भाष्य - वेग मंदावला, पण...
By Admin | Updated: May 1, 2017 01:01 IST2017-05-01T01:01:04+5:302017-05-01T01:01:04+5:30
देशाची आजची १ अब्ज ३४ कोटी लोकसंख्या आणि तिच्या वाढीचा वेग लक्षात घेतला, तर २०२५ साली म्हणजे अवघ्या आठ वर्षांत आपण

भाष्य - वेग मंदावला, पण...
देशाची आजची १ अब्ज ३४ कोटी लोकसंख्या आणि तिच्या वाढीचा वेग लक्षात घेतला, तर २०२५ साली म्हणजे अवघ्या आठ वर्षांत आपण चीनवर मात करून जगात पहिल्या क्रमांकावर जाऊ. लोकसंख्या वाढीचा वेग आणि प्रतिचौरस कि.मी. घनतेचा विचार केला, तर उत्तर प्रदेश (२८ व्यक्ती) खालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. सर्वात कमी घनता अरुणाचल प्रदेशची. तेथे प्रतिचौरस कि.मी. क्षेत्रात केवळ १७ व्यक्ती राहतात. उत्तर प्रदेशची तुलना केली, तर ८२८ व्यक्ती आणि केवळ १७ व्यक्ती. लोकसंख्येच्या अफाट वाढीमुळे देशातील उपलब्ध सर्व स्रोत कमी पडतात. त्याचा परिणाम आपल्याला पावलापावलावर जाणवतो. प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी येथे आपल्याला संघर्ष करावा लागतो. एकूणच चित्र भयावह आहे. नवीन आकडेवारीनुसार जन्मदर कमी होत आहे. ही आशादायक बातमी समजली पाहिजे. याचा अर्थ जन्मदर घसरला, तर लोकसंख्या वाढीचा वेग कमी होईल असा लावला जातो; पण भारतासाठी हे सूत्र चुकीचे ठरते. कुटुंबातील मुलांची सरासरी संख्या ही २.७ वरून २.२ पर्यंत कमी झाली. जन्मदर घटला असला तरी एकाची जागा दुसऱ्याने घेण्याचे प्रमाण कायम असल्याने लोकसंख्येची वाढ कायम आहे आणि २०५० पर्यंत १ अब्ज ७० कोटी आपली लोकसंख्या असेल. याचे कारण देशातील तरुण लोकसंख्या, जी सध्या ३६ कोटी ५० लाखांवर आहे. १० ते २४ वयोगटातील ही लोकसंख्या असल्याने पुनरुत्पादनालाही तेवढाच वाव आहे. म्हणजे जन्मदर कमी झाला, तरी लोकसंख्या वाढीचा वेग मात्र कमी होणार नाही. प्रत्येकाने एक मूल जन्माला घातले तरी वेग वाढतच राहील आणि ७५ टक्के लोकसंख्येच्या वाढीचा हा वेग असेल. जन्मदराचा विचार केला, तर राज्यांचाही मुद्दा पुढे येतो. उत्तरेकडच्या राज्यांचा जन्मदर वेग पाहता ही तरुण राज्ये ओळखली जातात, तर दक्षिणेकडील राज्यांचा जन्मदरच कमी असल्याने ही राज्ये हळूहळू ज्येष्ठांची राज्ये म्हणून नावारूपाला येतील. उत्तर प्रदेशची लोकसंख्या ब्राझीलएवढी आहे, तर महाराष्ट्राचा वाढीचा वेग हा मेक्सिकोशी स्पर्धा करतो. बिहार हे तिसऱ्या क्रमांकावर असून, जर्मनीच्या बरोबर आहे. स्त्री-पुरुषाच्या प्रमाणाचा विचार केला, तर केवळ केरळचा दर हा सर्वात जास्त आहे. वाढत्या समस्येचे मूळ वाढती लोकसंख्या असल्याने अजूनतरी आपण त्याचा गंभीरपणे विचार करीत नाही. लोकसंख्या वाढीचा वेग मंदावला; पण परिणाम दिसणार नाही हेच खरे.