भारताविरुद्ध बांगलादेशात षड्यंत्र! कोण कोण रचतेय...
By विजय दर्डा | Updated: December 22, 2025 07:02 IST2025-12-22T07:01:36+5:302025-12-22T07:02:54+5:30
बांगलादेशातील जहालवादी भारताविरुद्ध षड्यंत्र रचत आहेत. त्यामागे पाकिस्तानी लष्कर, आयएसआय आणि दहशतवाद्यांचे साटेलोटे आहे.

भारताविरुद्ध बांगलादेशात षड्यंत्र! कोण कोण रचतेय...
- डाॅ. विजय दर्डा , चेअरमन, एडिटोरियल बोर्ड,
लोकमत समूह
बांगलादेशातील जहालवादी शक्ती भारताविरुद्ध भयंकर आग ओकत आहेत, असे मी बिनदिक्कतपणे म्हणू शकतो. भारतीय उच्च आयोगाची सुरक्षाही धोक्यात आहे. एके दिवशी तर व्हिसा अर्ज केंद्रे बंद करावी लागली होती. नवी दिल्लीत बांगलादेशचे उच्चायुक्त रियाज हमीदुल्लाह यांना बोलावून घेतले गेले आणि भारताने आपली चिंता स्पष्ट शब्दांत त्यांना सांगितली. परंतु, असे दिसते की तेथील प्रमुख मोहम्मद युनूस यांना परिस्थिती आणखी बिघडू देण्याची इच्छा आहे.
युनूस यांनी फेब्रुवारीत निवडणुकीची घोषणा केली असली तरी मध्येच शरीफ उस्मान हदी याची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. शेख हसीना यांच्याविरुद्ध झालेल्या आंदोलनाचा हादी प्रमुख चेहरा होता. आता असे म्हटले जात आहे की, त्याचे मारेकरी भारतात पळून गेले आहेत. परिस्थिती इतकी भयानक आहे की एक हिंदू युवक दीपुचंद्र दास याला ठेचून मारण्यात आले आणि त्याचे शव झाडाला लटकवून पेटवून देण्यात आले. परंतु, मोहम्मद युनूस यांनी आतापर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. जहालवादाविरुद्ध आवाज उठवणारी दोन वर्तमानपत्रे ‘प्रथम आलो’ आणि ‘डेली स्टार’ यांच्या कार्यालयांना आग लावण्यात आली. या बाबतीतही युनूस काही बोलायला तयार नाहीत. दोन्ही वर्तमानपत्रांवर भारत समर्थक असल्याचा आरोप केला गेला.
भारताचे म्हणणे कोणाला ऐकूच येऊ नये इतकी आग भडकावली गेली. शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगला निवडणूक लढण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यातच आपल्या शेजारी देशात निवडणुका निष्पक्ष आणि सर्वांना बरोबर घेऊन झाल्या पाहिजेत, असे भारताने म्हटले आहे. ‘सर्वांना बरोबर घेऊन’ या शब्दांमुळे युनूस यांचा संताप झाला. त्यांना असे वाटते की सर्वांना म्हणजे अवामी लीगही निवडणुकीत असला पाहिजे, असे भारताला म्हणायचे आहे.
जरा असा विचार करा की पाकिस्तानच्या ताब्यातून बांगलादेश एक नवा देश म्हणून ज्या भारताने जन्माला घातला तोच बांगलादेश खुलेआम भारतालाच तोडण्याची मनीषा जाहीरपणे व्यक्त करतो आहे. भ्रष्टाचार आणि सर्व प्रकारचे आरोप असलेले निवृत्त ब्रिगेडियर जनरल अब्दुल्लाहिल अमान आझमी वारंवार असे म्हणत असतात की, भारताचे तुकडे होतील तेव्हाच बांगलादेशात शांतता प्रस्थापित होईल. नॅशनल सिटीझन पार्टीचे मुख्य संघटक (दक्षिण) हसनत अब्दुल्ला म्हणतात, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा या सप्तभगिनींना बांगलादेश भारतापासून बाजूला करील. पेहलगाममधील हल्ल्यानंतर निवृत्त मेजर जनरल फजलूर रहमान म्हणतो की, जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर चीन आणि पाकिस्तानला एकत्र घेऊन बांगलादेशने सप्तभगिनींवर ताबा मिळवला पाहिजे. यावर युनूस काहीही बोलत नाहीत?
