मनाचा मनोनिग्रह जपताना...

By Admin | Updated: June 12, 2016 05:20 IST2016-06-12T05:20:22+5:302016-06-12T05:20:22+5:30

‘मन चिंती ते वैरी न चिंती’ असे म्हणतात. कारण मन असीमित विचारांच्या प्रवाहात सापडले की, त्याला स्वत:चा कंट्रोल नसेल तर कुठे भरकटत जाईल, याचा विचारही आपण करू शकत नाही,

Chanting the mindless mind ... | मनाचा मनोनिग्रह जपताना...

मनाचा मनोनिग्रह जपताना...

- डॉ. शुभांगी रघुनाथ पारकर

‘मन चिंती ते वैरी न चिंती’ असे म्हणतात. कारण मन असीमित विचारांच्या प्रवाहात सापडले की, त्याला स्वत:चा कंट्रोल नसेल तर कुठे भरकटत जाईल, याचा विचारही आपण करू शकत नाही, पण योग्य वेळी मनोनिग्रहाच्या बळावर माणूस जरी खळखळणाऱ्या प्रवाहात सापडला तरी भरकटत जाणार नाही हे खरे!

भावनिक फिटनेसमधील अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपल्याला जे साधायचे आहे, तिथेच लक्ष केंद्रित करायाचे. विचलित मन हा मनुष्याचा स्थायी भावच आहे, पण मनाला ताब्यात ठेवायाचे म्हटले, तर निग्रहपूर्वक प्रयत्न करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अनेक साधुसंतांनी मनोनिग्रह हा किती महत्त्वाचा विषय आहे हे शतकानुशतके समजावून सांगितले आहे. मनोनिग्रह हा भावनिक आरोग्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. यामुळे अनेक प्रकारच्या चुका, ज्या नंतर उभे आयुष्य उद्ध्वस्त करतात, त्या टाळता योतात.

