नागरिकांच्या सोशीकतेची कसोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 03:12 PM2019-07-16T15:12:50+5:302019-07-16T15:16:19+5:30

मिलिंद कुलकर्णी जळगावकर जनता खूप सोशीक आहे. काहीही दोष नसताना त्याला हालअपेष्टा सोसाव्या लागतात. पोट भरण्याचे साधन याठिकाणी असल्याने ...

Citizenship test of citizens! | नागरिकांच्या सोशीकतेची कसोटी!

नागरिकांच्या सोशीकतेची कसोटी!

Next

मिलिंद कुलकर्णी
जळगावकर जनता खूप सोशीक आहे. काहीही दोष नसताना त्याला हालअपेष्टा सोसाव्या लागतात. पोट भरण्याचे साधन याठिकाणी असल्याने मारुन मुटकून त्याला याठिकाणी राहणे भाग आहे. शेजारील औरंगाबाद, नाशिकची प्रगती पाहत असताना आपल्या जळगावला असे का होऊ शकत नाही, असा प्रश्न त्याला भंडावून सोडतो. पुढची पिढी आताच नाके मुरडत असल्याने ती बाहेरगावी जाणार हे निश्चित आहे. अशाही वातावरणात तो आशावादी आहे. काही तरी चांगले घडेल. बदल घडेल. हेही दिवस जातील, या आशेवर तो जगत आहे.
परंतु, परवा अनिल श्रीधर बोरोले गेले आणि सामान्य जळगावकर धास्तावला. मनातून भेदरला. अनिलदादा प्रतिष्ठित उद्योजक होते. स्वकर्तृत्वाने त्यांनी उद्योग उभारला. तरीही स्वान्तसुखाय न राहता, नवतरुणांना उद्योगासाठी प्रेरणा देत असत. मदत करीत. लेवा पाटीदार मंडळाच्या उपक्रमात ते अग्रभागी असत. ‘मी’पणाचा कोणताही अहंकार येऊ न देता निरलसपणे काम करणाऱ्या अनिलदादांचे जाणे हृदय पिळवटून टाकणारे आहे. शहराच्या दुरवस्थेचे ते बळी ठरल्याचे आक्रंदन प्रत्येक जळगावकराच्या मनात आहे. ही दूरवस्था होण्यास जी मंडळी जबाबदार आहेत, त्यांच्याविषयी वेळीच आवाज न उठवल्याने जळगावकर स्वत:ला दोषी मानत आहेत. स्वत:च्या सोशीकतेचा, सहनशीलतेचा आता त्याला संताप येऊ लागला आहे. समाजमाध्यमांद्वारे तो व्यक्त होत आहे. पण त्याला संघटितरुप द्यावे की, नाही याविषयी तो संभ्रमित आहे.
संभ्रमीत अवस्थेला काही कारणे आहेत. राष्टÑीय महामार्गाचे चौपदरीकरण व समांतर रस्त्याच्या मागणीसाठी दोनदा आंदोलने झाली. विविध संस्था, संघटना, मातब्बर नागरिकांनी त्यात सहभाग नोंदविला. लोकप्रतिनिधी, मंत्र्यांनी दखल घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी मागणी मान्य करुन कालबध्द नियोजन देऊन काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र आजतागायत हे काम सुरु झाले नाही. शनिवारी अनिलदादा गेले. रविवारी या महामार्गावर तरुण गेला. असे किती बळी जाणार हा प्रश्न मनात असला तरी आंदोलनावरचा विश्वास देखील उडाला आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी इतके निगरगट्ट झाले आहेत की, आंदोलन गुंडाळण्यात त्यांचा हातखंडा आहे. सामान्य जनतेच्या तोंडाला पाने पुसण्यात ते माहीर आहेत. हताश, हतबल आणि विन्मुख झालेल्या या जनतेकडून आपल्याला काही धोका नाही, हे आपल्याच दावणीला बांधलेले आहेत, अशी लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष आणि प्रशासकीय अधिकाºयांची गृहित धरण्याची वृत्ती मस्तवालपणाची आहे. हात मस्तवालपणा जनतेने उतरविल्याची इतिहासात थोडे डोकावले तर अनेक दाखले आपल्याला दिसतील. आणीबाणीचा काळा अंधार जनतेने भेदला होता. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करीत ‘शायनिंग इंडिया’चा डांगोरा पिटणाºया राष्टÑीय लोकशाही आघाडीच्या पहिल्या सरकारला याच जनतेने अंधारात ढकलले होते, हे विसरता कामा नये.
दळणवळणाच्या बाबतीत सत्ताधारी भाजप सरकारच्या नियोजनाचे पुरते बारा वाजलेले आहेत. जळगावला जोडणाºया सर्वच रस्त्यांचे एकाचवेळी काम हाती घेऊन उद्योग, व्यापार आणि सामान्य जनता या सगळ्यांना वेठीस धरण्याचा गुन्हा राज्य सरकार, केंद्र सरकार आणि भाजपच्या लोकप्रतिनिधींनी केला आहे. औरंगाबादचा संपूर्ण रस्ता खोदून ठेवला आणि आता ठेकेदाराने हात वर केले. जळगावातून मोठ्या संख्येने खाजगी गाड्या पुण्याला जातात. त्यांनी औरंगाबादचा मार्ग बंद करुन धुळे, मालेगाव, शिर्डी, नगर हा मार्ग निवडला आहे. औरंगाबादला जायला चाळीसगाव, कन्नड हा ५०-६० कि.मी.चा फेरा पडत आहे. दालमिलचे भवितव्य मराठवाड्याशी संपर्क तुटल्याने संकटात आले आहे. जळगाव ते धुळे या महामार्गाचे काम अतीशय संथ गतीने सुरु आहे. त्यातल्या त्यात भुसावळ आणि चाळीसगाव मार्गाचे काम सुरु असले तरी भर पावसाळ्यात नागरिकांच्या त्रासाला पारावार उरलेला नाही.
केंद्रातील भाजप सरकार जसे गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित प्रश्नांचे खापर काँग्रेस आणि नेहरु यांच्यावर फोडत आले आहे, तसेच जळगावात भाजप आमदार सुरेश भोळे आणि महापौर सीमा भोळे हे सुरेशदादा जैन आणि खान्देश विकास आघाडीला जबाबदार धरत आहेत. पाच वर्षांत आमदारांनी आणि दहा महिन्यात महापौरांनी काय केले, हे मात्र सांगायला ते सोयिस्कर विसरत आहे. जळगावकरांच्या सोशीकता, सहनशीलतेचा अंत पाहू नका, एवढेच आवाहन करावेसे वाटते.

 

 

Web Title: Citizenship test of citizens!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.