नाही; त्यांनी मौन धारण केलेले नाही. आग लावणाऱ्यांमध्ये ते स्वतःच सामील आहेत, कारण पाकिस्तानचे खरे पिट्टू तर तेच आहेत. भारताच्या सात राज्यांचे पालकत्व बांगलादेशकडे आहे असे त्यांनी चीनमध्ये जाऊन म्हटले होते. चीनने बांगलादेशमध्ये आपला व्यापार वाढवला पाहिजे, असेही युनूस म्हणत आले. आता अशा मूर्खपणाच्या विधानावर आपण काय म्हणाल? बांगलादेशची ९४ टक्के सीमा ही भारताला लागून असताना ते अशा प्रकारच्या धमक्या देण्याचा प्रयत्न करत आहेत हे त्यांना कोण सांगणार? त्यांची ही भारताविरुद्ध समजून उमजून खेळलेली चाल आहे. भारताविरुद्ध इतके विष ओकायचे की जहालवादी शक्ती बांगलादेशमध्ये निवडून येतील आणि पुन्हा एकदा सत्ता पाकिस्तानी हस्तकांकडे जाईल. मी हस्तक असा शब्द वापरतो. तेव्हा त्यात पाकिस्तानचे सैन्य, गुप्तचर संस्था, आयएसआय आणि संपूर्ण पाकिस्तानमध्ये पसरलेले दहशतवादी यांचा समावेश आहे.

बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्याविषयी आपुलकी वाटणारे लोक निवडून येतील, अशी भीती वाटत असल्याने तेथे जहालवाद्यांनी ही आग पेटवलेली आहे. शेख हसीना यांनी आपल्या राजवटीत इस्लामी जहालवाद्यांच्या मुसक्या चांगल्याच आवळल्या होत्या. पाकिस्तानला तर त्यांनी आजूबाजूला फिरकूही दिले नव्हते. आता दहशतवाद्यांना पाळणाऱ्यांनी त्यांच्यासाठीच मृत्यूची व्यवस्था केली आहे. परंतु, शेख हसीना तर हाती लागणार नाहीत. त्या तर दिल्लीत आहेत. शेख हसीना यांना आपल्या ताब्यात द्यावे, अशी मागणी बांगलादेश करतो आहे. परंतु का द्यायचे? मित्राशी दगाफटका करणे भारताच्या रक्तात नाही. आम्ही शेख हसीना यांच्या बरोबर उभे आहोत आणि राहू.
भारताला घाबरवून सोडण्याची जहालवाद्यांची इच्छा आहे. ढाक्यात भारतीय उच्चायुक्तालयावर प्रदर्शनकर्ते चाल करून गेले. उच्चायोग उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा इरादा होता. ज्याप्रकारे पाकिस्तानमध्ये १९७९ साली अमेरिकन दूतावास आगीच्या हवाली करण्यात आला होता, ढाक्यात आयएसआय त्याच प्रयत्नात आहे. परंतु, सद्य:स्थितीत बांगलादेशातील सूत्रे ज्यांच्या हातात आहे त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, भारत आतमध्ये घुसून तुम्हाला ठोकून काढण्याची ताकद बाळगतो. दहशतवाद्यांचा निपटारा कसा करायचा हे आम्हाला ठाऊक आहे. तुम्ही भले अमेरिकेच्या पदराआड जाऊन लपा, चीनच्या मांडीवर जाऊन बसा किंवा पाकिस्तानशी जुगलबंदी करा, तुम्हाला वाचवायला कोणीही येणार नाही. आपली पायरी ओळखून वागण्यातच तुमचे भले आहे.
जाता जाता -
मी नुकताच दिल्लीहून परतलो. तिथल्या हवेमुळे खूपच संत्रस्त आहे. दिल्लीच्या अनेक भागात हवेच्या दर्जाचा निर्देशांक ६००च्या पलीकडे गेला आहे. हा निर्देशांक १००च्या पुढे गेला तरी ती हवा आरोग्याला हानिकारक मानली जाते. दिल्ली कुठल्या परिस्थितीत आहे याचा जरा विचार करा. माझ्या मनात वारंवार हा प्रश्न येतो की, वैज्ञानिकदृष्ट्या भारत इतका सक्षम झाला आहे, तर आपण या धूरयुक्त धुक्यावर काही उपाय का शोधू शकत नाही? की लोकांना मरणाच्या दारात तसेच सोडून दिले गेले आहे?