वादग्रस्त स्ट्रोक्स.!

By Admin | Updated: November 15, 2014 23:28 IST2014-11-15T23:28:48+5:302014-11-15T23:28:48+5:30

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी तसेच भारतीय क्रिकेटचे माहेरघर अन् याच क्रिकेटच्या माहेरघरात 2 एप्रिल 2011च्या रात्री धोनीच्या भारतीय संघाने वर्ल्डक प पटकावला.

The controversial strokes. | वादग्रस्त स्ट्रोक्स.!

वादग्रस्त स्ट्रोक्स.!

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी तसेच भारतीय क्रिकेटचे माहेरघर अन् याच क्रिकेटच्या माहेरघरात 2 एप्रिल 2011च्या रात्री धोनीच्या भारतीय संघाने वर्ल्डक प पटकावला. या ऐतिहासिक क्षणाचे वर्णन करताना सचिन तेंडुलरकरही भारावून गेला. ‘प्लेईंग इट माय वे’ या आपल्या आत्मचरित्रत या वर्ल्डकप विजयाचा आनंद द्विगुणित झाल्यावर क्रिकेटदिवाने मुंबईकर मरिनड्राइव्हवर रस्त्याच्या दुर्तफा उभे राहून कसे सेलिब्रेशन करीत होते, याचे वर्णन करताना सचिन कमालीचा भावुक झाला. आपल्या दोन तपांच्या प्रदीर्घ कारकिर्दीतील हा परमोच्च आनंदाचा क्षण पत्नी अंजलीच्या साथीने ताजमहाल हॉटेलमध्ये कसा साजरा केला याचे तपशीलवार वर्णन सचिनने केले आहे. सचिनच्या आत्मचरित्रत या अन् अशा अनेकसंस्मरणीय क्षणांच्या वर्णनांची रेलचेल आहे.
 
