बोराडे सर... ग्रामीण साहित्याचा शेवटचा आधारवड कोसळला!

By अतुल कुलकर्णी | Updated: February 11, 2025 23:03 IST2025-02-11T23:02:51+5:302025-02-11T23:03:33+5:30

प्राचार्य रा. रं. बोराडे. मराठी कथेला महाराष्ट्रभर लोकप्रियता मिळवून देणारे बोराडे सर मराठवाड्याचे भूषण होते. द.मा. मिराजदार, आनंद यादव यांच्या बरोबरीने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र फिरून कथाकथन हा प्रकार लोकप्रिय केला होता.

column about r r borade The last Adharwad of rural literature has collapsed | बोराडे सर... ग्रामीण साहित्याचा शेवटचा आधारवड कोसळला!

बोराडे सर... ग्रामीण साहित्याचा शेवटचा आधारवड कोसळला!

अतुल कुलकर्णी, संपादक, लोकमत, मुंबई 

प्राचार्य रा. रं. बोराडे. मराठी कथेला महाराष्ट्रभर लोकप्रियता मिळवून देणारे बोराडे सर मराठवाड्याचे भूषण होते. द.मा. मिराजदार, आनंद यादव यांच्या बरोबरीने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र फिरून कथाकथन हा प्रकार लोकप्रिय केला होता. लातूर जिल्ह्यातल्या काटगाव येथे त्यांचा जन्म झाला. सुरुवातीपासून ग्रामीण वातावरणात वाढल्यामुळे त्यांच्या लेखनात ग्रामीण माणसांचे रांगडेपण, बेरकीपण मांडत असताना त्यांनी दीन दुबळ्या, पिचलेल्या ग्रामीण भागातल्या गरीब माणसांचे दुःख अत्यंत जिव्हाळ्याने मांडले. पाचोळा ही त्यांची कादंबरी मराठीतल्या अभिजात कादंबरींपैकी एक आहे. गावातला एक शिंपी आणि त्याच्या कुटुंबाची कथा, व्यथा सांगणाऱ्या या कादंबरीला पन्नास वर्षे झाले. पण आजही ती तेवढीच अस्वस्थ करते. या कादंबरीने ग्रामीण साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. अनेक भाषांत त्याचे अनुवाद झाले. या कादंबरीने बोराडे सरांच्या लेखणीची ताकद अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिली. मौज प्रकाशनाने ही कादंबरी प्रकाशित केली होती. 

आमदार सौभाग्यवती सारखी कादंबरी लिहिताना बोराडे सरांनी ग्रामीण भागातील स्त्री-पुरुष यांच्यातील राजकीय संघर्ष अतिशय टोकदारपणे दाखवला. पुढे या कादंबरीचे नाटक आले. आपल्या भूमिकांनी प्रशांत सुभेदार आणि ज्योती चांदेकर यांनी ते नाटक अजरामर केले. १९८६ साली ही कादंबरी आली. आज ३९ वर्षानंतरही या कादंबरीची गोष्ट ग्रामीण राजकारणाचे तितक्याच ठसठशीतपणे प्रतिनिधित्व करते. या कादंबरी नंतर त्यांनी 'नामदार श्रीमती' ही कादंबरी लिहिली. या कादंबरीच्या नायिकेला, सुमित्राला त्यांना मुख्यमंत्री झालेले दाखवायचे होते. पण त्यातही ते झाले नाही ही खंत त्यांच्यातल्या लेखकाला होती. त्याहीपेक्षा ग्रामीण राजकारणातून पुढे आलेली एखादी महिला मुख्यमंत्री पदापर्यंत का जात नाही? हा विचार त्यावेळी त्यांनी मांडला होता. जो आजही वास्तवात उतरलेला नाही. बोराडे सरांचे लेखन किती दूरगामी परिणाम करणारे होते हे यातून लक्षात येईल.

