शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गाडीला लाल दिवा लागल्याचं समाधान देणारं औटघटकेचं मंत्रिपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 04:42 IST

तसेही हे मंत्रिपद औटघटकेपुरतेच

तसेही हे मंत्रिपद औटघटकेपुरतेच. पावसाळी अधिवेशनात तीन आठवडे जातील आणि हार-तुरे, सत्कार स्वीकारेपर्यंत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली असेल. गाडीला लालदिवा लागला एवढेच काय ते समाधान !राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार रविवारी उरकण्यात आला. गेली अनेक महिने यासाठी देवेंद्र फडणवीस हातात यादी घेऊन दिल्लीवारी करत होते. मात्र, भाजप पक्षश्रेष्ठींकडून त्यास हिरवा कंदील मिळत नव्हता. अखेर शनिवारी तो मिळाला आणि रविवारी इच्छुकांचे घोडे गंगेत न्हाले! फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आरंभापासूनच पाच खात्यांचा अतिरिक्त कारभार इतर मंत्र्यांवर सोपविण्यात आला होता. त्यात पांडुरंग फुंडकरांचे अकाली निधन, एकनाथ खडसेंची उचलबांगडी यामुळे आणखी दोन खाती रिक्त झाली होती. राज्यात कमालीचा दुष्काळ पडलेला असताना कृषी सारख्या महत्त्वाच्या खात्याला स्वतंत्र मंत्रीच नव्हता. हे सरकार ‘अतिरिक्त’ कार्यभारावर चालणारे सरकार आहे, अशी टीकाही झाली. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आता १३ नव्या चेहऱ्यांचा समावेश झाला आहे. पैकी, राधाकृष्ण विखे आणि जयदत्त क्षीरसागर या दोन आयारामांना मंत्रिपदाचा पूर्वानुभव आहे. बाकीचे नवखे आणि तरुण आहेत.

विद्यमान मंत्र्यांपैकी प्रकाश मेहता, विष्णू सवरा, राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे आणि अंबरिश आत्राम यांना डिच्चू देण्यात आला. हे सहाही जण अत्यंत अकार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जात होते. मेहतांवर तर लोकायुक्तांनीच ताशेरे ओढलेले आणि कांबळे यांच्यावर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेला आहे. बडोलेंनी केलेले ‘समाजकल्याण’ सर्वश्रुत आहे. बाकी पोटे आणि आत्राम हे मंत्री होते, हे आजच समजले. सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीचे हे शेवटचे अधिवेशन असल्याने विरोधकांच्या हाती आयताच दारुगोळा लागू नये म्हणून या सर्वांची गच्छंती करण्यात आली.
या विस्तारास विलंब झाला असला, तरी नव्या चेहऱ्यांचा समावेश करताना जातीय, सामाजिक आणि प्रादेशिक समतोल साधताना फडणवीसांनी मोठे चातुर्य दाखवलेले दिसते. एकनाथ खडसेंना दूर ठेवण्यात ते पुन्हा यशस्वी झाले आहेत. तसेच मराठा समाजाचे प्रतिनिधित्व वाढवत असताना तेली, माळी, कुणबी आणि बौद्ध या उपेक्षित घटकांना प्रतिनिधित्व देऊन त्यांची सत्तेप्रति असलेली वंचना काही अंशी का होईना दूर केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘डीएमके’ म्हणजे, दलित, मुस्लीम आणि कुणबी असा फॉर्म्युला वापवरून विदर्भातील भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांविरुद्ध आव्हान उभे करण्यात आले होते. स्वत: नितीन गडकरी यांनादेखील या फॉर्म्युल्याचा मनस्ताप झालेला होता. त्यामुळे संजय कुटे, अनिल बोंडे आणि परिणय फुके यांचा समावेश करून कुणबी मंत्र्यांची संख्या चारवर नेण्यात आली आहे. शिवाय, विदर्भाला झुकते माप देत असताना पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष दिल्याचे दिसते.
विखे यांनी भाजपमध्ये रीतसर प्रवेश केलेला नसताना त्यांना थेट मंत्री करून फडणवीसांनी एका दगडात अनेक पक्षी टिपले आहेत. विखेंच्या समावेशाने उत्तर महाराष्ट्रावर भाजपची मांड पक्की झाली आहे. सुरेश खाडे यांच्या रूपाने सांगली जिल्ह्याला या सरकारमध्ये प्रथमच मंत्रिपद लाभले आहे. पुण्यातून गिरीश बापट यांच्या जागी बाळा भेगडे यांना संधी मिळाली आहे. शिवसेनेने जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद देऊन मराठवाड्यात नवे नेतृत्व उभे केले आहे. मात्र, शिवसेना-भाजपचे सर्वाधिक आमदार असलेला नाशिक जिल्हा या वेळीही उपेक्षितच राहिला.
विखे-क्षीरसागर या आयारामांना थेट मंत्रिपद दिल्याने या दोन्ही पक्षांतील निष्ठावंत नाराज होतील खरे; पण अशा निष्ठावंतांची पर्वा करतंय कोण? आणि तसेही हे मंत्रिपद औटघटकेपुरतेच आहे. पावसाळी अधिवेशनात तीन आठवडे जातील आणि हार-तुरे, सत्कार स्वीकारेपर्यंत विधानसभेची आचारसंहिता लागू झालेली असेल. लालदिवा मिळाला, एवढेच काय ते समाधान ! या सरकारपुढे दुष्काळ निवारणाचे मोठे आव्हान आहे. साऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले आहेत. वरुणराजाने आधीच ओढ दिलेली आहे. तो आणखी उशिराने आला तर शेतकऱ्यांसोबत सरकारच्याही तोंडचे पाणी पळालेले असेल. त्यामुळे या नव्या लालदिव्यांचे कितपत स्वागत होईल, याबाबत साशंकताच आहे.

टॅग्स :BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलShiv Senaशिवसेना