आपल्याशी कोणी वाईट वर्तन केले वा दुखावले की, आपल्या तोंडून एक सर्वसामान्य वाक्य बाहेर पडते. ते म्हणजे, मी त्यांच्याशी असा वाईट वागलो नसतो. ते माझ्याशी इतके वाईट कसे वागू शकतात? हे वाक्य आपला अवमान करणाऱ्यांसाठी आपल्या मनात उद्भवत असले, तरी दुसऱ्या व्यक्तींबद्दल आपल्या मनात होणाऱ्या गैरसमजाचे ते प्रतीक आहे. आपण त्यांच्यासारखे वाईट वागू शकत नाही. कारण आपण ‘ते’ नाही आहोत आणि ते आपल्यासारखे नाहीत, जे काही कारण असेल ते असो, पण त्यांची विचार करायची पद्धत वेगळी आहे. त्यांची फिलॉसॉफी वेगळी आहे. म्हणजेच आपली त्यांच्याबद्दलची मूलभूत अपेक्षा आपण आपल्या विचारपद्धतीप्रमाणे करतो व त्यांना गृहीत धरतो. प्राणिमात्र त्यांच्या धर्मानुसार वागतात, तेव्हा आपण त्यांचे गुणधर्म गृहीत धरतो. मांजराचे रडणे काय किंवा कुत्र्याचे अवेळी भुंकणे काय, आपण नाराजीने का होईना, पण ती प्राण्यांची नैसर्गिक वागणूक आहे, म्हणून स्वीकारतो, पण आपल्या अवतीभोवतीची माणसे केवळ आपल्यासारखेच मनुष्यप्राणी आहेत, म्हणून मानसिक वा तात्त्विक दृष्ट्या त्यांनी आपल्या अपेक्षेनुसारच वागावे, अशी अपेक्षा तरी का करावी? खरे पाहता, सांस्कृतिक व पारंपरिक अनुभवातून आपण काही दैनंदिन गोष्टी, रूढी वा प्रथा म्हणून करतो, त्यात एकमेकांना गृहीत धरणे आले. म्हणूनच भावनिक आरोग्याचा मूलभूत पाया आपण व इतर दुसरे भावनिक पातळीवर वेगळे असू शकतो, आपली वैचारिक पातळी व वैयक्तिक फिलॉसॉफी वेगळी असू शकते, हे मानणे प्रगल्भतेचे द्योतक आहे. त्यामुळे जेव्हा दुसऱ्याच्या वेगळ्या अस्तित्वाची दखल घेणे व्यक्तीला जमले नाही की, भावनिक उद्रेकाची सुरुवात होते. त्यातूनच भावनिक असमाधान, नात्यांमध्ये, मैत्रीत दुरावा निर्माण होतो.
या सगळ्या अशांती व असमाधानामागे नकारात्मक भावनांचा भाग आहे. आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही नकारात्मक भावना रोखण्यात अयशस्वी होतो किंवा त्यांचे सकारात्मक भावनेत रूपांतर करू शकत नाही, तेव्हा त्या नकारात्मक भावनांचा आपण निचरा करू शकलो, तर मन:शांती थोड्या प्रमाणात का होईना, मिळवू शकतो. तात्पुरत्या स्वरूपात या उद्रेकी भावना आपण दुसऱ्यावर ओरडून, मुठी आपटून किंवा दुसऱ्याचा अपमान करून, रडून, कधी व्यायाम करून व्यक्त करतो. स्वत:ला त्या उद्रेकी भावनांतून सोडवण्याचा हा प्रयत्न तसा प्रॅक्टिकल जरी असला, तरी तो प्रगल्भ नाही किंवा कायमस्वरूपी नाही. एखादी व्यक्ती आपल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालीत असेल आणि एखादी बाह्य समस्याही नसेल, तेव्हा आपल्या भावनांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी, आपल्या भावनिक बचावासाठी वरील प्रकारच्या कृती त्या वेळी ठीक असतात. अशा प्रकारच्या भावनिक उद्रेकाला व्यक्ती जेव्हा बळी पडते, तेव्हा त्या नकारात्मक भावनांचा वेळीच निचरा करावा. नाहीतर त्या भावना आपल्या मनात बस्तान मांडून राहतात, पण नंतर संयमी प्रवृत्तीने या विघातक भावनांचा उगम का झाला, हे समजून घेणे भावनिक नियोजनात अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक वेळी व्यक्तीने भावनिक विकलतेचा गुलाम बनणे घातक आहे. या भावनिक विकलतेवर मात करणे भविष्यकाळाच्या दृष्टीने आवश्यक आहे.
भावनिक उद्रेक वारंवार होत असेल, तर माणसाचे मन तडा गेलेल्या ग्लासासारखेच असते. म्हणजे ते मन प्रसंगी साथ तर देत नाहीच, पण एक तणावपूर्ण परिस्थिती मात्र, आपल्याबरोबर कायमच डोकेदुखी बनून राहते. म्हणून जास्त भारावून न जाता, कितीही आवडता असला, तरी तडा गेलेला ग्लास बदलायला हवाच.
उद्रेक होणाऱ्या अनेक घटना होतच राहणार आणि ते आपल्या अस्तित्वाला आव्हान देत राहणार, विचलित करत राहणार. या प्रकारच्या संकटांचे ध्येय हे माणसाला रक्तबंबाळ करणेच असते. रक्तबंबाळ झाल्यानंतर स्वत:ची बौद्धिक शुद्ध हरपून वा बरेवाईट समजून सारासार विचार करण्याची क्षमता गमावून बसल्यास समस्येचे उत्तर कसे शोधता येईल? अनेक वाईट प्रसंगांनी भरलेल्या काटेरी जीवनपथावर चालायचे, तर वैचारिक व भावनिक सुसूत्रता जोपासायाला हवीच. दोरीवर चालताना आपण पडू शकतो, याची पूर्ण जाणीव ठेवून हातातल्या काठीने बॅलन्स सांभाळण्यासाठी शारीरिक चापल्य जितके आवश्यक आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक मानसिक लवचिकता आवश्यक आहे. हा बाहेरून आणि आतून बॅलन्स ज्याला जमतो, त्याला भावनिक फिटनेसही जमतो.

Web Title: Chanting the mindless mind ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.