काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील सुंदोपसुंदीची लागण, भाजपा-शिवसेना-रिपाइं (आ)-स्वाभिमानी शेतकरी संघटना-राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम या महायुती नावाच्या आघाडीलाही झाली आहे. ‘१४४ जागा द्या आणि तेवढ्याच तुम्हीही घ्या,’ या हट्टाखातर राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला प्रथम अडचणीत आणले. पुढे ‘काय वाट्टेल ते झाले तरी या वेळी मुख्यमंत्रिपद सोडणार नाही,’ असे म्हणत त्याने त्या पक्षाला जेरीस आणले. तिकडे काँग्रेसनेही ‘वाट्टेल ते झाले तरी १४४ जागा देणार नाही,’ अशी गर्जना केली आणि पुढे ‘मुख्यमंत्रिपद तर परंपरेने आमचेच आहे,’ असेही त्या पक्षाने राष्ट्रवादीला सांगून टाकले. राष्ट्रवादीकडून अजित पवारांनी, तर काँग्रेसकडून माणिकराव ठाकऱ्यांनी आपापले किल्ले लढविले. नित्याप्रमाणे ते थकले, तेव्हा त्यांनी आपले भांडण दिल्लीत नेले व आता ते सोनिया गांधी आणि शरद पवार सोडविणार असल्याचे जाहीर करून ते स्वस्थ झाले. मात्र, त्यांचे एकमेकांवरचे गुरकावणे अजूनही थांबले नाही. त्या पार्श्वभूमीवर महायुतीने आपल्यातही मतभेदांना तोटा नसल्याचे दाखविले आहे. प्रथम शिवसेना १६४ जागांवर अडली आणि ११४ जागांच्या पुढे सरकाल तर खबरदार, अशी तंबी तिने भाजपाला दिली; तर भाजपानेही लोकसभेत आम्ही जास्तीचे मतदारसंघ काबीज केले असल्यामुळे १४४च्या पुढे जाणे हा आमचा हक्क असल्याचे सेनेला बजावले. त्यातून या महायुतीत आता आठवल्यांचा रिपब्लिकन, शेट्टींचा स्वाभिमानी शेतकरी, मेट्यांचा शिवसंग्राम आणि जानकरांचा राष्ट्रीय समाज हे पक्ष सामील झाले आहेत आणि त्यांना अनुक्रमे ४०, ३०, ३० आणि २४ म्हणजे एकूण १२४ जागा हव्या आहेत. त्या त्यांना दिल्या आणि सेना १६४ वर अडली, तर भाजपालाच येत्या निवडणुकीत रिकाम्या हाताने उतरावे लागेल. अर्थातच हे होणे नाही. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेहून विधानसभेची जास्तीची क्षेत्रे काबीज केली आहेत. त्या पक्षाने केंद्रात सत्ता मिळविली असल्यामुळे त्याची बाजूही भक्कम आहे. तुलनेने शिवसेनेची स्थिती कोंडीत सापडल्यासारखी आहे. भाजपाशी असलेली दोन तपांची मैत्री तोडता येत नाही आणि त्या पक्षाशी भांडणही करता येत नाही. कारण, ‘तुम्ही नाही तर राज ठाकऱ्यांचा मनसे,’ हा भाजपाचा ठेवणीतला पवित्रा आहे आणि तो सेनेला भेडसावणारा आहे. त्यातून राज ठाकरे यांची नरेंद्र मोदींशी गट्टी आणि गडकरींशी घट्ट मैत्री आहे. त्यांनी आपले पत्ते अजून कोणाला समजूही दिलेले नाहीत. त्यामुळे धरले तर चावते आणि सोडले तर पळते, या दडपणाखाली शिवसेनेचे पुढारी सध्या वावरत आहेत. त्यांना जास्तीचे गर्जून बोलण्याची सवय असल्यामुळे ते त्या स्थितीचा पत्ता लागू देत नसले, तरी ती साऱ्यांना कळणारी आहे. एकीकडे ‘आमची युती अभंग आहे,’ असे म्हणायचे आणि दुसरीकडे समोरासमोरच्या भेटी व बोलणी टाळत राहायचे, हा भाजपाचा पवित्राही सेनेचा संशय वाढविणारा आहे. त्यातून त्यांच्या आघाडीने रिपाइं ते शिवसंग्राम ही चार ‘लोढणी’ गळ्यात अडकवून घेतली आहेत. (यातला लोढणे हा शब्द त्याच बारक्या पक्षातील एका पुढाऱ्याने उच्चारला आहे.) या पक्षांना आपल्या ताकदीचा अंदाज नाही आणि नसलेल्या पाठिंब्याची पुरेशी जाणही नाही. नाही तर स्वत:ला निवडून आणणे न जमणाऱ्या रिपाइंच्या रामदास आठवल्यांनी ४० आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून परवाच युतीत आलेल्या मेट्यांनी ३० जागा कधी मागितल्याच नसत्या. कॉँग्रेस व राष्ट्रवादीतले भांडण दिल्लीत मिटेल, तसे युतीतले वाद दिल्लीत मिटण्याची शक्यता नाही. कारण, तिच्यातला एक पक्ष (भाजपा) राष्ट्रीय, तर उरलेले चार प्रादेशिक आहेत. या प्रादेशिकांना दिल्लीत वजन नाही. लोकसभेच्या निवडणुकीत तब्बल १८ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला अवघे एक व तेही अवजड नावाचे हलके उद्योग मंत्रिपद देऊन तिची भाजपाने बोळवण केली नसती. सेनेचे हे हाल, तर बाकीच्या प्रादेशिकांना तेथे मोजतो कोण? आपला आवाका न ओळखता व आपला इतिहास विसरून जाऊन प्रादेशिक पक्षांचे पुढारी जेव्हा असे वागतात, तेव्हा याहून दुसरे काही व्हायचेही नसते. तात्पर्य, काँग्रेसच्या आघाडीतील वाद दोन, तर या तथाकथित महायुतीतील वाद पाच मुखांचा आहे. शिवाय, त्या पाचांच्या बाजूला राज ठाकऱ्यांचा मनसे हा पक्ष दडून बसलेलाही आहे. ही स्थिती या युतीला व विशेषत: तिच्यातील प्रादेशिक पक्षांना अस्वस्थ करणारी आहे. उद्धव ठाकरे हे उद्याचे मुख्यमंत्री, असे फक्त शिवसेना म्हणते. भाजपात नितीन गडकरींपासून देवेंद्र फडणवीस यांची नावे चालविली जात आहेत. लोकसभेच्या निवडणुकीने युतीला अनुकूल वातावरण दिले असले, तरी तिच्यातले हे भांडण काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या क्षीण आघाडीला आनंद देणारे नक्कीच आहे.
सुंदोपसुंदीची लागण
By admin | Updated: July 30, 2014 08:49 IST