ही अनोखी कहाणी आहे दोन प्रेमींची; एकाच वेळी अभागी आणि भाग्यवान जोडप्याची. १९५९ला इंग्लंडमध्ये या कहाणीला सुरुवात झाली. त्यावेळी ॲलन होता केवळ सात वर्षांचा आणि आयरीन होती नऊ वर्षांची. योगायाेगानंच त्यांची भेट झाली. कशी? - कोणीच जवळचं नातेवाईक नसल्यानं ॲलनला एका अनाथालयात सोडण्यात आलं होतं.
एके दिवशी तो आपल्या खोलीच्या खिडकीत उभा असताना दरवाजाशी एक कार थांबली. त्यातून एक मुलगी खाली उतरली. आयरीन तिचं नाव. त्यावेळी ती नऊ वर्षांची होती. याच अनाथालयात भरती करण्यासाठी तिला आणलं होतं. कारण तिची आई तिच्या जन्मानंतर लगेचंच वारली होती. पण आयरिनचं हे पहिलंच अनाथालय नव्हतं. याआधी आणखी दोन अनाथालयांत ती राहून आली होती.
ॲलन आणि आयरीन यांची नजरानजर झाली. लगेच तो दारापाशी आला. पाहताक्षणी त्याला ती आवडली होती. त्याचवेळी त्याला वाटलं, हिच्याशी आपली चांगली मैत्री होईल ! झालंही तसंच. पण अनाथालयाचे नियम अतिशय कडक होते. मुला-मुलींनी एकत्र राहणं, खेळणं तर सोडाच, त्यांनी एकमेकांकडे पाहूदेखील नये, असा तिथला शिरस्ता होता. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा, मुलांना बाहेर सोडल्यावर हे दोघंही तिथेच असलेल्या ‘बनी हिल’ टेकडीवर भेटायचे. खेळायचे, गप्पा मारायचे.
एके दिवशी याच बनी हिलवर ॲलननं आयरीनला प्रपोज केलं. त्याच टेकडीवरचं एक रानफूल त्यानं तिला दिलं आणि म्हटलं, मोठं झाल्यावर मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. करशील तू माझ्याशी लग्न? आयरीन म्हणाली, नक्कीच. पण त्यासाठी आपल्याला थांबावं लागेल.. तिथून पळून जाण्यासाठी या चिमुरड्यांनी एक प्लॅनही आखला.
अनाथालयातील लोक दर उन्हाळ्यात मुलांना इंग्लंडमधील नॉर्थ यॉर्कशायरमधील व्हिटबी या समुद्रकिनारी फिरायला घेऊन जात. दोघांनी ठरवलं, तिथे गेल्यावर आपण पळून जाऊ ! अनाथालयाच्या व्यवस्थापकाला याची कुणकुण लागली आणि त्याच क्षणी दोघांनाही विभक्त करण्यात आलं. ॲलनला शहराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या एका अनाथालयात पाठविण्यात आलं. एके दिवशी ॲलन तिथून पळून गेला. आयरिनला भेटला आणि दोघे पळून गेले. पण पोलिसांनी त्यांना पकडलं आणि पुन्हा दोघांना विभक्त करण्यात आलं. त्यानंतरही अनेकदा आयरीनला भेटण्यासाठी ॲलन अनाथालयातून पळाला; पण प्रत्येकवेळी त्याला पकडण्यात आलं. त्यानंतर अनेक वर्षं गेली. दोघेही मोठे झाले. ॲलन एका नव्या मुलीच्या प्रेमात पडला, पण त्याला आयरीनचा कधीच विसर पडला नाही. एकदा त्याच्या प्रेयसीनं सहज ॲलनला सांगितलं, जिममध्ये मला आयरीन नावाची एक मुलगी भेटली. - ती ‘तीच’ असेल का? ॲलन असोशीनं तिथे गेला. ती ‘त्याचीच’ आयरीन होती.. पण यावेळीही त्यांना पळून जाता आलं नाही. पुन्हा त्यांची ताटातूट झाली. आणखी काही वर्षं गेली. दोघांचाही एकमेकांचा शोध सुरूच होता. एके दिवशी आयरिनला रस्त्यावर अचानक ॲलन दिसला. अत्यानंदानं दोघांनीही रस्त्यातच एकमेकांना आलिंगन दिलं. आता त्यांना पळून जाण्याची गरज नव्हती. त्यानंतर ते पुन्हा त्याच ‘बनी हिल’वर गेले आणि त्यांनी लग्न केलं. त्यांच्या पहिल्या भेटीला आज ४५ वर्षे झाली होती !