सचिन हा सुनील, कपिलनंतरचा भारताचा सुपरस्टार क्रिकेटपटू. सुनीलच्या ‘सनी डेज’ या वाचनीय तसेच खुमासदार आत्मचरित्रनंतर सचिनच्या पुस्तकाची सा:यांनाच प्रतीक्षा होती. क्रिकेटरसिकांना उत्सुकता होती कारण, सुनीलच्या तुलनेत सचिन हा तसा अबोलच. सुनीलची बातच और, झेव्हीयर्ससारख्या शाळा-कॉलेजात शिकलेल्या सुनीलचा ¨पंडच निराळा. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या जाचक अटी-नियमांची तमा न बाळगता सुनील कॉलम लिहितोय अन् साठी पार केलेल्या सुनीलचे कलम अजूनही सुरू आहे (अर्थात आता सुनीलचा सूर बदललाय). भारतीय क्रिकेटमधील ट्रेंडसेटर सुनीलच. 1977मध्ये ‘सनी डेज’ हे सुनीलचे आत्मचरित्र प्रकाशित झाले. यानंतर ‘रन्स अॅण्ड रुईन्स’, ‘वनडे वंडर्स’, ‘आयडॉल्स’ ही सुनीलची इतर पुस्तके.  
विजय हजारे, मन्सूर अली खान पतौडी, अजित वाडेकर,  कपिलदेव निखंज या भारताच्या माजी कर्णधारांसह मुश्ताक अली, फारूख इंजिनीअर, इरापल्ली प्रसन्ना, संदीप पाटील,  दिलीप दोशी, युवराज सिंग या कसोटीपटूंनीही आत्मचरित्र लिहिले. परदेशात खासकरून इंग्लंड, ऑस्ट्रेलियात क्रिकेटपटू विपुल लिखाण करतात. कॉलम लिखाणासह पुस्तकेही मोठय़ा संख्येने लिहिली जातात अन् याचा मोबदलाही चांगला मिळतो. पुस्तक वादग्रस्त असल्यास तडाखेबंद विक्री होते. लेखक प्रकाशझोतात येतो. सचिनच्या पुस्तकाच्या काही दिवस आधीच केविन पीटरसनचे पुस्तक प्रसिद्ध झाले. हे ताजे उदाहरण. केपीने आपल्या आत्मचरित्रत इंग्लंडचा माजी कर्णधार अॅण्ड्रय़ू स्ट्रॉसवर घणाघाती टीका केली. ईसीबीवरही दुगाण्या झाडल्या. मीडियातही याला वारेमाप प्रसिद्धी लाभली. आत्मचरित्र वादग्रस्त असल्यास ते अधिक गाजते, त्याची चर्चा होत राहते अन् बहुतांशी परदेशी क्रिकेटपटूंची आत्मचरित्रे यामुळे सतत चर्चेत राहतात. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार इयन चॅपलचे ‘चॅपेली’ हे असेच गाजलेले आत्मचरित्र. अॅशेस मालिकेतील गाजलेले सामने तसेच रंगेल आणि रांगडय़ा ऑस्ट्रेलियन्सचा बेधडकपणा इयनमध्ये पुरेपूर भिनलेला. भर मैदानात सेंटर गार्ड लावण्याचा आगाऊपणा करणारा इयन याचे समर्थनही करतो. 1968-69च्या भारत दौ:यात ब्रेबर्न स्टेडियमवर सामना खेळत असताना तेथील अवस्थेबाबतही इयन प्रकाशझोत टाकतो. झुरळे, उंदरांच्या मुक्त वावराबाबत  इयनने तपशीलवार वर्णन केले आहे. आपल्याकडील क्रिकेटपटूंचा भर असतो तो आपली कारकिर्द कशी घडली, त्याचे तपशीलवार वर्णन करण्यात. मन्सूर अली खान पतौडीचे ‘टायगर्स  टेल’ हे आत्मचरित्र 60च्या दशकाच्या सुरुवातीस प्रकाशित झाले तेदेखील पाच रुपयांत. आता 5 रुपयांत पाण्याचा पाऊचही मिळत नाही. पतौडीने आपल्या पुस्तकात 60च्या दशकातील इंग्लिश क्रिकेटचे वर्णन केले आहे. भारताकडून त्याने नुकतेच कसोटी पदार्पण केले होते.
 
भारतासारख्या देशात ‘स्पोर्ट्सस्टार’ 
हे एकमेव क्रीडाविषयक साप्ताहिक, तर हिंदीमध्ये ‘क्रिकेट सम्राट’ हे सर्वाधिक खपाचे क्रिकेट मासिक. क्रिकेट भारतीदेखील आहे, पण सम्राटच्या तुलनेत त्याचा खप किरकोळच. मराठीत सध्यातरी निव्वळ क्रीडाविषयक मासिक, पाक्षिक, साप्ताहिक नाही. मल्याळम तसेच बंगालीत काही क्रीडासाप्ताहिकं, मासिकं निघताहेत हीच समाधानाची बाब.
 
भारतात क्रीडापटूंकडून लिखाण तसे अत्यंत त्रोटकच होते. परदेशी क्रिकेटपटूंच्या तुलनेत आपल्याकडे फारच कमी प्रमाणात खेळाडू लिखाण करतात. कॉलम लिहिणारे काही ठरावीक खेळाडू आहेत. सुनील गावसकर, रवी शास्त्री, मोहिंदर अमरनाथ, दिलीप वेंगसरकर, वेंकटेश प्रसाद, जवागल o्रीनाथ हे स्तंभलेखन करतात, परंतु 280 कसोटीपटूंपैकी डझनभर खेळाडूंनीच आत्मचरित्र लिहिले आहे. मान्य आहे की प्रत्येक क्रिकेटपटू आत्मचरित्र लिहिणं अशक्य आहे.  
 
- शरद कद्रेकर  

 

Web Title: The controversial strokes.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.