- विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूहखरे तर निसर्गाने काळाचे विभाजन दिवस आणि रात्रीत केलेले आहे! रोज सूर्योदय आणि सूर्यास्त होणे हा निसर्गनियम आहे, परंतु माणसाने आपल्या सोयीसाठी काळाचे सेकंद, मिनीट, तास, चोवीस तास, आठवडा, महिना आणि वर्ष असे खंड पाडून घेतले! हा हिशेब अचूक व्हावा, यासाठी दर चौथे वर्ष ‘लीप ईअर’ मानायचे ठरले आणि त्या वर्षी फेब्रुवारी महिन्यास २९वा जास्तीचा दिवस दिला गेला. तरीही काळाचा महिमा असा की ‘लीप सेकंद’ जुळवून घेण्याचीही गरज पडते. म्हणूनच २०२० या नव्या वर्षाची खासियत अशी असेल की, पृथ्वीची परिवलन गती आणि आपली घड्याळे यांचा ताळमेळ बसावा, यासाठी ३० जूनच्या आसपास जगभरातील घड्याळे एक सेकंद पुढे करून ‘अॅडजेस्ट’ करावी लागतील.वर्ष २०१९ काळाच्या पडद्याआड जाणार आहे. या वर्षाच्या गेल्या ५१ आठवड्यांत या स्तंभातून ताज्या प्रासंगिक विषयांवर मी माझी मते तुमच्यापुढे मांडत आलो. या वर्षातील हा ५२वा स्तंभ आहे. एक पत्रकार या नात्याने सामान्य माणसाची नस मला ओळखता येत असल्याने, या स्तंभातून मांडलेली माझी मते ही नक्कीच तुमचीही मते असणार याची मला खात्री आहे. या स्तंभासाठी कोणता विषय घ्यावा, यासाठी येणारे ई-मेल व पत्रे यावरून तुमची आत्मीयता दिसून येते. आपल्या सर्वांच्या इच्छा-आकांक्षा एकसारख्याच तर आहेत! आपला देश स्वस्थ, सुखी व खूश असावा, हिच तर आपली इच्छा आहे.आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण होऊ शकतात. कारण प्रत्येक भारतीयात तशी क्षमता आहे! शतकानुशतके आक्रमणे सोसूनही आपल्या देशाने वेगळेपण टिकवून ठेवले, हिच तर खरी आपल्या अपार क्षमतांची खरी ओळख. मग प्रश्न असा पडतो की, आपण कमी कुठे पडतो? मला हा प्रश्न नेहमीच सलत असतो व देश-विदेशात फिरताना मी याचे उत्तर शोधण्यासाठी तुलनात्मक अभ्यासही करत असतो. युरोपात गावोगावी सुंदर उद्याने आहेत. गुळगुळीत सपाट रस्ते आहेत व आखीव-रेखीव फूटपाथ आहेत. लोक वाहनांचे पार्किंगही ठरलेल्या जागी न चुकता करताना दिसले. मग आपल्याला हे का जमू नये, असा मला प्रश्न पडतो. आपल्याकडे गावातील तर सोडाच, पण मोठ्या शहरांमध्येही वाहतुकीच्या बेशिस्तीने लोक त्रस्त आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन न करण्याचे आपण सर्वांनी मनापासून ठरविले, तर हे चित्र बदलायला फार वेळ लागणार नाही. आपण जनआंदोलन हाती घेतले, तर आपल्या नद्यांचे पुनरुज्जीवन नक्कीच होईल. या सर्व गोष्टी यशस्वीपणे केल्याची असंख्य उदाहरणे आपल्या देशात आहेत. तेव्हा नव्या वर्षात संकल्प करा की, पाण्याची नासाडी करणार नाही व जलस्रोतांचे संवर्धन करीन.
नववर्षात सर्व इच्छा एकदिलाने पूर्ण करू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 06:11 IST