संघर्षातून ‘स्वच्छ’ भरारी
By Admin | Updated: May 5, 2016 03:16 IST2016-05-05T03:16:28+5:302016-05-05T03:16:28+5:30
अन्न, वस्र, निवारा यांबरोबरच जगण्याला हवा असतो सन्मान. आयुष्याला चळवळीचं रूप देऊन ताठ मानेनं जगायला शिकवणारी ही व्यक्तिमत्त्वे प्रेरणादायी असतात.

संघर्षातून ‘स्वच्छ’ भरारी
- विजय बाविस्कर
अन्न, वस्र, निवारा यांबरोबरच जगण्याला हवा असतो सन्मान. आयुष्याला चळवळीचं रूप देऊन ताठ मानेनं जगायला शिकवणारी ही व्यक्तिमत्त्वे प्रेरणादायी असतात.
‘आभाळाची आम्ही लेकरे,
काळी माती आई
जात वेगळी नाही,
आम्हा धर्म वेगळा नाही’
हे समता गीत गात गात संघटित झालेल्या कचरावेचकांच्या न्याय्य हक्कांसाठी एक अशिक्षित महिला थेट जागतिक व्यासपीठावर जाते. आपले म्हणणे बेडरपणे मांडते. कचरावेचकांच्या मोर्चा-आंदोलनापासून मंत्रालयातल्या बैठकांपर्यंत ही महिला आपला आवाज उठवते. काम आणि कर्तृत्वभरारीमुळे आजवर अनेक पुरस्कार प्राप्त केलेल्या सुमन मरिबा मोरे यांना नुकतेच ‘सह्याद्री’ वाहिनीच्या हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अन्न, वस्त्र, निवारा एवढंच काही जणांच्या आयुष्याचं ध्येय असतं; मात्र जगण्याला हवा असतो सन्मान. आयुष्याला चळवळीचं रूप देऊन ताठ मानेनं जगायला शिकवणारी ही व्यक्तिमत्त्वे प्रेरणादायी असतात.
सुमन मोरे या मराठवाड्यात १९७२च्या भीषण दुष्काळात उस्मानाबाद जिल्ह्यातून पुण्यात आल्या. पडेल ते काम करीत गुलटेकडीतल्या पदपथावर मुलाबाळांसह हे कुटुंब राहिलं. त्यानंतर कचराकुंडीतलं विक्रीयोग्य भंगार गोळा करायला सुरुवात केली. हजारो कचरावेचक शहरात होते; परंतु त्यांच्यामध्ये एकसंधता नव्हती. पोलीस आणि इतर यंत्रणांकडून शोषण केलं जात होतं. कचरावेचकांची परवड थांबवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव व दलित स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन ननावरे यांच्या कल्पनेतून ‘कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत’ ही संघटना अस्तित्वात आली. कचरावेचकांमध्ये ८० टक्के महिलाच आहेत. यातीलच एक सुमन मोरे पौर्णिमा चिकरमाने, लक्ष्मी नारायण, शबाना दिलेर या समाजसेविकांनी या महिलांमध्ये व्यवस्थेविरुद्ध लढण्याची ऊर्जा निर्माण केली. सुमनतार्इंनीही या चळवळींमध्ये हिरिरीनं भाग घेतला. व्यवस्थेनं उपेक्षिताचं जिणं पदरात टाकलेलं होतं. त्यावर मात करून घरात त्यांनी शिक्षणाचा अंकुर रुजवला. डॉ. बाबा आढाव यांच्या शब्दांनी व विचारांनी प्रभावित झालेल्या सुमनतार्इंनी स्वत:च्या मुलांना शिकवलं. पती पोतराज असतानाही त्यांनी मुलांना जाणीवपूर्वक या देवपसाऱ्यातून बाजूला ठेवलं. कालांतरानं पुण्यातल्या कचराकुंड्या हद्दपार करण्याची मोहीम राबवली गेली. घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी ‘स्वच्छ’ संघटना स्थापन करण्यात आली. सध्या सुमनताई अध्यक्षपदी आहेत. नेपाळमधल्या कचरावेचकांना धडे देण्यासाठी त्यांना पाठवण्यात आलं. कचरा वर्गीकरण, त्याचे पर्यावरणीय फायदे त्यांनी समजावून सांगितले. दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊन इथं २०११मध्ये झालेल्या जागतिक पर्यावरण परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली. या परिषदेत त्यांनी जगभरातल्या कचरावेचकांच्या व्यथा, कामातील अडचणी, समाजाचा दृष्टिकोन मांडून कचरावेचकालाही सन्मान मिळायला हवा; पर्यावरण रक्षणासाठी कार्बन कंट्रोलच्या नावाखाली बड्या कंपन्यांना जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळणारा निधी कचरावेचकांनाही मिळायला हवा, अशी रोखठोक भूमिका मांडली. स्वित्झर्लंडमधल्या जिनिव्हा इथं झालेल्या जागतिक श्रम परिषदेत सलग दोन वेळा संघटनेचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं. निरक्षर असलेल्या सुमनतार्इंनी घेतलेली ही भरारी अनेकांना प्रेरणा आणि स्फूर्ती देणारी आहे.
कष्टकरी बांधवांचं अस्तित्व अद्यापही मान्य केलं जात नाही. कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीची पतपेढी आहे. कचरावेचकांच्या विमा आणि पेन्शनसाठी व शिक्षण हक्क कायद्यासाठी मोठा लढा उभा केला आहे. त्यांना एन्व्हायर्नमेंट फोरम आॅफ इंडिया, सेवा त्याग आदि अनेक पुरस्कार मिळाले आहेत. खरं कर्तृत्व वर्ण, जात, वंश, शिक्षण यांत नसतं, तर ते प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वत:ला सिद्ध करण्याच्या संघर्षात असतं, हेच सुमन मोरे यांनी सिद्ध केलं आहे. त्यांना सलाम.