भाष्य - बिहारचे मद्यपी उंदीर !
By Admin | Updated: May 5, 2017 00:15 IST2017-05-05T00:15:14+5:302017-05-05T00:15:14+5:30
राजकारणाचा एक ‘मास्टर स्ट्रोक’ म्हणून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वर्षभरापूर्वी बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू केली. राज्यभर

भाष्य - बिहारचे मद्यपी उंदीर !
राजकारणाचा एक ‘मास्टर स्ट्रोक’ म्हणून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वर्षभरापूर्वी बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू केली. राज्यभर याची कडक अंमलबजावणी सुरूआहे व स्वत: नितीश कुमार देशव्यापी दारूबंदीचा आग्रह धरत आहेत. प्रत्यक्षात या दारूबंदीमुळे बिहारमधील किती लोकांचे दारूचे व्यसन सुटले व किती अट्टल मद्यपी दारूवाचून व्याकूळ झाले आहेत याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही. परंतु या दारूबंदीमुळे बिहारमधील उंदरांना मात्र दारूची चटक लागली आहे व ते कोट्यवधी रुपयांची दारू पित आहेत, अशी धक्कादायक माहिती मंगळवारी एका सरकारी बैठकीत उघड झाली. उंदीर लाखो टन अन्नधान्य फस्त करतात हे सर्वश्रुत आहे; पण मूषक दारूचेही शौकीन असतात, हे ऐकल्यावर विश्वास बसणे कठीण आहे. बिहारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पाटण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनू महाराज यांनी बैठक घेतली. पोलिसांचे काम चोख सुरू आहे व पाटणा शहर आणि जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली आहे, असे मनू महाराज यांना अधिकाऱ्यांनी सांगितले. साहजिकच एवढी दारू आहे कुठे व ती ठेवली आहे कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला. याचे उत्तर देताना अधिकाऱ्यांनी मद्यपी उंदरांचे बिंग फोडले. जप्त केलेली दारू पोलीस ठाण्यांच्या स्टोअर रूममध्ये ठेवली होती. परंतु बाटल्यांची बुचे कुरतडून उंदरांनी सर्व दारू पिऊन फस्त केली, असे त्यांनी मनू महाराज यांना सांगितले. अर्थात ही लोणकढी थाप न कळण्याएवढे मनू महाराज दूधखुळे नाहीत. त्यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना खोटे पाडले नाही. मात्र त्यांनी जप्त केलेली दारू उंदरांनी फस्त करू नये यासाठी दोन आदेश काढले. एक, सर्व पोलीस ठाण्यांच्या स्टोअररूम १०० टक्के ‘उंदीरप्रूफ’ कराव्यात. आणि दोन, सर्व पोलीस अधिकारी व शिपायांची यापुढे दररोज अचानक व कुठेही ‘ब्रिद अॅनेलिसिस टेस्ट’ घेतली जाईल. जो कोणी या चाचणीत ‘फेल’ होईल किंवा चाचणी द्यायला नकार देईल त्याला तत्काळ निलंबित केले जाईल ! अर्थात यावरून दारूबंदीची अंमलबजावणी करताना जप्त केलेली दारू फस्त करणारे बिहारमधील हे उंदीर बहुधा खाकी गणवेशधारी असावेत, अशी शंका मुळीच घेऊ नका. नाही तर नितीशबाबूंना यातही राजकारणाचा वास यायचा !