शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

शहरे मृत्युशय्येवर! निम्मा महाराष्ट्र मुंबई, पुण्यात वसत असेल तर 'बुडणारच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 08:00 IST

‘मल्टिऑर्गन फेल्युअर’च्या दिशेनं निघालीत शहरं. याचा पुरावा आधी मिळाला मुंबई-नागपुरात व काल पुण्यात.

पावसाचा एक तडाखा पुरेसा असतो, तुमच्या विकासाची रंगरंगोटी पुसण्यासाठी. ‘तुम्ही किती पाण्यात आहात’, हे मग समजते! तुम्ही नदीपात्रात रस्ता बांधला की नदी रस्त्यावर येते. नाल्यांवर इमारती बांधल्या की इमारतीत नाला घुसतो. मग साधा पाऊसही शहरांना सोसवत नाही. एखाद्या पावसानेही शहर उद्ध्वस्त होते. होत्याचे नव्हते होते. आपल्या शहरांची प्रतिकारक्षमताच संपत चाललीय. ‘मल्टिऑर्गन फेल्युअर’च्या दिशेनं निघालीत शहरं. याचा पुरावा आधी मिळाला मुंबई-नागपुरात व काल पुण्यात. बुधवारी पुण्यात जोरदार पाऊस बरसला. पाऊसच तो. बरसणं हे त्याचं काम. त्याची मर्जी. तो हवा तेवढा बरसतो. कधी चकार थेंबही देत नाही, तर कधी थांबण्याचे नाव घेत नाही. लहरी हा स्वभावच पावसाचा, पण माणसांचे काय? माणसाने सारासार विवेक सोडला, म्हणूनच तर पुण्याची ही स्थिती झाली.

‘ग्रोथ इंजिन’, ‘ऑक्स्फर्ड ऑफ द इस्ट’ वगैरे ख्याती असणारे हेच का ते पुणे, उद्योगनगरी आणि आयटी हब झालेले हेच का ते पिंपरी-चिंचवड, असा प्रश्न तेव्हा पडत होता. मध्ययुगाप्रमाणे माणसे हतबल झाली आणि एका पावसाने पार लष्कराला बोलावण्याची वेळ आली. पुण्यातला कालचा पाऊस उच्चांकी असला, तरी पुणे पाण्यात जावे, इतकाही नव्हता. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे आजही शंभर टक्के भरलेली नाहीत. यातील तुलनेने छोट्या असलेल्या खडकवासला धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग करावा लागला. त्यामुळे वस्त्यांमध्ये पाणी शिरले. सिंहगड रस्ता परिसरात जवळपास चार हजार नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. एकूण पुणे जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू झाला. पुण्यातील मुळा-मुठा नदी, मुंबईतील मिठी, आळंदीमधील इंद्रायणी, तसेच पवना, राम नदी यांची अवस्था आज मरणासन्न आहे. पावसाळ्याखेरीज इतर महिन्यांत या नद्यांमधून वाहते ते प्रदूषित पाणी. या नद्यांवरच्या पुलांवरून जाताना नाकाला रुमाल लावून धरावा लागतो. प्रदूषित नदी, बुजवलेले नाले यांचा सविस्तर अभ्यास अभ्यासकांनी केला आहे. त्याचे अहवालही आहेत. पण, त्यावर हालचालीच नाहीत. एका अभ्यासानुसार पावसाचे २५ ते ३० टक्के पाणी जमिनीत मुरणे आवश्यक असताना आता केवळ पाच टक्केच पाणी मुरत आहे. ९५ टक्के पाणी वाहून जात आहे.

इमारतींचा पाया खणताना खणलेल्या खडकामुळे आणि त्यानंतर झालेल्या सिमेंटीकरणामुळे अनेक जलस्रोत आपण बंद करीत आहेत, याची फिकीर कुणालाही नाही. गेल्या तीन दशकांत पुण्यातील तीनशेहून अधिक लहान-मोठे जलस्रोत नाहीसे झाले आहेत. नाल्यात कचरा टाकून तो बुजवणे, एखादी इमारत बांधताना नैसर्गिक ओढ्याचा प्रवाह बदलला तर इमारतीत पाणी येणारच. रस्ते बांधताना शेजारी पाणी जाण्यासाठी वाट ठेवली नाही, तर पावसात रस्त्यांची तळी होणार. अशी नियोजनशून्य कामे करून आपण आपल्याच पुढे संकट उभे करीत आहोत. आपण पुढच्या पिढ्यांना नक्की काय देत आहोत, याचा विचार आपण करतो का? त्यांच्यासाठी राखीव असलेल्या संपत्तीवर आपण डल्ला मारतोय, याची थोडीही लाज आपल्याला वाटत नाही. शहरांच्या धमन्या, फुफ्फुसे असलेली जैवविविधता नष्ट करण्याचा चंग बांधल्यानंतर वेगळी स्थिती ती काय उद्भवणार? महापालिका अधिकारी आणि बिल्डर लॉबीतील साटेलोटेपणामुळे शहर जवळपास संपले आहे. बांधकामाचे परवाने कसेही देणे, नदीपात्रात रस्ते बांधणे, नाले, ओढे बुजवणे, बेकायदा बांधकामे, सिमेंटचे रस्ते, टेकड्या फोडणे, टेकड्यांवर झोपडपट्ट्यांना आश्रय देणे यांसारखे उद्योग केल्यानंतर निसर्गही आपल्याला अद्दलच घडवेल. विकासाचे फसलेले प्रारूप याला जबाबदार आहे.

पुणे-मुंबईत सगळे एकवटून टाकायचे. बाकी महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करायचे. त्यातून निर्माण झालेले हे संकट आहे. पावसाने जरा ओढ दिली की डोळ्यात पाणी आणि जरा मुसळधार बरसला की घरादाराची राखरांगोळी, याला विकास म्हणत नाहीत. महाराष्ट्राची निम्मी लोकसंख्या आज पुणे आणि मुंबईवर अवलंबून असेल, तर यापेक्षा वेगळे चित्र कसे असेल? आपल्या यंत्रणा किती बेमुर्वतखोर आहेत, हे पोर्शे प्रकरणाने सिद्ध केले होतेच. नंतर पूजा खेडकरच्या निमित्ताने ते अधोरेखित झाले. याच यंत्रणांनी शहरांची ही स्थिती करून टाकली आहे. तुम्हाला शहराचे खिसे दिसतात, पण त्यांचे हृदय नाही दिसत. सतत ‘बायपास’ करून पुन्हा पथ्यं नाहीत पाळली, तर मरण आजचे उद्यावर जाईल एवढेच. पण, ते अटळ आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर