चातुर्मास्यारंभ !
By Admin | Updated: July 10, 2016 03:58 IST2016-07-10T03:58:17+5:302016-07-10T03:58:17+5:30
परंपरेचा धागा चिवट असतो. सहजासहजी तो तुटत नाही का सुटत नाही. पंचांगाशी असलेले नाते टिकून आहे, ते संकष्टी नाही तर एकादशीमुळे, तेदेखील कॅलेंडरमध्ये दाखवलेले असल्यामुळे.

चातुर्मास्यारंभ !
- रविप्रकाश कुलकर्णी
परंपरेचा धागा चिवट असतो. सहजासहजी तो तुटत नाही का सुटत नाही. पंचांगाशी असलेले नाते टिकून आहे, ते संकष्टी नाही तर एकादशीमुळे, तेदेखील कॅलेंडरमध्ये दाखवलेले असल्यामुळे. एरव्ही आपला संबंध असतो तो इसवीसन दाखवणाऱ्या (ग्रेगरीअन) कॅलेंडरशी.
पाऊस आला की वातावरण बदलते. आषाढाची ती चाहूलखुण असते आणि आषाढ म्हटला की, अजूनही 'आषाढस्थ प्रथम दिने' म्हणणाऱ्या कालिदासाची आठवण अपरिहार्यच. जरी संस्कृतशी तसा संबंध राहिला नाही तरी! हा संस्काराचा कळत-नकळत झालेला संस्कार, नाहीतर दुसरे काय? मग येते ती आषाढी एकादशी- पंढरपूरची वारी चातुर्मास्यारंभाची सुरुवात. आषाढ शुद्ध एकादशी ते कार्मिक शुद्ध एकादशी हा तो चर्तुमास (तारखेप्रमाणे यंदा १५ जुलैला सुरुवात आहे) व्रतवैकल्य, जपजाप्य आणि कुठकुठले यमनियम. शरीर आणि मन यांना भरकटण्यापासून वाचवण्यासाठी केलेली ही योजना. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम यामागे हेच सूत्र दिसते. सण, उत्सव, नेम आणि व्रत यामागची भूमिका हीच आहे, असणार.
चार्तुमासातील एक आचार म्हणजे ग्रंथवाचन. चातुर्मास्याचा हा काळ उपासना करण्यासाठी व ती वाढविण्यासाठी फारच अनुकूल असतो. कारण या पर्वकाळातील केलेली कृत्ये फलदायी होतात, असा अनुभव असल्याने या चार महिन्यांत शरीर आणि मन यांना शिस्त लागण्यासाठी विशेष आचार-विचारांची सांगड घालण्याचा प्रयत्न होतो. मनाला संयम करण्याची सवय लागते आणि त्यायोगे ते अधिक प्रभावशाली बनते हे दिसून येते. यामुळे असेल या चार महिन्यांत विविध ठिकाणी ग्रंथपठणाचे सार्वजनिक आयोजन केलेले दिसते. अशा ठिकाणी एक जण ज्याचा आवाज खणखणीत आहे, असा ग्रंथ वाचतो आणि त्याचे विवेचनही करतो, जे त्या ग्रंथातच केलेले असते. सर्वसाधारणपणे ज्ञानेश्वरी, पांडवप्रताप, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, दासबोध अशा धार्मिक ग्रंथांचा वाचनात समावेश असतो, पण हे श्रवण नेहमी आपण म्हणतो, ते श्रवण नसते तर त्यात कुठेतरी श्रद्धेचा अंत असतो. मी जे काही करतो आहे, ते पुण्याकर्म असून त्याचे मला फळ मिळेल, अशी आता त्यामागे असतेच असते. ‘एक तरी ओवी अनुभवावी’ यामागे तो अर्थ आहे. हा एक प्रकारचा गुंता आहे खरा. याचे सुरेख अनुभवामृत दि. बा.मोकाशी यांच्या ‘आमोद सुवासी आले’ या कथेत आले
आहे.
बाकी श्रोते हे श्रवण करतात. त्याचा आनंद घेतात. ज्या काळात ग्रंथ ही गोष्टच दुर्मीळ होती. आर्थिकदृष्ट्यासुद्धा आणि साक्षरतेचा प्रसारदेखील तळागाळात पोचला नव्हता, अशा काळातील ही व्यवस्था होती. एक प्रकारे त्या काळातला हा बुक क्लब होता, असे म्हणावे काय?
श्रद्धेचे हे बळ मिळत असावं
तुकाराम महाराजांनी म्हटले आहे -
उदंड पाहिले, उदंड ऐकिले
उदंड वर्णिले, क्षेत्र महिमे
ऐसी चंद्रभागा ऐसे भिमातीर
ऐसे संतजन ऐसे हरिदास
ऐसा नामघोष सांगा कोठे
तुका म्हणे आम्हा आकाश कारणे
पंढरी निर्माण केली देणे
पण सगळ्यांनाच त्या पंढरीत प्रत्यक्ष जाता-पाहता येत नाही. वारी आणि चतुर्मासाची सांगड अशी घातली गेली असेल का?
निसर्ग आणि माणसे यांचे नाते सांभाळण्याचाच प्रकार एके काळी सांगितलेला दिसतो, पण माझ्या आजच्या जीवनकाळात तो बसवता येऊ शकतो काय?
आजच्या घडीला त्याची आवश्यकता समर्थपणे मांडण्याची गरज आहे, असे वाटते, पण खरे सांगायचे तर आम्ही संभ्रमावस्थेत आहोत. जुने आम्हाला धरवत नाही, नव्याला सामोरे जाता येत नाही. कारण त्याचा नक्की ठावठिकाणा आम्हालाच ठाऊक नाही...
अशा वेळी ना. ग. गोरे यांची आठवण येते.
नानासाहेब गोरे म्हणजे पूर्ण नास्तिक, बुद्धिवादाची कास धारणारे असा त्यांचा लौकिक होता, पण पंढरपूरला ते गेले, तेव्हा विठोबासमोर ते नतमस्तक झाले! नानासाहेबांनी लिहिले आहे, जिथे पिढ्यान्पिढ्या लक्षावधी स्त्री-पुरुषांनी
लोटांगण घातले, तिथे हातही न जोडणारा मी कोण? असा सवाल हृदयातून आला व माझे हात मी जोडले!
चातुर्मासारंभाच्या निमित्ताने असे काय-काय आठवत आहे. वास्तविक, लं. रा. पांगारकरांचा 'भक्तिमार्गप्रदीप' याची जन्मकथा ज्याने एके काळी ग्रंथ विक्रीचा उच्चांक केला. संपूर्ण चातुर्मास कसे निघाले, त्याबद्दल सांगायचे होते, पण त्यासाठी पुढचे चार महिने आहेतच की.