मुख्यमंत्री महोदय, गरिबांचा वाली कोण?

By admin | Published: April 24, 2017 12:17 AM2017-04-24T00:17:33+5:302017-04-24T00:17:33+5:30

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश लोकमतने असा काही केला की मुख्य आरोपी आमदार रमेश कदम

Chief Minister, who are the poor people? | मुख्यमंत्री महोदय, गरिबांचा वाली कोण?

मुख्यमंत्री महोदय, गरिबांचा वाली कोण?

Next

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश लोकमतने असा काही केला की मुख्य आरोपी आमदार रमेश कदम यांना तुरुंगाची हवा खावी लागली. त्यांचे घोटाळे हे आघाडी सरकारच्या काळातील होते. त्यापेक्षाही मोठे घोटाळे सामाजिक न्याय विभागात घडले. रमाई घरकुल योजना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या निवासी शाळा, वसतिगृहांना साहित्याच्या पुरवठ्यात, मागासवर्गीयांच्या औद्योगिक सहकारी संस्थांच्या अनुदानात, मागास युवकांना ड्रायव्हिंग शिकविण्याच्या कामांमध्ये प्रचंड घोटाळे झाले. दलितांच्या घरांसाठीचा पैसा परस्पर वळविणे, त्यांच्यासाठीच्या ब्लँकेट, चादरी पुरवठ्यात मलिदा खाणे असे अनेक प्रकार घडले. मात्र, कुणावरही कारवाई झाली नाही. तत्कालीन आयुक्त आर. के. गायकवाड यांच्यासह त्या घोटाळ्यांमध्ये नावे असलेले आजी-माजी अधिकारी मोकाट आहेत. आपल्यावर बालंट येऊ नये म्हणून तत्कालीन पुरवठादारांनी अलीकडे कोणाला किती पैसा देऊन ‘प्रफुल्लि’त केले, पैसे घेण्यात कोण ‘अग्र’भागी होते, याची चौकशी झाली पाहिजे.
सामाजिक न्याय हे शेवटच्या दीनदलित, शोषित, पीडित माणसाशी निगडित असलेले खाते आहे. या खात्यात आघाडी सरकारमध्ये घोटाळे झाल्याचे महालेखापालांनी म्हटले असून, विभागाने त्यावर दिलेल्या अभिप्रायात अनेक अनियमिततांची कबुलीही दिली आहे. मंत्री, सचिवांच्या केबिनच्या भिंतीही त्यांना घोटाळ्यांच्या कथा सांगतील. कशाचीच लाजलज्जा अन् भीत नसलेले बेडर लोक घोटाळे करून मोकळे फिरत आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी असलेले मंत्री अन् अधिकारी बधीर झाल्यासारखे वागत आहेत. गोरगरीब शेवटच्या माणसाच्या हक्काचा पैसा लुटणाऱ्यांबाबत कठोर व्हा. स्वत:ला बाबासाहेबांचे लेकरं म्हणविणाऱ्या तुमच्या सारख्यांकडून थेट कारवाईची अपेक्षा आहे.
विधिमंडळाच्या लोकलेखा समितीने हे प्रकरण हाती घेतल्यामुळे नव्याने चर्चेत आले आहे, पण या समितीला अनेक मर्यादा आहेत. शेवटी ती विधिमंडळाला शिफारशी करू शकते. संबंधितांवर कारवाई करू शकत नाही. त्यामुळेच असे गंभीर प्रकरण हे कोणत्याही समितीच्या कक्षेच्या वर नेऊन कारवाई केली जाण्याची आवश्यकता आहे. सध्या सामाजिक न्याय विभागात कोणाचा कोणाशी ताळमेळ नाही. राज्यमंत्री दिलीप कांबळे हे कॅबिनेट मंत्री राजकुमार बडोले यांच्यावर कुरघोडीची संधी सोडत नाहीत. मंत्र्यांनी पाठविलेले अनेक प्रस्ताव सचिव सुरेंद्रकुमार बागडे भिरकावून देत ंअसत याची उघड चर्चा होती. तिघा मागासवर्गीयांचा एकमेकांवर सामाजिक अन्याय सुरू होता. आता बागडे जाऊन दिनेश वाघमारे आले आहेत. ते याच विभागात पूर्वी सचिव असताना घोटाळे घडलेले आहेत. त्यामुळे कारवाई थांबणार तर नाही? कारवाईबाबत सरकार खरेच गंभीर असेल तर घोटाळ्यात लिप्त असलेल्यांविरुद्ध आधी पोलिसांत तक्रारी करायला हव्यात. त्या काळातील असत्य साईबाबांपासून कोणालाही सोडता कामा नये. या विभागात गेल्या १०-१५ वर्षांत काय काय आणि किती गडबडी झाल्या याची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. अनेकदा ते स्वत:च विधानसभेत त्यावर बोललेही आहेत. म्हणूनच त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा आहे.
जाता जाता : अलीकडे लहानपणच्या एका मित्राची मंत्रालयात अचानक भेट झाली. कामगारमंत्र्यांच्या कार्यालयात एका पीएला काही पैसे मोजून कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम पदरी पाडून घेतले असे सांगत होता. ‘‘माझे आजोबा आणीबाणीच्या काळात १९ महिने जेलमध्ये होते. आता या सरकारमध्ये चिरीमिरी द्यायची तर वाईट वाटते,’’ असे तो मित्र पुटपुटला अन् निघून गेला. व्ही. सतीशजी, रविजी भुसारी आपण तर संघातून आलेले आहात आणि आपल्या विचारांचे सरकार आहे. तरीही असे भलतेसलते का घडत आहे हो? एकापाठोपाठ निवडणुका जिंकत असाल, पण ‘आपल्या’ लोकांच्या मनातून उतरत असाल तर काय फायदा? शेवटी जिंकलो कशासाठी आणि कोणासाठी हेही कळले पाहिजे.
- यदु जोशी

Web Title: Chief Minister, who are the poor people?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.