते आणखी टेस्टी लागतात हा शोधही लगेचच लागला. त्याचबरोबरीने कमीअधिक प्रमाणात काळ्या, लाल रंगाचा राजमा तसाच ठेवून इतर भाज्यांमध्ये वेगळेपणा ठेवत क्यॅसेदिलाज, चलुपा, इनचिलाडाज असे प्रकारही होते.
एकंदरीत हे प्रकार बघता मेक्सिकन क्युझिन काय असते, कसे बनते ते जाणून घेण्याची उत्सुकता फार वाढली.
आपल्याकडे ज्याप्रमाणे रोजच्या जेवणात गव्हाच्या पिठाची पोळी करतात अगदी त्याचप्रमाणे मेक्सिकन पदार्थ तयार करताना त्यात मक्याचे पीठ, मैदा, थोडेसे मीठ आणि पाणी एकत्र करून पीठ मळले जाते. पिठाच्या गोळ्यापासून जी पोळी बनते त्याला ‘टॉर्टीला’ म्हणतात. त्याचे वेगवेगळे आकार असतात. त्यापासून नाचोज, टाकोज तयार होतात. टॉर्टीला पांढरा, पिवळा, निळा, लाल आणि हिरव्या रंगाचे तयार केले जातात. भारतात मात्र पांढऱ्या आणि पिवळ्या प्रकारच्या टॉर्टीलात पदार्थ तयार होतात. विविधरंगी आणि बीन्समुळे पौष्टिकतेकडे झुकलेल्या मेक्सिकन जेवणात म्हणूनच मक्याला खूपच महत्त्वाचे स्थान आहे, असे मेक्सिकन क्युझिनचे तज्ज्ञ पराग जोगळेकर यांनी सांगितले.
आता सालसा हा प्रकारही सध्या अनेकांच्या ओळखीचा झाला आहे. टॉमेटो, काकडी, सिमला मिरची, कांदा हे अगदी बारीक चिरायचे किंवा मिक्सरमधून काढायचे. त्यात आवडीनुसार मिरी, मीठ, सिलेंत्रो (कोथिंबीर) आणि टॉमेटो सॉस घालून सगळं व्यवस्थित एकत्र करून सालसा तयार होतो. हाच सालसा प्रत्येक पदार्थात वापरतात. राजम्याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे बीन्स, पालक, मश्रूम्स यांचाही वापर केला जातो. शाकाहारी पदार्थांचा वापर मांसाहारी पदार्थांच्या तुलनेत कमी केला जातो. या सर्वच पदार्थांमध्ये हिरवी मिरची ‘हलापिनो’चा वापर केला जातो. तसेच आॅरेगानो, धने-जिरे पावडर यांचाही भरपूर वापर पदार्थ बनवण्यासाठी करतात. चमचमीत आणि तिखट खाणाऱ्यांना या पदार्थांमध्ये तिखट चव आणायची असेल तर उकडलेल्या बीन्स वा राजम्यात धने, जिरे पावडर, तिखट यांचा वापर आपल्या आवडीप्रमाणे करून आॅलिव्हज आणि मिरच्यांचाही वापर थोडा जास्त केला तरी
चालेल.
याशिवाय अवोकॅडो या हिरव्या रंगाच्या फळाचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो, त्या फळाचे पॅनकेक, टाकोज, नाचोजमध्ये बारीक चिरून ते वापरले जाते. त्याशिवाय त्यात कांदा, टॉमेटो, लसूण, हलापिनोज, लिंबाचा रस घालून ‘ग्वॉकामॉली’ हा डिपही तयार केला जातो. हा डिप टॉर्टीलाबरोबर छान लागतो. आता सुपरमार्केट्समध्ये आवाकाडो सहज उपलब्ध आहे. महत्त्वाचे म्हणजे इटालियन पदार्थांबरोबर मेक्सिकन पदार्थही हळूहळू का होईना लोकप्रियता मिळवू लागले आहेत. टाको बेल, क्वात्रो, बॉम्बे ब्ल्यू, रॉकविले कॅफे अशासारख्या मुंबई आणि उपनगरातल्या अनेक हॉटेलांमध्ये अस्सल चवीचे मेक्सिकन पदार्थ खवय्यांच्या पोटात आपले स्थान निर्माण करत आहेत.
एकूणच जगभरातल्या ओट्यावरच्या या पदार्थांत अनेक गमती दडलेल्या आहेत. त्याचे मर्म समजून घेत एकदातरी त्याची चवही चाखायलाच हवी. त्याशिवाय त्याचे नेमके महत्त्व आणि तो ओटा कसा आहे ते कळणारच नाही. बरोबर ना!