- संतोष देसाईभाजपच्या अधिकृत टिष्ट्वटर हॅन्डलवरून भाजपच्या अध्यक्षांच्या भाषणातील एक परिच्छेद टाकण्यात आला. त्यात पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे की, आमचा पक्ष जर सत्तेत आला तर तो संपूर्ण देशासाठी नागरिकत्वाचा कायदा लागू करील, तसेच हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माचे सोडून इतर धर्माच्या घुसखोरांना शोधून त्यांच्याच विरुद्ध कारवाई करील. निरनिराळ्या धर्माच्या लोकांविषयी पक्षाची भूमिका काय आहे हे त्यातून स्पष्टच झाले आहे. राष्ट्रीय भूमिकेतून सर्व घुसखोरांविरुद्ध कारवाई करण्याविषयी आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण त्यांना धर्माच्या आधारावर वेगळे करून मुस्लीम व ख्रिश्चन समाजाला वेगळी वागणूक देण्यात विशिष्ट धर्माची सत्ता मान्य करण्याचा दृष्टिकोन स्पष्टच दिसतो. या यादीत बौद्ध धर्माच्या लोकांचा समावेश करण्यामागे राजकीय भूमिकाही दिसून येते. तसेच घुसखोरांना भारतीय नागरिकत्व नाकारताना सरकारचे मित्र कोण आणि शत्रू कोण हे निश्चित करण्याची कृती दिसून येते. कारण देशातील अनेक घुसखोर हे शेजारी राष्ट्रातील बौद्धही असू शकतात!पण पक्षाला धार्मिक भेदभाव करायचे आहेत, यात नवल वाटण्यासारखे काही नाही. फक्त अशा तºहेने वक्तव्य करण्याचे धाडस पक्षाध्यक्षांनी दाखवणे हे आश्चर्यकारक आहे. यापूर्वीच्या नेतृत्वाने हीच गोष्ट आडवळणाने सुचविली होती. या वेळी त्यात स्पष्टता आहे. या वक्तव्याची मतदारांमध्ये काय प्रतिक्रिया उमटते ते पाहणे उद्बोधक ठरेल. समाजातील एका गटाचा या भूमिकेला पाठिंबा आहे. त्यात घुसखोरांमुळे प्रभावित झालेले, त्यांच्या विकासाच्या संधी गमावलेले हिंदू लोक आहेत. पण या भूमिकेला कडाडून विरोध करणाराही एक गट आहे. त्यांना ही भूमिका फाजील धर्माभिमानी आहे आणि या भूमिकेने घटनेच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासला जातो असे वाटते. पण या दोघांचा सुवर्णमध्य साधणारेही काही लोक आहेत. हे लोक शहरात मोठ्या प्रमाणात दिसून येतात. ते उदार मतांचे असतात व त्यांनी यापूर्वी अन्य पक्षांची पाठराखण केलेली असते.सध्याच्या सरकारचे गुणगान करताना ते मोदींच्या नेतृत्वगुणाचे कौतुक करतात. जगात त्यांनी भारताची प्रतिमा कशी उंचावली आहे याचे गुणगान गातात. ते राहुल गांधींविरुद्ध भूमिका घेतात. त्यांच्या घराणेशाहीवर टीका करतात आणि पूर्वीच्या सरकारच्या काळात भ्रष्टाचाराला कशी मोकळीक मिळाली होती. मायावती जर पंतप्रधान झाल्या तर काय होईल याची त्यांना भीती वाटत असते. आघाडीचे सरकार आलेच तर ते मोदींच्या नेतृत्वात यावे अशी त्यांची भूमिका असते. त्यांच्या विचारांविषयी मतैक्य किंवा मतभिन्नता असू शकते. पण त्यामुळे राजकीय पर्यायांचे मूल्यांकन करणे सोपे जाते.
भाजपकडून धर्माच्या कार्डाचा वापर झालाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 04:43 IST