नारळाची ‘थाई’ लज्जत

By Admin | Updated: June 12, 2016 05:19 IST2016-06-12T05:19:04+5:302016-06-12T05:19:04+5:30

आपल्याकडे मुबलक प्रमाणात नारळाचा उपयोग जेवणात केला जातो. काही घरात तर पदार्थांत नारळाशिवाय पानही हलत नाही, पण नारळाच्या दुधाचा सर्रास आणि जरा हटके वापर थाई पदार्थांत केला जातो.

Coconut 'Thai' flavor | नारळाची ‘थाई’ लज्जत

नारळाची ‘थाई’ लज्जत

- भक्ती सोमण

आपल्याकडे मुबलक प्रमाणात नारळाचा उपयोग जेवणात केला जातो. काही घरात तर पदार्थांत नारळाशिवाय पानही हलत नाही, पण नारळाच्या दुधाचा सर्रास आणि जरा हटके वापर थाई पदार्थांत केला जातो. चवीला जरी वेगळे असले, तरी नारळाचे दूध वापरल्याने ते थोडे आपलेसेच वाटतात.

माझ्या मैत्रिणीला शुभाला विविध पदार्थ करण्याची आणि ते दुसऱ्याला खाऊ घालण्याची प्रचंड आवड. तिच्याकडे जेवायला गेले की, हमखास ताटात काहीतरी वेगळे असणार याची खात्री. अशीच तिच्याकडे जेवायला गेले असताना, तिने लाल रंगाची करी केली होती. ती होती थाई करी. थोडीशी तिखट, पण क्रिमी आणि टेस्टी. ती करी नारळाच्या दुधापासून तयार केली होती. ही करी भाताबरोबर खाताना आणखी लज्जतदार लागत होती. थाई पदार्थ आणि तेही नारळाच्या दुधापासून तयार होतात, हे ऐकल्यावर तर ते पदार्थ अगदी जवळचेच वाटायला लागले.
नारळ हा प्रत्येक घरात असतोच. नारळाच्या दुधापासून तयार झालेली ‘सोलकढी’ तर आपल्याकडे विशेष प्रिय. असेच नारळाचे दूध काढल्यावर त्यापासून वेगवेगळ््या थाई करी, सूप असे विविध प्रकार अगदी सहज करता येतात. थाई जेवणात प्रामुख्याने मांसाहारी पदार्थ मोठ्या प्रमाणात केले जातात, पण विविध भाज्यांचा उपयोग करून शाकाहारी पदार्थ सहज करू शकतात. थाई जेवणात प्रामुख्याने विविध सॅलेड्स, भात, करी यांचे प्रमाण अधिक. आपण ज्याप्रमाणे पदार्थाला खमंग चव येण्यासाठी कोथिंबीर, कडीपत्ता वापरतो. त्याप्रमाणे, थाई जेवणात लेमन ग्रास, लेमन लिव्हज, तुळस (बेसिल), थाई लाल मिरच्या, लिंबाचा रस, कोथिंबिरीच्या काड्या आणि गलांगल या थाई आल्याचा वापर प्रामुख्याने सर्वच पदार्थांत केला जातो. गलांगलची चव थोडीशी उग्र आणि चटकदार असते. त्यामुळे फक्त फ्लेवरसाठी त्याचा अगदी थोडा वापर केला जातो. वरील सर्व घटकांची स्वत:ची अशी विशिष्ट चव आहे, त्या चवीचे गुणधर्म थाई पदार्थांत उतरतात.
थाई जेवणात प्रामुख्याने विविध करी केल्या जातात. त्या सर्व नारळाच्या दुधापासूनच तयार होतात. थाई रेड करी करायची असल्यास, त्यात थोड्याशा तेलात गलांगल, लेमन लिव्हज, बेसिल, लेमन ग्रास, स्पाइसी थार्ई रेड चिली, थाई करी पेस्ट, चिली पेस्ट, चिली आॅइल, मीठ, साखर, गाजर, विविधरंगी ढोबळी मिरच्या, ब्रोकोली, मशरूम अशा भाज्या घालून शिजवताना, त्यात नारळाचे दूध आणि भरपूर लिंबाचा रस घालून शिजवले जाते. या भाजीत मसाल्यांचे, भाजीचे आणि नारळाच्या दुधाचे सगळे फ्लेवर उतरतात. त्यामुळे खाताना ही करी थोडी उग्र लागते. मात्र, वरील मसाल्यांचे प्रमाण कमी-जास्त करता येऊ शकते. तर वरीलप्रमाणेच पालक पेस्टचा वापर करून, त्यात नारळाचे दूध आणि भाज्या घालून ग्रीन करी तयार होते. दुधात हळद मिक्स करून तयार होणारी येलो ग्रेव्ही असते. कोणत्याही रंगाची करी करायची असली, तरी त्याला बेस मात्र, नारळाच्या दुधाचाच लागतो. नारळाच्या दुधामुळेच या जेवणात खरी मजा येते, असे थाई क्युझिनचे शेफ दुर्गे खडका यांनी सांगितले.
थाई पदार्थांच्या नावाचेही आपले असे वेगळे वैशिष्ट्य आहे. म्हणजे वरील मसाले, भाज्या, थाई सॉसेस एकत्र करून जो व्हेज भात केला जातो, त्याला 'खाओ फड सीम' म्हणतात. म्हणजेच खा (खाओ) फ्राइड राइस(फड), सीम(व्हेजिटेबल), तर नॉनव्हेज भाताला खाओ फड काय (नॉनव्हेज) म्हणतात. 'पड थाड’, नारळाच्या दुधात भात आणि भाज्या घालून केलेला 'बेबी कातो राइस', ‘पॉट राईस’ अशा प्रकारची विविध नावे पदार्थांना असतात. हॉटेलात ही नावे वाचून-पाहून गोंधळायला झाले, तरी पदार्थांच्या खाली तो काय आहे, हे दिले असल्याने आपला गोंधळ कमी होतो.
घरी जर हे पदार्थ करायचे असतील, तर अगदी साधं आलं, तुळशीची पानं, लिंबाच्या वरचं साल वापरून ते चव थोडीशी बदलून ते सहज करता येऊ शकतात. नाहीतर आजकाल बाजारात हे प्रकार सर्रास उपलब्ध आहेत. आणि हो, नारळाचं दूध मात्र विसरू नका! खरं तर थाई जेवणाविषयी लिहिण्यासारखं खूप आहे, पण नुसतं वाचून समाधान मानण्यापेक्षा ते खाऊन बघण्यात खरी मजा आहे, नाही का!

हळदीचा हटके वापर
रोजच्या जेवणात भाजी- आमटीत किंवा इतर पदार्थांत आपण हळदीचा वापर अगदी अर्धा वा एक चमचा इतकाच करतो, पण थाई पदार्थांत चक्क हळदीचे सूप केले जाते. थोड्या तेलात आवडीप्रमाणे भाज्या आणि नारळाचे दूध घालायचे. नारळाचे दूध शिजत असताना त्यात साधारण दोन ते चार चमचे हळद टाकून चांगले शिजवायचे. यात गलांगल कोथिंबिरीच्या काड्या, तुळशीची पानेही घालायची. याचे नाव आपण मात्र हळदीचे सूप असेच देऊ. मात्र, थाई जेवणात याचे नाव 'टॉम यम' सूप केले जाते. हळद आणि नारळाच्या मिश्रणाबरोबरच थोड्याशा तिखटपणामुळे या सूपची लज्जत खूपच वेगळी आणि छान असते.

Web Title: Coconut 'Thai' flavor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.