दान महिमा
By Admin | Updated: March 10, 2015 22:44 IST2015-03-10T22:44:52+5:302015-03-10T22:44:52+5:30
दम म्हणजे इंद्रियनिग्रह होय. मनुष्य जीवनामध्ये इंद्रियांचा निग्रह करणे फार महत्त्वाचे आहे. इंद्रियांचा स्वभाव असा आहे की, त्या त्या इंद्रियांचा

दान महिमा
अॅड. जयवंत महाराज बोधले
दम म्हणजे इंद्रियनिग्रह होय. मनुष्य जीवनामध्ये इंद्रियांचा निग्रह करणे फार महत्त्वाचे आहे. इंद्रियांचा स्वभाव असा आहे की, त्या त्या इंद्रियांचा आवडीचा विषय समोर आला की ती ती इंद्रिये त्या त्या विषयाकडे धाव घेतात. त्याचा परिणाम असा होतो की, त्यामुळे हा मनुष्यजीव दीन होतो. संत तुकाराम महाराज सांगतात,
इंद्रियांची दीने ।
आम्ही केलो नारायणे ।।
अशा या इंद्रियांच्या चंचलतेमुळे दीन झालेला जीव अनेक दु:खाला प्राप्त होतो. खरे तर आपण ही इंद्रिये आपली म्हणतो. परंतु यातील कोणत्याही इंद्रियावर आपला ताबा नाही. जी गोष्ट पाहू नको असे म्हटले की, डोळे तेच पाहण्यात जास्त प्रवृत्त होतात. इंद्रियांच्या या चंचलतेला कारण म्हणजे आपली ‘वासना’ होय. वासना मनामध्ये निर्माण होते व मग मन वासनेच्या माध्यमातून इंद्रियाद्वारे अनेक वस्तूपर्यंत पोहोचते. म्हणून मूळ वासनाच नष्ट करावी लागते म्हणजे इंद्रियांचा निग्रह करता येतो. त्याच्याशिवाय साधक अवस्थेमध्ये तरुन जाता येत नाही.
संत तुकाराम महाराज सांगतात -
वासनेचे मूळ छेदीवाल्यावांचुनी ।
तरलोसे कोणी न म्हणावे ।।
एकदा मनातील वाईट वासनाच नष्ट झाली की, मग इंद्रिये विषयांकडे धाव घेणार नाहीत म्हणजेच इंद्रियांचा निग्रह होईल. परंतु अशा प्रकारचा इंद्रियांवर जय मिळविणे कठीण आहे. महाभारत सांगते,
‘बलवान इंद्रिय गामो विद्वांसमपिकर्षति।’
याचा अर्थ इंद्रिये एवढी बलवान आहेत की, विद्वानालाही पतनाला पाठवितात. रामायणामध्ये हनुमंतराय प्रभुरामचंद्रांना सांगतात की, तुम्ही तुमच्या धनुष्यासह माझ्या हृदयात येऊन राहा. तेव्हा रामप्रभू विचारतात, धनुष्यासह का? हनुमंतराय म्हणतात, प्रभू ! माझ्या मनात सध्या कोणताही विकार, वासना नाही; परंतु ही वाईट वासना किंवा विकार कधी येईल हे सांगता येत नाही. तेव्हा अचानक एखादा विकार निर्माण झाल्यास
त्याला मारण्यासाठी तुमच्याकडे धनुष्य असावे!
याचा अर्थ आपण सतत जागरूक असणे गरजेचे आहे. मनाच्या ठिकाणी लागलेली अशुद्ध वासनेची घाण काढण्याकरिता सतत प्रयत्न केला पाहिजे. त्याकरिता साधनेची, अभ्यासाची, चिंतनाची आवश्यकता आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत बोलायचे झाले तर -
तै शरीरभाव नासती ।
इंद्रिये विषय विसरती ।।
जै सोहंभाव प्रतिती । प्रगट होय ।।
इंद्रियांपासून स्वत:ला वाचवायचे असेल तर या सर्व इंद्रियांचा मालक जो भगवान परमात्मा त्याचे नामस्मरण करावे, नक्कीच आपल्या ठिकाणच्या इंद्रियांचा निग्रह होईल. हाच दैवी संपत्तीतील ‘दम’ नावाचा सद्गुण होय.