येचुरींपुढचे ‘अ.भा.’ आव्हान

By Admin | Updated: April 23, 2015 07:08 IST2015-04-23T07:07:54+5:302015-04-23T07:08:51+5:30

सीताराम येचुरींना आपले सरचिटणीसपद देऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने बऱ्याच काळानंतर एक लोकाभिमुख चेहरा धारण केला आहे

Challenges of the 'AB' Challenge of Yichuram | येचुरींपुढचे ‘अ.भा.’ आव्हान

येचुरींपुढचे ‘अ.भा.’ आव्हान

सीताराम येचुरींना आपले सरचिटणीसपद देऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने बऱ्याच काळानंतर एक लोकाभिमुख चेहरा धारण केला आहे. सुरजीतसिंगांनी त्या पक्षाला सर्वच राजकीय पक्षांत मान्यता मिळवून देण्यासाठी जे कष्ट घेतले, त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली नसली तरी राजकीय क्षेत्रातील त्यांचा आदर फार उंचीवर गेला होता. त्यांच्या जागी आलेल्या प्रकाश करातांनी या बळाचा वापर पक्ष वाढविण्यासाठी करण्यापेक्षा आपले व्यक्तिगत माहात्म्य व अहंकार जोपासण्यासाठीच अधिक केलेला दिसला. मीडियातील काही माणसे सोबतीला ठेवली आणि पक्षातील काही चाहते प्रसन्न राखले की आपण कोणालाही नमवू शकतो या धारणेने पछाडलेल्या करातांनी डॉ. मनमोहन सिंग यांचा नको तसा अपमान केला व त्यांच्या सरकारच्या मार्गात जमेल तेवढ्या अडचणी उभ्या केल्या. पक्षातली जी माणसे देशाला तेव्हा जवळची वाटत होती त्यात सोमनाथ चटर्जींसोबत सीताराम येचुरी हेही एक होते. परंतु करातांच्या अरेरावीसमोर त्यांचे व पक्षातील इतरही कुणाचे काही चालत असल्याचे तेव्हा दिसत नव्हते. आपल्या अशा जोरावर करातांनी ज्योती बसूंचा अपमान केला. अच्युतानंद या वयोवृद्ध पक्षनेत्याला खाली पाहायला लावले आणि सोमनाथ चटर्जींना तर सरळ पक्षाबाहेरच काढले. आपल्या राजकारणात असा एकारलेला ‘इंटेलेक्च्युअ‍ॅलिझम’ कोणाला फारसा आवडत नाही. त्यामुळे त्या पक्षाचे अनेक चाहते त्याच्यापासून दूर झाले आणि ज्या बंगाल व केरळात त्याच्या पाठीशी सातत्याने बहुमत राहिले ती राज्येही त्याने गमावली. बंगालमधील पक्षाची तीन दशकांची सत्ता करातांच्या हटवादामुळे गेली, तर केरळमध्ये मुख्यमंत्री अच्युतानंद यांच्या विरोधातल्या पिनाराई विजयन यांना त्यांनी बळ दिल्याने तेथेही पक्ष खिळखिळा झाला. परिणामी साऱ्या देशातूनच त्या पक्षाचे उच्चाटन झालेले दिसले. २००४ मध्ये ६४ जागा मिळविणाऱ्या या पक्षाजवळ आता त्या सभागृहातल्या अवघ्या नऊ जागा आहेत. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींनी त्या पक्षाला बंगालात लोळविले आणि केरळात काँग्रेसप्रणीत आघाडीने त्याची दुर्दशा केली. काँग्रेसशी वैर केल्याने त्याला दिल्लीतही कोणी साथीदार उरला नाही. पक्षावर एवढे दारुण एकाकीपण आल्यानंतरही प्रकाश करात यांना पक्षावरील आपली पकड तशीच ठेवायची होती. परंतु सतत तीन वेळा ते सरचिटणीसपदी निवडले गेल्याने पक्षाच्या घटनेप्रमाणे ते आपोआपच बंद झाले होते. तरीदेखील