सहकाराचे रण पुन्हा तापणार
By Admin | Updated: April 1, 2015 22:45 IST2015-04-01T22:45:47+5:302015-04-01T22:45:47+5:30
केंद्रात आणि राज्यात कॉँग्रेस आघाडीची सरकारे गेली आणि भाजपा सत्तेवर आली. याचा मोठा परिणाम पश्चिम महाराष्ट्रावर होत राहणार असून, त्याची सुरुवात

सहकाराचे रण पुन्हा तापणार
वसंत भोसले -
केंद्रात आणि राज्यात कॉँग्रेस आघाडीची सरकारे गेली आणि भाजपा सत्तेवर आली. याचा मोठा परिणाम पश्चिम महाराष्ट्रावर होत राहणार असून, त्याची सुरुवात कोल्हापूर-सातारा-सांगली जिल्ह्यांतून होत आहे. लोकसभा आणि विधानसभेत कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व निम्म्यावर आणणे भाजपा तसेच शिवसेनेला शक्य झाले असले तरी सहकारी संस्था, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व तसूभरही कमी झालेले नाही. या पार्श्वभूमीवर एप्रिल-मे या महिन्यांत अनेक महत्त्वपूर्ण सहकारी संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्यात कोल्हापूर, सांगली तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह सुमारे १२०० कोटी रुपयांची उलाढाल असलेला कोल्हापूरचा गोकुळ दूध संघ, साताऱ्यातील कृष्णा साखर कारखाना, किसनवीर साखर कारखाना, कोल्हापूरचा राजाराम सहकारी साखर कारखाना, सांगली व कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँका, सांगली अर्बन बँक अशा अनेक संस्थांच्या समावेश आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या संपूर्ण राजकारणाला वेढून टाकणाऱ्या गोकुळ दूध संघ आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका सर्वांत महत्त्वाच्या ठरणार आहेत. गोकुळ दूध संघ हा तर राजकारण्यांचा आर्थिक स्त्रोत म्हणून पाहिला जातो. प्रत्येक तालुक्यातून पक्षाच्या मर्यादा बाजूला ठेवून गट-तट तसेच नातेवाइकांचे राजकारण खेळले जाते. या राजकारणाचे नेतृत्व काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक सांभाळतात. त्यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांची साथ आहे; पण यावेळी कॉँगे्रसचे नेते व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीच आव्हान दिले आहे. महाडिकविरुद्ध सतेज पाटील असा हा संघर्ष उभा राहत आहे. त्यात महाडिक विरोधातील सर्व एकत्र येणार आहेत; पण महाडिक यांच्याकडे सत्ता आणि कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते आहेत. शिवाय त्यांचे चिरंजीव अमल महाडिक भाजपाचे आमदार आहेत. त्यामुळे सहकारमंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेही समर्थन आहे. भाजपाला जिल्ह्यात एकाही मोठ्या संस्थेत स्थान नाही. सत्तेचा वापर करीत एखादे संचालकपद मिळते का, एवढीच आशा त्यांना आहे. याचवेळी राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. तेथेही महादेवराव महाडिक यांची सत्ता असल्याने सतेज पाटील गटाने आव्हान दिले आहे. कोल्हापूर जिल्हा बॅँकेची निवडणूक जाहीर झाली आहे; पण अद्याप गटा-तटाचे राजकारण स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे ही बॅँक असताना तीन वर्षांपूर्वी कारवाई झाली. तीन वर्षांत प्रशासकांनी बॅँक पूर्वपदावर आणली आहे.
सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या मध्यवर्ती सहकारी बँकांच्या राजकारणानेही जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार आहे. साताऱ्याची बँक राष्ट्रवादीकडे राहिली आहे. ती चांगल्या स्थितीत आहे; मात्र ‘सांगली’वरही प्रशासकीय कारवाई झाली होती. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ तीन वर्षांपूर्वी बरखास्त झाले होते. राष्ट्रवादीचे नेते आर.आर. पाटील यांचे निधन झाले, तर अनेक नेत्यांनी भाजपामध्ये जाणे पसंत केले. परिणामी माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावरच जिल्ह्यातील राजकारणाची भिस्त आहे. शिवाय कॉँग्रेसचे जिल्ह्यातील एकमेव आमदार असलेले पतंगराव कदम यांनाही नव्याने जुळणी करावी लागणार आहे. सांगलीत भाजपाचे खासदार अणि चार आमदार असल्याने हा पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवितो, की राष्ट्रवादीच्या डावपेचांना बळी पडतो हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे. साताऱ्यातील कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि किसनवीर सहकारी साखर कारखाना यांच्या निवडणुका पारंपरिक राजकीय गटांत रंगणार आहेत. या कारखान्यांचे कार्यक्षेत्र मोठे आहे आणि त्याचे राजकारणावर मोठे परिणाम होत असतात. त्यामुळे राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच स्थानिक राजकारणाने उन्हाळ्याप्रमाणे राजकीय वातावरण तापणार-रंगणार आहे.