संघ बदलतोय?

By Admin | Updated: October 18, 2016 06:58 IST2016-10-18T06:58:53+5:302016-10-18T06:58:53+5:30

समाजाची, विशेषत: तरुणाईची मानसिकता लक्षात घेता संघाला बदलावे लागेल, हे सरसंघचालक जाणून आहेत.

Changing the team? | संघ बदलतोय?

संघ बदलतोय?


समाजाची, विशेषत: तरुणाईची मानसिकता लक्षात घेता संघाला बदलावे लागेल, हे सरसंघचालक जाणून आहेत. त्यामुळे ते सातत्याने सामाजिक अभिसरण आणि परिवर्तनाचा विचार मांडून संघाच्या प्रतिमा संवर्धनाचा प्रयत्न करीत असतात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलेले भाषण, हिंदुत्ववादी संघटनेच्या भविष्यातील नव्या वाटचालीचे सूचक आहे. त्यांच्या या भाषणाची माध्यमांमध्ये फारशी चर्चा झाली नाही. जर त्यांनी खळबळजनक आणि वादग्रस्त विधाने केली असती तर कदाचित माध्यमांनी बातम्यांचा रतीब घातला असता. सरसंघचालकांच्या भाषणातील जे मुद्दे दुर्लक्षिले गेले, त्यांचीच खरे तर देशात चर्चा व्हायला हवी. ती जशी सकारात्मक, तशीच टीकात्मकही अभिप्रेत आहे. कारण, देशातील सर्वात मोठ्या हिंदुत्ववादी संघटनेचा प्रमुख जेव्हा संघटनेच्या मूळ गाभ्यालाच हात घालून त्यात परिवर्तन घडवू पाहातो, संघटनेची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यातून देशातील समाजकारण आणि राजकारण ढवळून निघत असते.
संघाने अलीकडेच मध्य भारतातील नऊ हजार गावांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात ४० टक्के गावात मंदिरे, ३० टक्के गावात पाणी व ३५ टक्के गावात स्मशानभूमीच्या वापरावरून सामाजिक भेदभाव होत असल्याचे समोर आले. सरसंघचालकांनी आपल्या भाषणात याच विषयाला हात घातला. ते म्हणाले की, ‘अनुसूचित जाती-जमातींसाठी असलेल्या संविधानातील तरतुदी व शासकीय योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी, यासाठी संघ स्वयंसेवक प्रयत्न करीत आहेत’. सरसंघचालकांचे हे विधान सामाजिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे. ‘श्रेष्ठत्वाच्या अहंकारामुळे आपल्याच निरपराध बंधूंना त्रास सहन करावा लागतो ही आपल्या साऱ्यांसाठीच लज्जास्पद गोष्ट आहे’, हे भागवतांचे विचार क्रांतिकारक आहेत. ज्या वर्णव्यवस्थेचे समर्थन दिवंगत सरसंघचालक गोळवलकर गुरुजींनी केले, त्याच संघाचे विद्यमान सरसंघचालक जेव्हा वर्णव्यवस्थेवर प्रहार करतात तेव्हा संघ बदलत आहे किंबहुना या संघटनेसाठी काळाची ती गरज आहे, असा त्याचा अर्थ निघतो. सार्वजनिक, धार्मिक उत्सवातील धांगडधिंंग्याबद्दलही भागवतांनी आपल्या भाषणात कठोर शब्दात प्रहार केले.
भागवतांचे व्यक्तिमत्त्व तसे बाळासाहेब देवरसांसारखे सुधारणावादी आहे. समाजाची, विशेषत: तरुणाईची मानसिकता लक्षात घेता संघाला बदलावे लागेल, हे भागवत जाणून आहेत. त्यामुळे ते सातत्याने सामाजिक अभिसरण आणि परिवर्तनाचा विचार मांडून संघाच्या प्रतिमा संवर्धनाचा प्रयत्न करीत असतात. इतर धर्मीयांचा द्वेष करून, त्यांची धार्मिक स्थळे उद्ध्वस्त करून, राष्ट्रवादाच्या आवरणाखाली धर्मांधतेचे विष पेरल्याने हिंदू संघटित होणार नाही, उलट तो विघटितच होईल हे सत्य संघाला एव्हाना कळून चुकले आहे. हिंदुत्ववादी संघटना असूनही या देशातील बहुसंख्य हिंदू संघाचे विचार मान्य करीत नाहीत. उलट या संघटनेच्या षड्यंत्राला वारंवार हाणून पाडण्याचे काम हेच सामान्य हिंदू करीत असतात, ही बाबही संघाला उमगली आहे. शंकराचार्य हे हिंदूंचे अध्यात्मिक प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आपल्या सोईचे वदवून घेतले की, हिंदू त्यांच्या शब्दांना प्रमाण मानून ते स्वीकारतील, हा संघाचा भ्रमही खोटा ठरला आहे. उलट या वाचाळ शंकराचार्यांवर हिंदूंची श्रद्धा नाही, त्यांच्या अचरटपणाचा सामान्य हिंदूंच्या मनात रागच आहे, हेही अनेक घटनांमधून सिद्ध झाले आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या प्रसाराचे सारे मार्ग अपयशी ठरल्याचे सत्य ९१ वर्षांच्या संघाला कळून चुकले आहे. म्हणूनच सामान्य हिंदूंना आपलेसे करणारे सुधारणावादी विचार आता सातत्याने मांडले जात आहेत. समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक उपक्रमही संघ वेगाने राबवित आहे. संघाचे विचार पटत नाही म्हणून त्याच्या सेवाकार्याबद्दल कुत्सित भाव ठेवणे चुकीचे आहे, संघ स्वयंसेवकांच्या सेवाभावी वृत्तीबद्दल शंका घेण्याचेहीे कारण नाही.
बहुजन समाजातील संतांबद्दल अलीकडच्या काळात संघाकडून व्यक्त होणारा कळवळा संघ अधिक व्यापक आणि सहिष्णु होत असल्याचे निदर्शक आहे. संघाचा मूळ गाभा कधी बदलणार नाही, पण हिंदू धर्मातील सर्व जाती-पोटजातींना आपल्या नवविचारांनी आकृष्ट करण्याचे प्रयत्न म्हणून सरसंघचालकांच्या या ताज्या विधानाकडे बघितले पाहिजे. यावर सकारात्मक-नकारात्मक अशा दोन्ही अंगाने तार्किक विचारमंथन होणे म्हणूनच गरजेचे आहे.
- गजानन जानभोर

Web Title: Changing the team?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.