सिंहस्थ पार पाडण्याचे आव्हान

By Admin | Updated: June 11, 2015 23:24 IST2015-06-11T23:24:38+5:302015-06-11T23:24:38+5:30

नाशकात होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभपर्वासाठी कोट्यवधी रुपये खर्चून साकारण्यात येणाऱ्या साधुग्रामची पहिल्याच पावसात जी दशा वा दैना झाली ती पाहता

The challenge of carrying Simhastha | सिंहस्थ पार पाडण्याचे आव्हान

सिंहस्थ पार पाडण्याचे आव्हान

किरण अग्रवाल -


नाशकात होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभपर्वासाठी कोट्यवधी रुपये खर्चून साकारण्यात येणाऱ्या साधुग्रामची पहिल्याच पावसात जी दशा वा दैना झाली ती पाहता, हा कुंभमेळा साधूंचा की संधिसाधूंचा या प्रश्नाचे उत्तर मिळून यावे. शासकीय यंत्रणांचे पितळ तर यातून उघडे पडलेच, पण आता अल्पावधीत या कामांत सुधारणा घडवून ती तडीस नेण्याचे व हे पर्व निर्विघ्नपणे पार पाडण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
सिंहस्थाच्या कामांनी आता वेग घेतला असला तरी या वेगाच्या आड गुणवत्तेकडे होत असलेले दुर्लक्ष हाच खरा चिंतेचा मुद्दा ठरला आहे. पहिल्या पावसानेही तोच प्रकर्षाने अधोरेखित करून दिला आहे. कारण साधूंसाठी उभारायचे साधुग्राम असो की, गंगास्नानाकरिता येऊ घातलेल्या अंदाजे एक कोटी भाविकांच्या दृष्टीने करावयाची कामे; तीच मुळात दिरंगाईने सुरू केली गेल्याने कसा व्हायचा यंदाचा सिंहस्थ, असा प्रश्न यापूर्वीच उपस्थित होऊन गेला होता. शिवाय, ऐनवेळी ही कामे पूर्णत्वास नेताना ‘ठोकंबाजी’ करून संधिसाधूंकडून पर्वणी साधली जाण्याचीच भीती व्यक्त केली जात होती, ती साधार असल्याचीच ही चिन्हे म्हणावयास हवीत. पहिल्या आणि किरकोळ पावसातच अनेक पत्रे उडाल्याने या भीतीत भरच पडून गेली आहे. कारण साधुग्रामातील बहुतांश कामे पत्र्यांचीच आहेत. नाशकातील शाहीस्नानाच्या पर्वण्या या ऐन पावसाळ्यात असतात. त्यासाठी लाखो भाविक जमतात. अशात काही अनुचित घडणे म्हणजे जिवाशीच गाठ ठरते. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी याबद्दल सकाळी महापौर व महापालिका आयुक्तांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत साऱ्यांची खरडपट्टी काढली आणि थेट ‘कमिशन खाऊ नका’ अशा भाषेत यंत्रणेचा समाचार घेतला; परंतु ‘साधुग्राम’मध्ये प्रत्यक्ष पाहणी करून अवघ्या दोन तासातच त्यांनी पूर्वीचा रुद्रावतार बदलत पुन्हा प्रशासनाला चांगल्या कामाचे प्रशस्तिपत्र बहाल केले. त्यामुळे साधू-महंतांनाही काबूत करण्यात यंत्रणा यशस्वी ठरल्याची चर्चा घडून येणे स्वाभाविक ठरले.
अर्थात, एकीकडे यंत्रणेला सांभाळून घेताना महंत ग्यानदास यांनी रामकुंडावरील वस्त्रांतरगृह पाडण्याचा मुद्दा छेडून सर्वसंबंधितांची धडधड मात्र वाढवून ठेवली आहे. अमुक एका बाबतीत ‘ऐसे नही हुआ तो साधू स्नान नही करेंगे’ अशी त्यांची धमकी नित्याचीच असली तरी ती दुर्लक्षिताही येत नाही, ही प्रशासनापुढील अडचण आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी कुंभमेळा मंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीतील निर्णयाचा संदर्भ त्यासाठी देण्यात येत असला तरी आता उरलेल्या वेळेत ते पाडणे व त्याचा मलबा हटविणेही शक्य होणारे नाही. त्यात या मागणीमागे पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांशी असलेल्या वैराच्या राजकारणाचा वास आहे. शिवाय, ती मागणी व्यवहार्यही नाही. ‘मीडिया सेन्स’च्या बाबतीत वाक्बगार असलेल्या महंतांनी काही दिवसांपूर्वी त्र्यंबकलाही वैष्णवपंथीय आखाडे स्नानास जाणार सांगून माध्यमातली जागा व्यापली तसे या वस्त्रांतरगृहाचे होणारे आहे. पण या बाबी प्रशासनास कामाला लावणाऱ्या नक्कीच आहेत. परिणामी एकीकडे अल्पावधीत कामे पूर्ण करण्याचे आव्हान असताना दुसरीकडे महंतांची मर्जी सांभाळणे कसोटीचे ठरले आहे.
दादा आता थांबा की!
दोन वेळा नाशिक पदवीधर व गेल्यावेळी धुळे लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करून झालेल्या प्रतापदादा सोनवणे यांना आता तापी खोरे विकास महामंडळाचा लाल दिवा खुणावतोय. खरे तर भाजपात असूनही नसल्यासारखे राहिल्यानेच त्यांचे यंदा तिकीट कापले गेले. त्यानंतर नाशकातून विधानसभेची निवडणूक लढविण्याची त्यांनी तयारी केली होती. पक्षाकडून संधी न मिळाल्यास शिवसेनेचाही पर्याय त्यांनी चाचपून पाहिल्याचे तेव्हा बोलले गेले. पण कुठेच जमले नाही म्हणून मार्गदर्शकाचीच भूमिका बजावण्याची वेळ त्यांच्यावर आली. अशात आता हे नवे खूळ त्यांना लागले असले तरी, पक्षनेतृत्व ते मनावर घेणार आहे का? कारण पक्षीयदृष्ट्या उपयोगितेचा मुद्दा आता सर्वत्रच पाहिला जात असतो.

Web Title: The challenge of carrying Simhastha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.