विशाखापट्टणम येथे नुकत्याच झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात त्यांनी अखेरचा प्रयत्न म्हणून पी. रामचंद्रन पिल्लई या केरळी नेत्याचे नाव सरचिटणीसपदासाठी पुढे करून ते पद आपल्या ताब्यात राहील व येचुरी मागे पडतील अशी खेळी खेळून पाहिली. मात्र रामचंद्रन यांचे ७७ वर्षांचे वय दोहोंच्या आड आले आणि पक्षाला लोकप्रिय चेहरा देण्याची गरजही साऱ्यांच्या लक्षात आली. परिणामी रामचंद्रन यांनी ऐनवेळी आपले नाव मागे घेऊन येचुरींसाठी सरचिटणीसपदाचा मार्ग मोकळा केला. या बदलाची गरज केवढी मोठी होती ते सोमनाथ चटर्जी यांनी त्यांचे तत्काळ स्वागत करून साऱ्यांच्या लक्षात आणून दिले. कार्यकर्ते आणि लोक यांना आपला नेता आपल्याला भेटणारा, आपले ऐकून घेणारा व सहज बोलता यावा असा लागत असतो. कम्युनिस्ट पक्षाची एकूणच बांधणी काहीशी लष्करी स्वरूपाची असल्याने त्यात या संवादाला फारशी जागा उरत नाही. मात्र आताच्या लोकशाही खुलेपणात ही बंदिस्ती फारशी टिकणारी नाही. येचुरी यांची प्रतिमाच बंदिस्तीबाहेरची व खुली आहे. ती करातांसारखी हवाबंद नाही. त्यामुळेच त्यांच्या निवडीचे पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांत स्वागत झालेले दिसले. मात्र येचुरींचा मार्ग सोपा नाही. करातांनी घालविलेले सारे काही त्यांना परत मिळवावे लागणार आहे. शिवाय त्यात जास्तीची भरही घालावी लागणार आहे. पक्षाला देशपातळीवर सर्वपक्षीय मान्यता मिळविणे ही त्यांची पहिली जबाबदारी. बंगालमध्ये झालेल्या पराभवाचा धक्का सावरणे व तेथे आक्रसला गेलेला पक्ष पुन्हा मूळ पदावर आणणे ही दुसरी आणि केरळात त्याची लोकमान्यता वाढविणे ही तिसरी. एकेकाळी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र, तेलंगण व बिहारमध्ये आपले अस्तित्व राखणारा हा पक्ष आता त्या राज्यांत पार दिसेनासा झाला आहे. त्यामुळे येचुरींसमोरचे आव्हान खऱ्या अर्थाने अखिल भारतीय म्हणावे असे आहे. २००९पर्यंतची त्या पक्षाची ताकद ‘मनमोहन सिंग सरकारला वेठबिगार समजण्याएवढी’ मोठी होती. आताची त्याची अवस्था प्रादेशिकच नव्हे तर एका स्थानिक पक्षाएवढी दयनीय म्हणावी अशी आहे. पूर्वी त्याच्यासमोर काँग्रेसचे एकच आव्हान होते. आता त्या जोडीला तृणमूल कॉँग्रेस व भाजपाची आव्हानेही उभी झाली आहेत. शिवाय नवा समाजवादी जनता दल हा पक्ष कसा आकार घेतो, याचीही काळजी त्याला वाहायची आहे. येचुरींच्या स्वभावातील सहजसाधेपणा, अभ्यासूवृत्ती, समयसूचकता व माणसे जोडण्याची कला या गोष्टींची त्यांना या काळात नक्कीच साथ मिळेल. पक्षातील कर्मठांपासून सावध राहणे आणि तरुणाईशी पक्षाचे नाते जुळविणे हे त्यांचे नवे काम आहे. येचुरींचा आशावाद आणि तयारी मोठी आहे. पक्षाचे कार्यकर्ते त्यांना कशी साथ देतात हे यापुढे पाहायचे आहे.

Web Title: Challenges of the 'AB' Challenge of Yichuram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.