डॉ. दिलीप धोंडगेविसाव्या शतकातील आणखी एक थोर मानसशास्त्रज्ञ म्हणजे कार्ल गुस्टाव युंग. त्यांनी विश्लेषणात्मक मानसशास्त्राचा पाया घातला. व्यक्तिमत्त्वाचे अंतर्मुख व बहिर्मुख असे खरे स्वरूप त्यांनीच स्पष्ट केले. स्वत:च्या इच्छा-आकांक्षांमध्ये गुंतलेले मन अंतर्मुख व्यक्तिमत्त्वाचे तर सभोवतालच्या जगात गुंतलेले मन हे बहिर्मुख व्यक्तिमत्त्वाचे लक्षण. अंतर्मुख व्यक्ती ‘स्व’च्या पोषणाचा विचार करणारी तर बहिर्मुख व्यक्ती स्वेतरांच्या पोषणाचा विचार करणारी असते.युंग यांनी काही संज्ञा निर्माण केल्या व त्यांना स्वविशिष्ट अर्थ दिला. उदाहरणार्थ न्यूनगंड, मूलबंध इत्यादी. व्यक्तीच्या मनातील भावना पुंजात्मक स्वरूपाच्या असतात. त्याना गंड म्हणायचे. या भावनांचा स्तर निम्न असला की तो पुंज न्यूनगंडात्मक तर उच्च असल्यास तो अहंगंडात्मक गणला जातो. मूलबंध किंवा आदिबंधाचे स्वरूप समजून घेण्यासाठी युंगची सामूहिक अबोध मनाची कल्पना समजून घ्यावी लागते. मनाचा उभा छेद घेतला तर वरचे टोक सबोध आणि खालचे टोक सामूहिक अबोध मनाचे. या सामूहिक अबोध मनात युगानुयुगांच्या भावना साठलेल्या असतात. त्या नकळत स्वप्न, नवनिर्मिती दर्शविणारे शोध, कलाकृती यांच्याद्वारा प्रकट होत असतात. सामूहिक अबोध मनातील आशय आणि मानववंश यात संरचनात्मक संबंध असल्याची युंगची खात्री पटलेली होती.सामूहिक अबोध मनातील संचित हे मानवी विकासाचा पुरातन काळापासून वंशपरंपरागत आध्यात्मिक वारसा असतो. यामुळे सर्व मानवांमध्ये आदिम प्रतीके समान असतात व त्यानाच मूलबंध व आदिबंध म्हणतात. मानवी विकास हा मानवी अंतरंगाच्या उन्नयनाच्या अंगानेच लक्षात घ्यावा लागतो; भौतिक उन्नयनाच्या अंगाने नव्हे, हा याचा इत्यर्थ. व्यक्तिमत्त्वाच्या संकल्पनेच्या गाभ्याशी जीवात्मा असल्याचे युंगचे मत आहे. जीवात्मा म्हणजे स्व’च्या अस्तित्वाचे भान. या स्व’विषयक भानामुळे व्यक्तीला स्थैर्य आणि एकजिनसीपणा येतो. आत्मसाक्षात्कार हा व्यक्तिमत्त्व विकासातील फार वरच्या दर्जाचा, परिपक्वतेचा टप्पा होय. आपल्या मराठी संतांनी हा टप्पा गाठलेला होता. यामुळे त्यांच्या अनुभूतींना मानण्याचे परिमाण असण्याबरोबर वैश्विकतेची जाण होती. संतांच्या अनेकविध आविष्कारांमधून आत्मसाक्षात्काराची प्रस्फुरणे लक्षात येतात. संतांच्या अनुभूतींमधून सामूहिक अबोध मनातील आदिबंधांचे दर्शन घडते. युंगच्या मते मानवी मन शोधणे हेच आजचे खरे विज्ञान होय.
सामूहिक अबोध मन
By admin | Updated: November 9, 2015 21:38 IST