चिनी दादागिरी
By Admin | Updated: July 27, 2016 03:43 IST2016-07-27T03:43:20+5:302016-07-27T03:43:20+5:30
चीन आणि भारत या दोन्ही शेजाऱ्यांकडे जग भविष्यातील जागतिक महासत्ता म्हणून बघत आहे. भारताची पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्ती आणि चीनमधील माओप्रणित क्रांती

चिनी दादागिरी
चीन आणि भारत या दोन्ही शेजाऱ्यांकडे जग भविष्यातील जागतिक महासत्ता म्हणून बघत आहे. भारताची पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्ती आणि चीनमधील माओप्रणित क्रांती या दोन्ही घडामोडी आगेमागेच घडल्या असल्या तरी, साम्यवादी शिस्तीच्या बडग्याच्या बळावर चीन विकासाच्या बाबतीत भारताच्या बराच पुढे निघून गेला आहे. गत काही वर्षांपासून तर चीन स्वत:ला महासत्ता समजूनच वागायला लागला आहे. अगदी अमेरिकेसारख्या महासत्तेलाही धमकावण्यापर्यंत चीनची मजल गेली आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांनाही तो देश भीक घालत नसल्याचे, दक्षिण चीन सागर प्रकरणाच्या निमित्ताने नुकतेच जगाला दिसले. आपण आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयास जुमानत नसल्याचे ठणकावल्यावरही आपले कुणी काहीही वाकडे करू शकत नाही, हे बघून शेफारलेल्या चीनने शेजारी देशांना कस्पटाप्रमाणे वागणूक देण्यास प्रारंभ केला आहे. अशात गत काही दिवसात भारताने दोनदा चीनला सडेतोड जबाब दिल्यामुळे त्या देशाचा अगदी तिळपापड झाल्याचे, चिनी प्रसारमाध्यमांमध्ये उमटत असलेल्या प्रतिक्रियांवरून दिसत आहे. लडाखमध्ये भारत-चीन सीमारेषेलगत १०० रणगाडे तैनात करून, भारताने नुकताच चीनला मोठा धक्का दिला. त्यामुळे झालेला चीनचा दाह शांत होण्यापूर्वीच, वेगवेगळी नावे धारण करून संवेदनशील ठिकाणांना वेळोवेळी भेटी देणाऱ्या तीन चिनी पत्रकारांंना देश सोडण्याची तंबी भारताने काही दिवसांपूर्वी दिली. लागोपाठ घडलेल्या या दोन घडामोडींमुळे ड्रॅगनच्या शेपटाला किती भयंकर आग लागली आहे, याची प्रचिती ‘ग्लोबल टाइम्स’या सरकारी मालकीच्या दैनिकाने भारताविरुद्ध सोडलेल्या फुत्कारांवरून येते. चिनी पत्रकारांच्या हकालपट्टीचे गंभीर परिणाम भारताला भोगावे लागतील, अशी धमकीच ‘ग्लोबल टाइम्स’ने दिली आहे. तत्पूर्वी, भारताने लडाखमध्ये रणगाडे तैनात केले तेव्हाही, भारताच्या अशा कृतीमुळे भारतातील चिनी गुंतवणुकीवर विपरित परिणाम होऊ शकतो, असा इशारा याच वर्तमानपत्राने दिला होता. विकासाची भूक प्रदीप्त झालेल्या भारताला मिळेल तेथून गुंतवणूक हवी आहे, हे खरे आहे; पण चीनलाही भारताच्या विशाल बाजारपेठेची तेवढीच गरज आहे, हे चीनने विसरता कामा नये. सध्या चिनी अर्थव्यवस्थेला ग्रहण लागले आहे. युरोप व अमेरिकेला होणारी चीनची निर्यात मोठ्या प्रमाणात घसरली आहे. त्यामुळे भारताला जेवढी चीनची गरज आहे, तेवढीच गरज चीनलाही भारताची आहे. मध्यंतरी भारत अद्यापही १९६२ मधील युद्धाच्या छायेतून बाहेर पडला नसल्याची टीका चीनने केली होती. प्रत्यक्षात मात्र चीनच अजूनही १९६२ मधील मानसिकतेतून बाहेर पडला नसल्याचे चीनच्या धमक्यांवरून दिसते. दादागिरीमुळे आपण भारताला अमेरिकेच्या गोटात ढकलून आपल्या विरोधात एक मजबूत आघाडी उभी राहायला मदत करीत आहोत, हे चीनला कळायला हवे.