बोराडे सर वैचारिक किंवा कविता या साहित्य प्रकारापेक्षा ग्रामीण अर्थकारण, राजकारण, गावातल्या सामान्य ग्रामीण माणसाच्या व्यथा वेदनेत समरसून जायचे. आमदार सौभाग्यवती, इथं होतं एक गाव, कणसं आणि कडबा, पाचोळा, कथा एका तंटामुक्त गावाची सारख्या कादंबऱ्या किंवा पेरणी, ताळमेळ, मळणी, वाळवण, राखण, माळरान सारख्या कथा आणि आम्ही लेकी कष्टकऱ्यांच्या, कशात काय फाटक्यात पाय यामधून त्यांनी जे ग्रामीण जग उभे केले तो आज एक मोठा दस्तावेज बनला आहे. ग्रामीण भागाचे वेगाने शहरीकरण होत असताना गाव खेडी कशी होती? याचा कोणाला अभ्यास करायचा असेल तर बोराडे सरांच्या साहित्याशिवाय त्याला दुसरा पर्यायच नाही. 

ग्रामीण कथाकार, कादंबरीकार म्हणून असणारी ओळख त्यांनी अभिमानाने मिरवली. त्यांच्या लेखनामधून जो ग्रामीण महाराष्ट्र उभा राहिला तितक्या सशक्तपणे अन्य कुणालाही तो कधीच उभा करता आला नाही. ती त्यांची ताकद होती. मुलं परीक्षेला घेऊन जातात तसे छोटेसे पॅड, त्याला लावलेले कागदांचे विशिष्ट आकारात कापलेले तुकडे. त्यावर बारीक अक्षरात ते सतत लिहीत राहायचे. भाऊ, या कागदांचे नंबर इकडेतिकडे झाले तर सलग सूत्र कसे लागणार? असे विचारले की ते मिश्किल हसायचे. तीच तर घरी गंमत आहे... असे म्हणून पुन्हा लिहिते व्हायचे..! अनेक कथा, कादंबऱ्या त्यांनी याच पद्धतीने लिहिल्या. त्यांच्या सुविद्य पत्नी सुलभा वहिनी तास दोन तास देवपूजा करायच्या आणि बोराडे सर मन लावून छोट्याशा पॅडवर सतत लिहीत राहायचे. त्यांच्या घरी गेले की हेच दृश्य पाहायला मिळायचे. बोराडे सरांना चार मुली. अरुणा, कल्पना, प्रेरणा, मंजूषा. ही आपली चार मुलं आहेत असे ते अभिमानाने सांगायचे. मुली आहेत म्हणून त्यांनी बारीकशीही खंत कधी त्यांच्या बोलण्या वागण्यातून दिसायची नाही. सगळ्यात छोटी मंजू, तिच्यावर त्यांचे जीवापाड प्रेम होते. 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बिनविरोध दिले तरच आपण स्वीकारू, ही भूमिका त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपली. मध्यंतरीच्या काळात अध्यक्षपदावरून राजकारण झाले. तुम्ही निवडणुकीला उभे रहा असेही त्यांना सांगितले गेले. पण सरांनी कधीही ते मान्य केले नाही. भाऊ, तुम्ही उभे रहा. तुम्हाला निवडून आणू असे सांगूनही ते कधीही त्या पदाच्या मोहात पडले नाहीत. संमेलनाचे अध्यक्ष झाल्यावरच आपल्याला मानसन्मान मिळतो का? असा प्रश्न ते समोरच्याला विचारायचे. साहित्यासारखे क्षेत्र राजकारण विरहित, गुणवत्तेवर आधारित असायला हवे, हा त्यांचा आग्रह होता. पण संमेलनाआडून राजकारण करणाऱ्या अनेक साहित्यिकांनी त्यांची ही भूमिका कधीच समजून घेतली नाही. साहित्याच्या क्षेत्रात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र शासनाचा विं. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार त्यांना खूप आधी जाहीर व्हायला हवा होता. काही दिवसांपूर्वी तो पुरस्कार जाहीर झाला मात्र तो आनंदही त्यांना नीट साजरा करता आला नाही...

Web Title: column about r r borade The last Adharwad of rural literature has collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.