कॉँग्रेसी नेत्यांची मुकुटासाठी साठमारी
By Admin | Updated: May 6, 2016 05:15 IST2016-05-06T05:15:03+5:302016-05-06T05:15:03+5:30
येत्या नोव्हेंबर महिन्यात नऊ नगरपालिकांच्या आणि जानेवारीत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर ही साठमारी पक्षासाठी चिंताजनक आहे.

कॉँग्रेसी नेत्यांची मुकुटासाठी साठमारी
- वसंत भोसले
येत्या नोव्हेंबर महिन्यात नऊ नगरपालिकांच्या आणि जानेवारीत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर ही साठमारी पक्षासाठी चिंताजनक आहे.
पश्चिम महाराष्ट्र हा नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड ठेवून असलेला विभाग आहे आणि हा विभाग म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर या बालेकिल्ल्याला तडे गेले, वाटण्या झाल्या. अनेक जिल्ह्यांत काँग्रेसची ताकद कमी कमी होत गेली. मात्र, अशाही परिस्थितीत काही स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादीला टक्कर देत आपले स्थान अबाधित ठेवले होते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यातील अनेकांचा सपशेल पराभव झाला. विशेषकरून कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत काँग्रेसचा झेंडा दिसेनासा झाला आहे. या विभागातील २६ पैकी केवळ तीनच आमदार कॉँग्रेसचे आहेत. चारपैकी एकही खासदार नाही. कोल्हापूर जिल्ह्यात १९५७ नंतर किंवा महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर प्रथमच काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही. ही अवस्था पुणे जिल्ह्यातही आहे. एकवीसपैकी भोरचे संग्राम थोपटे एकमेव आमदार आहेत.
हा सर्व प्रपंच मांडण्याचे कारण की, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष निवडीवरून नेत्यांमध्ये साठमारी सुरू झाली आहे. गेली सतरा वर्षे माजी आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर जिल्हा अध्यक्ष आहेत. त्यांची ओळख म्हणजे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे कोल्हापूरचे घनिष्ट मित्र होय. त्यांनी करवीर विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा निवडणुका लढविल्या. मात्र, विजय एकदाच मिळाला. आज ते पुन्हा जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष म्हणून त्यांना मराठवाड्यानेच (प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण) हात दिला आहे.
वास्तविक जिल्हाध्यक्ष या नात्याने जिल्ह्यातील काँग्रेसची ताकद वाढविण्यावर भर देणारा नेता अशी भूमिका असायला हवी होती. गेल्या दोन-तीन निवडणुकीत काँग्रेसचे बळ कमी कमी होत गेले. या उलट माजी मंत्री आणि विधान परिषद सदस्य सतेज डी. पाटील यांनी काँग्रेस वाढीला प्रचंड बळ दिले आहे. चार वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. तेव्हा थोड्या जागा कमी पडल्या, अन्यथा काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले होते. पश्चिम महाराष्ट्रातील उर्वरित चार जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बहुमताने सत्तेवर असताना काँग्रेसने कोल्हापुरात बाजी मारली होती. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून सत्ता टिकविण्यातही सतेज पाटील यांचे नेतृत्व कारणीभूत ठरले होते.
विधान परिषदेच्या निवडणुकीतही काँग्रेस नेत्यांना एकत्र करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. मात्र, पी.एन. पाटील सवतासुभा ठेवून आपले महत्त्व सांगत राहिले. पक्षात अनेक मित्र जोडण्याऐवजी स्पर्धक करण्यात त्यांनी धन्यता मानली. आज काँग्रेसची अवस्था कोसळलेल्या बालेकिल्ल्यासारखी झाली आहे. लोक आजही पहिली पसंती काँग्रेस पक्षालाच देतात. मात्र, नेत्यांनी साठमारीचा उद्योग सुरू केला आहे. विधान परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा उचल खाल्ली असताना पराभूत झालेले नेते मात्र विखुरलेले आहेत. पडत्या बालेकिल्ल्याचा राजमुकुट परिधान करण्यासाठी मारामारी चालू आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात नऊ नगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि जानेवारीत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत काँग्रेस पक्षच प्रमुख दावेदार असणार आहे. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना जिल्हाध्यक्ष करावे अशी जाहीर मागणी सतेज पाटील यांनी करूनही पी.एन. पाटील यांच्या बाजूने प्रदेश नेतृत्वाने कल दिला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाला असताना पुन्हा नवचैतन्य निर्माण करण्यात सतेज यांचा पुढाकार वाखाणण्याजोगा आहे. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी ते करीत आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा अध्यक्ष पदावरून साठमारी करणे म्हणजे कार्यकर्त्यांना नामोहरण करण्याजोगे तर आहेच; पण सामान्य मतदारही दुरावण्याची शक्यता आहे